युतीच्या जागावाटपात शिवसेनेची कोंडी ? भाजपचा वरचष्मा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • घटक पक्षांमुळे १५३/१३५ चा फॉर्म्युला?
  • शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा​

मुंबई - भाजपच्या वाट्याच्या १३५ जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या १० जागा मिळून १५३ जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येणार असून, फिप्टी-फिप्टी फॉर्म्युल्यावर पाणी फेरणार असल्याचे चित्र आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने फिप्टी-फिप्टी जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शिवसेना १४४, तर भाजप १४४ जागा लढणार असल्याचे शिवसेनेकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. 

मात्र, भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी १३५ जागा लढविण्यात येणार असून, उर्वरित जागा सरकारला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्याबाबत शिक्‍कामोर्तब झाल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सरकारला पाठिंबा दिलेले आठ अपक्ष आमदार, तसेच शिवसंग्राम आणि रिपाइं पक्ष भाजपसोबत आहेत. त्यामुळे या अठरा जागाही भाजपच्या कोट्यात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. म्हणजेच चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार भाजपकडे १५३, तर शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येणार असल्याचे स्पष्ट होते. 

शिवसेनेच्या दिग्गजांची होणार कोंडी
जागावाटप फॉर्म्युल्यात जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षांकडे कायम राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना नेते सुभाष देसाई, विनोद घोसाळकर यांच्यासारख्या दिग्गजांना मतदारसंघच मिळणार नाहीत. सध्या मोदी लाट नसल्याने काही जागांची अदलाबदल होईल, असे शिवसेनेचे नेते सांगत आहेत.

मात्र, या मुद्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाट कायम असल्याचे दिसून आल्याने भाजपच्या विद्यमान जागा आमच्याकडेच राहतील. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News