पडद्यामागच्या कलाकारांसाठी सरसावले हात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 April 2020

"नाडियादवाला ग्रॅण्डसन्स एन्टरटेन्मेंट'ची मदत

मुंबई ः हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक यशस्वी चित्रपट देणाऱ्या "नाडियादवाला ग्रॅण्डसन्स एन्टरटेन्मेंट' आणि "नाडियादवाला फाऊंडेशन' यांच्यातर्फे "पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता फंडा'ला मदत देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर नाडियादवाला ग्रॅण्डसन्सतर्फे त्यांच्या कामगारांना आर्थिक मदतही करण्यात येणार आहे. जवळपास चारशे कामगारांना ही मदत करण्यात येणार असून त्यांना बोनसही देण्यात येणार आहे.
सध्या कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक कामगारांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. कामगारांच्या काही संघटना, तसेच काही कलाकार व प्रॉडक्‍शन हाऊसेस त्यांना मदतीचा हात देत आहेत. काही कलाकार पंतप्रधान मदत निधी किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करीत आहेत.

हिंदीबरोबरच मराठी कलाकारही मदतीकरिता पुढे सरसावले आहेत. यशराजसारख्या मोठ्या बॅनर्सने आपल्या कामगारांना मदत देण्याचे ठरविले आहे. बालाजी टेलिफिल्मच्या सर्वेसर्वा एकता कपूरने आपला एक वर्षाचा पगार कामगारांमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्‍यात कोरोनाचे आलेले मोठे संकट पाहता सगळ्यांनी मदत करण्याचे ठरविले आहे. "नाडियादवाला ग्रॅण्डसन्स' या बॅनर्सतर्फे "पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधी'ला मदत करण्यात येणार आहेच, शिवाय "मोशन पिक्‍चर्स ऍण्ड टीव्ही प्रोड्युसर्स वेल्फेअर ट्रस्ट', 'श्री भैरव सेवा समिती', "फिल्म इंडस्ट्री वेल्फेअर ट्रस्ट' तसेच नाडियादवाला ग्रॅण्डसन्सबरोबर जोडले गेले आहेत. कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम बोनस म्हणून देण्यात येणार आहे. या बॅनरतर्फे सुरक्षित राहा आणि घरीच राहा, असाही संदेश देण्यात आला आहे.

10 कोटींची मदत

कोरोना विषाणूच्या संकाटाशी लढण्यासाठी सोनी पिक्‍चर्स नेटवर्क इंडियानेही मदतीचा हात पुढे केला आहे. सोनी पिक्‍चर्स नेटवर्क इंडिया मनोरंजन क्षेत्रातील रोजंदारी कामगारांसाठी 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत. याशिवाय सोनी पिक्‍चर्स नेटवर्क इंडिया "स्वदेस कोविड फंडा'साठी देखील मदत करत आहेत. यासोबत ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा काही रोजंदारी कामगारांपर्यंत पोहचत "सोनी पिक्‍चर्स नेटवर्क' त्यांना अन्न-धान्य खरेदी करण्यासाठी कूपन्सचे वाटप करत आहेत. हे कूपन्स ते कोणत्याही रिटेल स्टोअर्समध्ये जाऊन वापरू शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News