शिरपूरच्या तरुणाची आत्महत्या की घातपात ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

वाघाडीजवळून बाळद्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सकाळी दिसून आला.

शिरपूर : वाघाडी  गावाजवळ आज सकाळी झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला. प्रारंभी आत्महत्येची शक्‍यता व्यक्त केली जात असताना मृताच्या खिशात आढळलेले आत्महत्येपूर्व लिहिलेले पत्र आणि नातलगांनी घेतलेली शंका यामुळे हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले. मात्र उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मनोज सुधाकर पाटील (३५, रा. मारवड, ता. अमळनेर) असे मृताचे नाव आहे. वाघाडीजवळून बाळद्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सकाळी दिसून आला. प्रारंभी त्याची ओळखपटू शकली नव्हती. उपजिल्हा रुग्णालयात त्याची पत्नी अरूणाबाई व अन्य नातलग पोहचल्यानंतर त्याचे नाव निष्पन्न झाले. मारवड येथील नातेवाईकांना त्याच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली.

 
मृतदेह पाहून मनोजच्या नातलगांनी त्याच्या घातपाताची शक्‍यता बोलून दाखवली. त्याच्या पायांवर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून डोळ्यांवरही माराच्या खुणा दिसून आल्या. पोलिसांनी मृताच्या कपड्यांची तपासणी केल्यावर आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली. पोलिसांनी त्यातील मजकुराबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला असला तरी काहींनी बेदम मारहाण केल्याने आत्महत्या करीत असल्याचे मनोजने लिहून ठेवले असल्याची चर्चा आहे. दरम्यान पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र सायंकाळी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणात नेमके काय घडते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. 

मनोज व त्याची पत्नी अरूणाबाई यांच्यात नेहमी वाद होत असत. त्यामुळे काही महिन्यांपासून ती माहेरी येवून राहिली. मनोज तिला भेटण्यासाठी वाघाडी येथे नेहमी यायचा, त्यावेळीही दोघांची भांडणे होत असत. त्याच्या सासरच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, काल  दुपारी चारला तो वाघाडीला आला. मात्र मद्यपान करून जेवण न करताच निघून गेला. त्यानंतर त्याच्या मृत्यूचीच माहिती मिळाली. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News