सिंधूने सुरू केली शॅडो प्रॅक्‍टिस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

भारतात अनलॉक सुरू झाले असले, तरी ऑलिंपिक पदकाबाबत आशा असलेल्या बॅडमिंटनपटूंचा सराव अद्याप सुरू झालेला नाही.

मुंबई: भारतात अनलॉक सुरू झाले असले, तरी ऑलिंपिक पदकाबाबत आशा असलेल्या बॅडमिंटनपटूंचा सराव अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे अखेर जागतिक विजेत्या पी. व्ही. सिंधूने घरातच आपला "सराव' सुरू केला आहे.

सिंधूने कोर्टवर आपल्या हालचाली कशा होतील, हे विचारात घेऊन सराव सुरू केला आहे, त्याचबरोबर तंदुरुस्ती कायम राखण्यासाठीही घरीच शारीरिक व्यायाम सुरू केला आहे. तिचे आई-वडील हे दोघेही माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांनीच मुलीच्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले होते. आत्ताही हेच घडत आहे. ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी भारतीय बॅडमिंटनपटूंचे शिबिर 1 जुलैपासून सुरू होणार असल्याचा विचार होता; पण तेलंगणा तसेच हैदराबादमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारची यास तयारी नाही. त्यामुळे सिंधूने अखेर घरीच तंदुरुस्तीकडे तसेच "सराव' करण्याचे ठरवले आहे.

सिंधूने लॉकडाऊन कालावधीतही तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष केले नाही. तिने तिचा नियमित व्यायाम सुरू ठेवला आहे. त्यासाठी ती घरातच सर्व काही करीत आहे. गोपीचंद यांच्या अकादमीत सराव सुरू असतानाही आमचे तिच्या तंदुरुस्तीकडेलक्ष असे. आत्ताही ती शारीरिक तंदुरुस्तीसाठी विविध प्रकारचे व्यायाम करीत आहे, त्याकडे आमचे लक्ष आहे, असे सिंधूचे वडील पी. व्ही. रमण्णा यांनी सांगितले.

सिंधूने गेल्या काही दिवसांपासून शॅडो प्रॅक्‍टिसही सुरू केली आहे. ती घराच्या आवारातील जागेवर शटलला सामोरे जात असल्याचा सराव करीत आहे.प्रत्येक बॅडमिंटनपटू त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस हे करीत असतो. आत्ताही सिंधू कोर्टवरील प्रत्यक्ष सराव सुरू झाल्यावर त्यास पूर्णपणे तयार राहण्यासाठी हे करीत आहे. अर्थातच त्यात खेळातील प्रत्येक शॉटस्‌च्या सरावावर भर दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News