सरासरी गुणांकणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 July 2020

 

  • नववी आणि अकरावीचे अनेक विद्यार्थी नापास

मुंबई : लॉकडाऊनमुळे परीक्षा न झाल्याने शाळांनी मागील सत्रातील सरासरी गुणांनुसार नववी आणि अकरावीचा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. विद्यार्थांसमोर 17 नंबरचा अर्ज भरून दहावीच्या परीक्षेला बसण्याचा पर्याय आहे; परंतु अर्ज भरण्यासाठी अनेक अटींचा अडथळा निर्माण होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

लॉकडाऊनमुळे शैक्षणिक वर्ष विस्कळित झाले आहे. अनेक अभ्यासक्रमाच्या परीक्षा न झाल्याने विद्यार्थांना पास करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नववीतील विद्यार्थ्यांना मागील सत्राच्या परीक्षेतील गुणांनुसार सरासरी गुणदान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्यावर फेरपरीक्षा घेऊन त्यात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या होत्या. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा कधी सुरू होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नववीच्या फेरपरीक्षेवरही प्रश्‍नचिन्ह आहे.

शाळांनी विद्यार्थांना एसएमएस, मेलवर निकाल पाठवले आहेत. या निकलामध्ये नापास झालेल्या विद्यार्थांसमोर भविष्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. विद्यार्थांनी खाजगी शिकवणी वर्गामध्ये शिक्षण सुरू केले आहे. तसेच शाळेतच दहावीचे ऑनलाईन शिक्षणही सुरू आहे. नापास झाल्याने शाळा विद्यार्थांचे शिक्षण थांबवू शकतात. सध्या नापास झालेल्या विद्यार्थांपुढे दोन पर्याय आहेत. नववीची फेरपरीक्षा या परिस्थितीत अशक्‍य असल्याने 17 नंबरचा अर्ज करून दहावी परीक्षेला बसता येईल; परंतु हा अर्ज भरण्यासाठी 30 जून अगोदर शाळा सोडल्याचा दाखला आणि नववीचा निकाल विद्यार्थांना मिळवावा लागणार आहे. ही कामे शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय करता येणार नसल्याने या विद्यार्थ्यांची कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्याची परिस्थिती पाहता नववीत नापास झालेल्या विद्यार्थांची फेरपरीक्षा होणे अवघड आहे. यातच 17 नंबर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना अनेक अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थांना अभ्यासाकडे लक्ष देता येणार नाही. विद्यार्थांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना पास करून दहावीच्या वर्गात पाठवावे.
- प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना.

आठवीपेक्षा नववीत अभ्यासाची काठिण्य पातळी वाढते. त्यामुळे सुरुवातीला घेतलेली चाचणी परीक्षा आणि सत्र परीक्षा याआधारे निकाल लावल्याने अनेक शाळांनी नववीत विद्यार्थ्यांना नापास केले आहे. या विद्यार्थ्यांची सध्या फेरपरीक्षा घेणे शक्‍य नाही. शाळा सुरू होण्याची वाट पाहत बसलो तर खूप उशीर होईल, त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षापुरते दहावीत पाठवावे.
- शिवनाथ दराडे, कार्यवाह, शिक्षक परिषद.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News