साठीतील एक सेवानिवृत्त शिक्षिका बाह्यरुग्ण विभागात आली. तिचे दोन्ही खांदे अनेक वर्षापासून दुखायचे आणि त्या त्रासाबरोबर जगायचे तिने स्वीकारले होते. पण, अलीकडे तिला उजव्या खांद्याचा त्रास असहनीय झाला होता. बऱ्याच कामासाठी तिला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागायचे. मग ते केस विंचरणे असो, कपडे बदलणे वा अंघोळ करणे. वेदनांमुळे तिच्या अनेक रात्री निद्रारहित जाऊ लागल्या. स्वावलंबी अशी ती खंबीर व्यक्ती खांद्याच्या त्रासामुळे आपला आत्मविश्वास गमावत चालली होती. आपल्यातील बरेच जण या वृद्ध महिलेचा त्रास स्वतःच्या खांदेदुखीशी परस्पर तुलना करू शकतील. तरुणांमध्येसुद्धा खांद्याचा त्रास भरपूर प्रमाणात आढळतो. ज्यामुळे त्यांना आवडीच्या छंदांना (खेळ, कसरत) अलविदा करावे लागते.
खांदा दुखणे किती सामान्य आहे?
स्नायू आणि अस्थीचे दोष बघता खांदेदुखी हे पाठदुखी आणि मानेच्या दुखण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील वाढती क्रीडा संस्कृती आणि वाढत्या आयुर्मानामुळे त्यात दरवर्षी वाढ होत आहे. एका संशोधनानुसार एका व्यक्तीला पूर्ण जीवनकाळात खांदेदुखीचा त्रास होण्याची शक्यता 70 टक्के असते. खांद्याचा सांधा शरीरातला सर्वात लवचिक व हलणारा सांधा आहे. त्यामुळे इन्जुरीलाही संवेदनशम आहे. हा सांधा शारीरिक श्रम, खेळ आणि सततच्या हालचालीमुळे दुखावला जाऊ शकतो. इजा झाली नाही तरी वाढत्या वयात खांद्याची झीज होऊ शकते.
खांदेदुखीची सर्वसामान्य कारणे?
खांदेदुखीचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे रोटेटर कफ डीसऑडर (सिंड्रोम) हे आहे. जेथे खांद्याभोवती असणाऱ्या स्नायूचे आवरण (रोटेटर कफ) खराब होते. हा दोष रोटेटर कफला सूज आल्यामुळे, वारंवार इजेमुळे किंवा स्नायूतील कमकुवतपणामुळे होतो. बऱ्याच वेळा हा कफ फाटतो व त्यामुळे संधिवात होऊ शकतो. संधिवात हा वयोमानानुसार होणारा दोष आहे. ज्यामध्ये जसजसे वय वाढते, तसतसे खांद्याच्या हाडावरचे संव्रक्षणात्मक आवरण (कार्टिलेज) खराब होते आणि खांद्यातली हाडे एकमेकांवर घासली जातात व दुखतात. तसेच कफ फाटल्यामुळे खांद्याची ताकतपण कमी होते व हालचाल करण्यास त्रास होतो.
बऱ्याचदा तरुण मुलांमध्ये खांदा निखळणे (डीस्लोकेशन) हे पण त्रासाचे कारण होऊ शकते. त्यामध्ये खांद्यातील लिगामेंटना दुखापत होते व खांदा मजबूत व स्थिर राहात नाही. फ्रोझन शोल्डर हा एक स्वयं मर्यादित दोष आहे. ज्यामध्ये सांध्याभोवतीचे स्नायू आकुंचन पावतात आणि कडक होतात. त्यामुळे खांदे दुखतात व हालचाल मर्यादित होते. हा 50 ते 60 या वयात मधुमेह व थायरॉईड त्रास असलेल्या रुग्णांना अधिक प्रमाणात होतो.
खांदेदुखी ही मानेच्या नसाच्या त्रासामुळे व तेथील मणक्याच्या झीजेमुळे उद्भवू शकते. काही वातांच्या विकारामुळेसुद्धा खांदा दुखू शकतो. मार लागल्यावर खांद्यातील हाडे मोडल्यावर (Fracture) वेदना होतात. पित्ताशयाचे व हृदयाच्या काही विकारांमध्येसुद्धा क्वचित वेळेस खांद्याचा त्रास होऊ शकतो.
तत्काळ मदत कधी घ्यावी?
- कोणतीही इजा झाली नसताना खांदा अचानक दुखत असेल तर तत्काळ अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- आपल्या खांद्याच्या वेदनेसोबत तापाची कणकण असेल किवा हालचाल करण्यास असमर्थता असेल, तसेच अपघाती इजा झाली असल्यास किवा खांदा निखळला असल्यास अस्थिरोग तज्ज्ञांना भेटावे.
खांदेदुखीवर उपचार व पर्याय काय?
- बहुतेक वेळा शस्त्रक्रियेविना खांदेदुखी बरे होऊ शकते. काही उपचार पर्यायामध्ये अल्पकाळ विश्रांती, बर्फाचा शेक, फिजिओथेरपी, स्लिंग, सांध्यात ठराविक इंजेक्शन व शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो.
- शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर आजकाल बहुतेक वेळा त्या दुर्बिणीद्वारे (Keyhole) केल्या जातात. रोटेटर कफ व लीगामेंटची शस्त्रक्रिया याने होऊ शकते. कमी काके व कमी रक्तप्रवाह हे याचे मुख्य फायदे.
- कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया (Joient replesment) याचा सल्ला पर्यायी उपचार संपल्यावर तसेच वयाच्या उतारवयात शक्यतो दिला जातो.
- हाड मोडले असल्यास (Fracture), हाड जोडण्याचा उपचार प्रत्येक रुग्णानुसार व हाडाच्या स्थितीनुसार बदलतो.
खांदेदुखीवर घरगुती उपचार कोणते?
- शुल्लक कारणामुळे वेदना होत असतील तर घरगुती उपचारांचा विचार केला जाऊ शकतो. तथापि त्याकडे दुर्लक्ष करू नये.
- खांदा सामान्य स्थितीत येणास काही दिवस लागतात, न आल्यास अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. खांद्याच्या संरक्षणासाठी विश्रांती घ्यावी. सूज व दुखणे बर्फाच्या शेकण्याने कमी होऊ शकते.
- खांद्याच्या आधारासाठी स्लिंगचा वापर होऊ शकतो. सौम्य मालिश दुखणे बरे करण्यास मदत करू शकते. पण, मार लागला असल्यास ते टाळावे.
- दुखापतीपासून बचाव कसा करावा?
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्रास असल्यास अस्थिरोग तज्ज्ञांना भेटावे. खांद्याचे बरेच त्रास वेळेवर उपचार घेतल्यास, गुंतागुंती न होता व शस्त्रक्रियेविना लवकर ठीक होतात.
- खांदा दुखापती रोखण्यासाठी खांद्यावर अतिरिक्त भार देण्याचे टाळावे. खेळामध्ये सहभागी असाल किंवा व्यायाम करू इच्छित असाल तर योग्य तंत्र व कौशल्य शिकणे महत्त्वाचे आहे.
- वृद्धांची हाडे कमजोर व स्नायू कमी लवचिक असतात. त्यांनी जड वस्तू उचलताना विशेष काळजी घ्यावी.
- जड वस्तू खांद्याच्या पातळीपेक्षा वर उचलणे टाळावे. वारंवार डोक्याच्या पातळीपेक्षा उंच करावी लागणारी कामे टाळावीत.
- जड वस्तू घेऊन जाणे आवश्यक असेल तर तिला शरीराजवळ घेऊन चालावे. शरीरापासून दूर भार उचाल्यास खांद्यावर अतिरिक्त ताण पडतो.
- वारंवार खांद्याला हालचाल करावी लागणारी कामे करताना अधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी.
- जर आपल्याला खांद्याचा आजार असेल तर अवश्य आपल्या अस्थिरोग तज्ज्ञांना भेटा.
खांदेदुखीचा त्रास हल्ली प्रत्येकाला होताना दिसतो. त्याला कारणेही अनेक आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे खांदेदुखीच्या प्रामाणात वाढच होताना दिसते. त्यावर वेळीच व योग्य उपचार केल्यास खांदेदुखीपासून कायमची मुक्ती मिळू शकते.
- डॉ. अभिषेक महाजन, अस्थिरोग तज्ज्ञ, सातारा