मे महिना म्हणजे लग्नसराईचे दिवस. लग्नाच्या बस्त्यात नवरीमुलीच्या साड्यांमध्ये ‘रिसेप्शन स्पेशल शालू’ची जागा आता घागरा-चोलीने घेतलेली दिसते. नवऱ्या मुलाच्या पसंतीच्या झब्बा, कुर्ता पायजम्याच्या जागी शेरवानी आलीय. भारतीय संस्कृतीतल्या ‘अचकन’ला थोडा पाश्चिमात्य टच देत बनलेली शेरवानी आज तरुणांची पहिली पसंती बनली आहे. शेरवानीच्या आधी अचकन हा पोषाख प्रचलित आणि लोकप्रिय होता. अचकन म्हणजे बंद गळ्याचा गुडघ्याएवढ्या लांबीचा कोट.
अचकन हा शब्द संस्कृतमधील अंगरखा (अंगरक्षक). अचकन हा बगलबंदी म्हणूनही ओळखला जातो. या अचकनमध्ये काही बदल करत शेरवानी बनवली गेली. या शेरवानीच्या निर्मितीमागे हैदराबादचे सहावे निजाम महबूब अली खान यांचं मोठं योगदान असल्याचे उल्लेख आढळतात. महबूब अली खान यांच्या पोषाखांच्या आवडी-निवडीचे अनेक किस्से सांगितले जातात. त्याला नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची आवड होती. एकदा घातलेले कपडे तो पुन्हा घालत नसे. हैदराबादमधल्या पुरानी हवेलीतील निजाम म्युझियममधले असंख्य कपडे पाहून लोक थक्क होतात. निजामाच्या काळात अचकन या त्या वेळच्या अतिशय लोकप्रिय पोषाखात थोडे बदल करत शेरवानी तयार करण्यात आली. भारतीय अचकन आणि ब्रिटिश फ्रॉक कोट यांच्या एकत्रीकरणातून शेरवानी तयार करण्यात आली. अचकनपेक्षा शेरवानीची लांबी कमी ठेवण्यात आली. शेरवानीच्या आत अस्तर लावलेले असते. साधारणतः नंतर शेरवानीचा वापर कमी झाला होता; पण पुन्हा एकदा समारंभातील कपड्यांची पहिली पसंती म्हणून शेरवानीकडे पाहिलं जाऊ लागलं आहे.
मुगल आणि राजपूत कालखंडाप्रमाणेच हैदराबादच्या निजामांचा कालखंड अतिशय संपन्न कालखंड म्हणून ओळखला जातो. हैदराबाद हे एकेकाळी सगळ्यात मोठं आणि संपन्न संस्थान मानलं जात असे. त्या काळात उंची कपडे आणि मौल्यवान दागिन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. अतिशय मौल्यवान रत्नांचा उल्लेखदेखील या कालखंडाच्या इतिहासात सापडतो. त्याकाळी पुरुषांचा मुख्य पोषाख म्हणजे शेरवानी. सणा-समारंभात सोन्याची बटणं जडवलेली शेरवानी वापरली जात असे. शेरवानी मुख्यत्वे सिल्कची बनवली जायची. सिल्क किंवा लोकरीच्या शेरवानीखाली पायजमा वापरला जात असे. शेरवानी ही त्याकाळी मुख्यत्वे हैदराबादशी जोडली गेली असली तरी तिचा प्रसार भारत आणि पाकिस्तानच्या अनेक भागात झालेला पाहायला मिळतो. निझाम कालखंडात स्त्रियांच्या वेशभूषेत खडा दुपट्टा, कुर्ता आणि चुडीदार प्रामुख्याने वापरले जात असत. काही वेळा ब्लाऊज आणि त्यावर बिनबाह्यांचा कुर्ता वापरला जायचा. लग्न-समारंभात वधूने घुंगट घ्यायची पद्धत होती. दागदागिन्यांमध्ये टिका, नथ, झुमर, कानफूल, राणीहार, पायल, जुगनी यांचा समावेश होता. निजाम ज्वेलरी ही जगभरात अतिशय प्रसिद्ध ज्वेलरी मानली जाते.
एकेकाळी राजघराण्यांचं वैभव समजले जाणारे दागिने पुन्हा फॅशन बनून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहेत. भलेही आजच्या दागिन्यांमध्ये तितकी मौल्यवान रत्नं त्यात वापरली जात नसतील; पण त्या पद्धतीच्या घडणावळीला पुन्हा मागणी येऊ लागलीय. जुडा हुआ लच्छा आणि सात लडा या दागिन्यांना आज बरीच मागणी आलीय. जुडा हुआ लच्छा म्हणजे गळ्यालगत घालायचा हार (चोकर) सोनं, हिरे आणि रुबी, पाचूसारख्या मौल्यवान रत्नांनी बनलेला हा हार अनेक समारंभात आवर्जून पाहायला मिळतो. सात लडा म्हणजे मोत्यांच्या सात लड्यांमध्ये जडवलेली रत्नांची पेंडंटस असलेला हार. हा हार खासकरून वराच्या घरातून वधूला भेट दिला जातो.
या दागिन्यांप्रमाणेच हैदराबादी नथ, तीन वेगवेगळ्या रत्नांपासून बनवलेला तिरमणी, माथ्यावर मधोमध लावायचा टिका; तर डाव्या बाजूला झुमर हे त्या काळातील दागिने समारंभांची शान ठरत आहेत.