मराठी चित्रपटांना ओटीटीवर अल्प प्रतिसाद

संतोष भिंगार्डे
Monday, 29 June 2020
  • मराठीचे 30 ते 35 चित्रपट तयार मात्र किंमत मिळेना

मुंबई : हिंदी तसेच साऊथचे चित्रपट एकापाठोपाठ एक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. मराठीमध्येही 30 ते 35 चित्रपट तयार आहेत. त्यापैकी काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील, असे वाटत होते; परंतु मराठी चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणावी तशी मागणी नाही. मराठी चित्रपटांना तेथे म्हणावी तशी किंमत मिळत नाही. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्‍यता धूसर आहे.

कोरोनामुळे सगळीकडील चित्रपटगृहे साडेतीन महिने बंद आहेत. त्यांचा पडदा कधी उघडेल, हे सांगता येत नाही. हिंदीसह मराठीतील अनेक निर्मात्याचे तसेच दिग्दर्शकांचे चित्रपट तयार आहेत. या चित्रपटांवर निर्मात्यांनी लाखो-करोडो रुपये लावलेले आहेत. हिंदी तसेच दक्षिणेतील प्रॉडक्‍शन हाऊसनी आपले काही चित्रपट भरभक्कम रकमेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिले; मात्र मराठी चित्रपटांबद्दल काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत पिकल एन्टरटेन्मेंटचे समीर दीक्षित म्हणाले, की ओटीटीवर हिंदी तसेच साऊथच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. या चित्रपटांमुळे ओटीटीवाल्यांच्या सबस्क्रायबर्सच्या संख्येत वाढ होते. मराठीच्या बाबतीत ते होत नाही. ओटीटीवर मराठी चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते प्रदर्शित न झालेले चित्रपट सरसकट रक्कम देऊन घेत नाहीत.

मराठीत प्रदर्शित झालेले आणि गाजलेले चित्रपट ते घेतात. शिवाय ते शेअरवर चित्रपट मागतात आणि एका मिनिटाला तीन ते पाच रुपये असा दर देतात. त्यामध्ये आपलेच नुकसान होते. एक ते तीन वर्षांचा तो करार असतो आणि त्यामध्ये निर्मात्याने गुंतवलेली रक्कम वसूल होत नाही. शिवाय प्रदर्शित न झालेला चित्रपट सरसकट ओटीटीला दिला, तर सॅटेलाईटवाले चित्रपट घेत नाहीत. त्यांचे म्हणणे असे असते की, ओटीटीला दिलेला चित्रपट आमच्याकडे कोण पाहणार. त्यामुळे खूप कठीण परिस्थिती आहे.

आता थिएटर्स सुरू होण्याकडे डोळे

प्रदर्शित न झालेले मराठी चित्रपटदेखील ओटीटीवर जातील, असे वाटले होते. काही निर्मात्यांचे पैसे प्रोजेक्‍टवर अडकल्यामुळे त्यांना ओटीटीकडून चांगली किंमत मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु ती अपेक्षा फोल ठरली आहे. ओटीटीवर मराठी चित्रपटांना फारशी मागणी नसल्याचे समजले आहे. त्यामुळे आता थिएटर्स कधी सुरू होणार, याकडे मराठीचे डोळे लागलेले आहेत.

माझे दे धक्का, अनन्या, जागो मोहन प्यारे असे आठेक चांगले चित्रपट तयार आहेत. मी हे चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित करणार आहे. कारण मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेलो होतो; पण बजेट संपल्याने ते सध्या कुठलाही प्रादेशिक सिनेमा घेत नाहीत. माझ्या अनन्या चित्रपटाला एका ओटीटीची ऑफर होती; पण कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठीला म्हणावी तशी किंमत मिळत नाही. गुंतवलेले पैसेदेखील ओटीटीवर मिळत नाहीत.
- आकाश पेंढारकर, निर्माता

ओटीटीवाले मराठी चित्रपटाचे वेबसीरिजमध्ये रूपांतर करा, असे सांगतात. कारण मराठी चित्रपटांपेक्षा वेबसीरिजला त्यांच्याकडे चांगले बजेट असते. त्यामुळे एका चित्रपटाचे पाच ते सहा भाग करा आणि द्या, असे ते सांगतात. काही चित्रपटांच्या बाबतीत ते शक्‍य होईल; परंतु सगळ्याच चित्रपटांच्या बाबतीत ते शक्‍य होणार नाही.
- समीर दीक्षित, प्रसिद्ध वितरक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News