निसर्ग व अध्यात्मकलेचा सुंदर आविष्कार - श्रीक्षेत्र तिळसेश्वर

वैभव मोहन पाटील, नवी मुंबई
Monday, 4 March 2019

पालघर जिल्‍हयातील वाडा तालुका हा मुळतः भातशेतीचे उत्‍पन्‍न काढणारा भाग म्‍हणून ओळखला जातो. येथील 'वाडा कोलम' हा तांदळाचा प्रकार राज्‍यभर प्रसिध्‍द आहे. मात्र वाडा तालुका हा प्राचिन मंदिरे व एतिहासिक पार्श्‍वभुमी असलेला परिसर म्‍हणूनदेखील प्रसिध्‍द आहे. अशाच एका प्रसिध्‍द एतिहासिक स्‍थळास भेट देण्‍याचा योग नुकताच मला आला.

वाडा तालुक्यातील वैतरणा नदीच्या काठावर तिळसेश्वर शिव मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. वाडा बस स्थानकापासून 7 कि.मी.अंतरावर असलेल्‍या हया मंदिरात जाणेयेणेसाठी बस व खाजगी वाहनांची सुविधा आहे. वैतरणा नदी येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी जत्रा भरते, महाशिवरात्री यात्रेच्‍या दिवशी ठाणे, पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ‍भाविक या ठिकाणाला भेट देतात. विविध वस्‍तु व खादयपदार्थांची असंख्‍य दुकानांची या ठिकाणी रेलचेल असल्‍याने स्‍थानिक व आसपासच्‍या परिसरातील लोकांना चांगला रोजगारदेखील उपलब्‍ध होतो. 

या ठिकाणचे आणखी एक वैशिष्‍टय म्‍हणजे, मंदिरालगतच्या नदिपात्रातील डोहात असणारे "देवमासे". तिळसेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात हे देवमासे आहेत. कुंडातील असंख्‍य देवमासे भाविकांना सहजि‍रित्‍या दृष्‍टीपथास पडतात. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी महाशिवरात्री व इतर दिवशी सुद्धा मोठी गर्दी असते. तिळसेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर असल्याने या मंदिराला माहात्म्य प्राप्त झाले आहे. या मंदिराचा संबंध भारतातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये गणल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर महादेवाशी असल्याचा पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ आहे. वैतरणा नदीच्या तीरावर उंच चढल्यावर मंदिरात जाण्यासाठी पादचारी पूल बांधल्याने मंदिराची शोभा द्विगुणित झाली आहे. येथील नदी मूळ गोदावरीच असून ती ब्रह्मगिरीतून आली आहे. येथे तिळसेश्वराची स्वयंभू पिंड आहे. पिंडीवर टाकलेले नाणे नदीतील मासे असलेल्या कुंडात पडत असे. अलीकडे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. देवाची पूजाअर्चा येथील पुजारी करतात. 

येत्या सोमवारी महाशिवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. त्या दिवशी शिव भक्तांचा तिळसा येथे जनसागर लोटणार आहे. येथील एका खोल कुंडांमध्ये असलेल्या माश्यांच्या चमत्कारिक आख्यायिकेमुळेच येथे हे मासे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते, मात्र हे मासे पाहण्यासाठी येणारी माणसे या माशांना खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाह्या, पाव तसेच इतर अनेक पदार्थ टाकत असतात. या पदार्थांमुळे हे पाणी घाण होते तसेच पाण्यावर तेलकट द्रावण तयार होते. त्यामुळे पाण्यातील माश्यांना ऑक्सिजन मिळण्यास अडचणी येत असल्याने श्वसनामध्ये बाधा येऊन हे मासे मारतात. तसेच पाण्यात खाद्य पदार्थाबरोबर प्लास्टिक च्या पिशव्या टाकल्या जातात. ह्या पिशव्यांची तसेच खाण्यासाठी टाकलेल्या पदार्थांनमुळे हे पाणी प्रदूषित होतेच मात्र नंतर हे मासे ह्या पिशव्या खाद्य म्हणून खातात. 3 ते 4 वर्षापुर्वी जवळ पास २५ ते ३० इतर मासे महाशिवरात्रीनंतर मृत्यूमुखी पडले होते. ह्या मेलेल्या माश्यांच्या रिपोर्ट नुसार हे मासे प्लास्टिक खाल्ल्यामुळे तसेच काही माश्यांना ऑक्सीजन न मिळाल्यामुळे हे मासे मेले होते. हे मासे 'महाशीर' या दुर्मिळ जातीचे असून ते चीन आणि भारतात तिळसेश्वर येथे बघायला मिळतात. 

तिळसेश्वर मंदिराशेजारी असलेल्या वैतरणा नदीच्या पात्रात मुबलक प्रमाणात पाणी सतत उपलब्ध असल्याने येथील लोक या पाण्याचा वापर कपडे व घरगुती वापरासाठी करतात. तसेच नदीपात्राशेजारी धार्मिक विधीदेखील करण्यात येतात. या नदीवरील पुलाला लागूनच विठ्ठल रखुमाईचे एक सुंदर मंदिर तयार करण्यात आले असून आजूबाजूला विविध फुलझाडे व भाजीपाल्याच्या शेतीमुळे तसेच मंदिराशेजारील जागेत सुशोभीकरण करण्यात आल्याने या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते. मंदिराच्या सभामंडपात चोहोबाजूंनी संतांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या असून त्याखाली दैनंदिन जीवनातील उपयुक्त त्यांच्या रचना व वचने रेखाटण्यात आली आहेत. एकंदरीत ठाणे मुंबई शहरापासून जवळपास 75 ते 80 किलोमीटर अंतरावरील तिळसेश्वर हे शिवशंभो महादेवाचे ठिकाण एक दिवसाच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण असून आपणदेखील या ठिकाणी भेट देऊन निसर्गसौंदर्य व आध्यात्मिक कलाकृतींचा आस्वाद घ्याल याची खात्री आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News