कोकणात पंचमीपासून शिमगोत्सवाची धूम;पालखीऐवजी आंब्याची होळी नाचवणार

मकरंद पटवर्धन
Tuesday, 3 March 2020

कोकणात फाक पंचमीपासून शिमगोत्सवाची धूम सुरू झाली. भगवती देवीच्या उत्सवात पालखीऐवजी आंब्याची सुमारे पन्नास फुटांची होळी नाचवण्यात येते. होळीपौर्णिमेला भगवतीदेवीच्या शिमगोत्सवासाठी बोललेल्या नवसाचा कुमार मुलगा देवीला अर्पण करण्याची प्रथा सुरू आहे

रत्नागिरी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्रीदेवी भगवतीच्या शिमगा उत्सवाला प्रारंभ झाला. नवस बोललेल्या कुमार मुलाला देवीच्या वेशात सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवून होळीसोबत फिरविण्यात येते. ही शेकडो वर्षांची परंपरा आजही जपण्यात येत आहे. धुळवड, रंगपंचमी व गुढीपाडवा साजरा करून या शिमगोत्सवाची सांगता होते.

कोकणात फाक पंचमीपासून शिमगोत्सवाची धूम सुरू झाली. भगवती देवीच्या उत्सवात पालखीऐवजी आंब्याची सुमारे पन्नास फुटांची होळी नाचवण्यात येते. होळीपौर्णिमेला भगवतीदेवीच्या शिमगोत्सवासाठी बोललेल्या नवसाचा कुमार मुलगा देवीला अर्पण करण्याची प्रथा सुरू आहे. रविवारी षष्ठीला काठी उभी करून, मुलाला देवीच्या वेशात सजवून वस्त्रालंकार परिधान केले. त्यानंतर मानकरी देवीच्या मंदिरातून ढोल-ताशा, नगाऱ्यांच्या गजरात मुलाला घेऊन बाहेर पडले. श्री देवी आपला भाऊ श्री देव भैरी मंदिर, श्री जुगाई मंदिर, नवलाई पावणाई मंदिर आणि रत्नागिरी पोलिस ठाणे आदी ठिकाणी भेट देण्यासाठी निघाली. 

९ मार्चला दुपारी दोनला होळी आणण्यासाठी सर्व विश्वस्त मानकरी आणि ग्रामस्थ श्री देवी भगवती देवीचा अंश झालेल्या मुलासह भगवती मंदिर येथून भागेश्‍वर मंदिर मार्गे, श्री देव कालभैरव मंदिर, जोगेश्वरी मंदिर, झाडगाव नाका, जोशी पाळंद येथील श्री. पवार यांच्या घरी जाऊन तेथे होळी तोडण्यात येईल. तिथून फाटक हायस्कूलमार्गे गाडीतळ, श्री देव भैरव मंदिर मार्ग, दांडा फिशरीज येथे चरकरवाडी व पेठ किल्लेकर यांच्या ताब्यात पाचला होळी देण्यात येईल. तेथून राम मंदिरमार्गे हनुमान वाडी येईल. तेथून भागेश्वर मंदिरमार्गे हनुमान पारकिल्ला येथे दहाला व भगवती मंदिरात अकराला पोचेल. बाराला होळीचा होम होईल. उत्सवात १२ वाड्यांतील लोक असतात. 

 

आंब्याची होळी नाचवितात

हुरा रे हुरा, आमच्या भगवती देवीचा सोन्याचा तुरा रे होलिओऽऽ, करवत रे करवत, भगवती देवीची होळी चालली मिरवत रे होलिओऽऽ अशा फाका घालून आंब्याच्या होळी नाचवितात.होळीच्या ठिकाणी देवीच्या रूपातील मुलग्याचीही पूजा करतात.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News