ती गप्प आणि मी बोलताच राहतो

हेमंत जुवेकर
Sunday, 9 June 2019

तुझं मला माहीत नाही; पण मला खात्री आहे, माझ्या मनात ‘तसं’ काहीही नाही. हो, मला हे माहीत आहेच, की आपल्या गप्पा संपता संपत नाहीत. नेहमी भेटल्यावर, भेटण्याच्या आधी आणि भेट संपल्यानंतरही त्या सुरूच राहतात. प्रत्यक्ष भेटल्यानंतर पहिल्या मिनिटाला आपल्याला आपल्या गप्पांची लिंक सहजपणे सापडते ती त्यामुळेच. किती सहजपणे बोलत राहतो आपण.

तुझं मला माहीत नाही; पण मला खात्री आहे, माझ्या मनात ‘तसं’ काहीही नाही. हो, मला हे माहीत आहेच, की आपल्या गप्पा संपता संपत नाहीत. नेहमी भेटल्यावर, भेटण्याच्या आधी आणि भेट संपल्यानंतरही त्या सुरूच राहतात. प्रत्यक्ष भेटल्यानंतर पहिल्या मिनिटाला आपल्याला आपल्या गप्पांची लिंक सहजपणे सापडते ती त्यामुळेच. किती सहजपणे बोलत राहतो आपण. सोबत इतर कुणी आहे, आपण इतर ग्रुपच्या खूप मागे पडलोय, हे आपल्या लक्षात येतच नाही. शिवाय, अनेकदा आपल्याला बोलावं लागतंच असंही नाही. त्या दिवशी कुणीतरी ते पुस्तक आणलं होतं. ते पाहून आपली सहज नजरानजर झाली नि आपण एकमेकांना नजरेनेच सांगून टाकलं, की ते वाचलंय आपण आणि मग आपण दोघं घरी निघताना त्यातले प्रसंग, त्यातली वाक्‍यं सांगता सांगताच सारा प्रवास संपला. प्रवास संपला तरी गप्पा सुरू होत्याच.   

आपल्या गप्पा सुरू राहतात, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हेच तर होत असतं, तुझंही होतं ना? पण एक गोष्ट खरीय, तू ग्रुपमध्ये नसताना कितीही छान विनोद झाले तरी हसू येत नाही. आणि तू असताना साध्या पीजेवरही केवढे हसतो आपण. तू नसताना असं हरवल्या हरवल्यासारखं का वाटत असेल मला? कोणतीही चांगली गोष्ट अनुभवली की नेहमी तुझाच विचार का येतो? तू हे अनुभवायला हवंस, मग त्यावर तू काय बोलशील, त्यावरची नेमकी प्रतिक्रिया काय असेल? असे विचार का सतत येत राहतात? तुझा सतत विचार असा सतत असला मनात, तरी मी एक गोष्ट नक्की सांगेन, माझ्या मनात ‘तसं’ काहीही नाही, पण थांब थांब. 

तुला हे सांगता सांगता माझं मलाच उमगलंय. माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसरं काहीही नाही! हा एक मुक्त भावानुवाद आहे. एका छान गाण्याचा. सिनेमाचं नाव ‘घरोंदा’. तोच तो अमोल पालेकर आणि झरिना वहाबचा. खरं तर, अमोल-झरिनाचा घरोंदा म्हटला की आठवतं, ते ‘दो दिवाने शहेर में’ हे गाणं. ते छान आहेच; पण याच सिनेमातलं, सुरुवातीलाच येऊन जाणारं, हे नितातंसुंदर गाणं कदाचित टायटलमध्ये असल्यानं लक्षात येत नाही सगळ्यांच्याच. पण कधी शांतपणे ऐकल्यावर भिडतच मनाला. कारण त्यातली ती पहिल्या प्रेमाची हुरहुर छान व्यक्त झालीय.

तुम्हें हो ना हो, मुझको तो इतना यकीं है 
मुझे प्यार तुमसे नहीं है, नहीं है
मुझे प्यार तुमसे नहीं है, नहीं है
मगर मैंने ये राज़ अब तक न जाना
के क्‍यों प्यारी लगती हैं, बातें तुम्हारी
मैं क्‍यों तुमसे मिलने का ढूंढू बहाना
कभी मैंने चाहा, तुम्हें छू के देखूं
कभी मैंने चाहा, तुम्हें पास लाना
मगर फिर भी, इस बात का तो यकीं है
मुझे प्यार तुमसे नहीं है, नहीं है

गुलजारचे हे शब्द. त्याच्या प्रेमाविषयीच्या त्या गाण्याहून अगदीच वेगळे. ‘खामोशी’मधल्या त्या गाण्यात  ‘प्यार को प्यारही रहेने दो कोई नाम ना दो’ असं सांगताना तो, ‘हमने देखी है इन आँखोकी महेकती खुशबू, हात से छुके इसे रिश्‍तोका इल्जाम ना दो...’ असलं काहीतरी भन्नाट सांगून जातो. या गाण्यातले शब्द तितके तरल नाही; पण सरळ आणि थेट आहेत. भावना मात्र सच्ची आहे.गुलजारला मीटरवर लिहायला नाही आवडत. अर्थात, तशी गाणीही त्याने लीलया लिहिलीत. पण, अनवट नज्म त्यानेच लिहावी आणि आरडीनेच त्याला संगीत द्यावं असं म्हणतात. पण, जयदेव नावाच्या अवलिया संगीतकारातही ती खुबी होती. मीटरमध्ये न बसणाऱ्या शब्दांचंही तो सुरेल गाणं करायचा. याच गाण्यातलं दुसरं कडवं पाहिलं की ते अगदीच पटून जातं. 

फिर भी जो तुम दूर रहते हो मुझसे
तो रहते हैं दिल पे उदासी के साए
कोई ख्वाब ऊंचे मकानों से झांके
कोई ख्वाब बैठा रहे सर झुकाए
कभी दिल की राहों में फैले अन्धेरा
कभी दूर तक रौशनी मुस्कुराए
मगर फिर भी..
फिर भी, इस बात का तो यकीं है
मुझे प्यार तुमसे नहीं है, नहीं है

रुना लैला या बांगलादेशी गायिकेने हे गाणं लयीशी खेळत गायलंय चांगलं. जयदेव यांची गाणी गाणं तसंही सोप नसतंच. पण गुलजार, जयदेव आणि रुना लैलाने या गाण्यातून ते नेमकेपणानं सांगितलंयच ना. खरं तर उच्चारल्या गेलेल्या शब्दापेक्षा न उच्चारलेले शब्दच महत्त्वाचे असतात, हे त्यांनी यात सांगून टाकलंय. यातल्या ‘नही है, नही है’ या शब्दांमागे भला मोठा ‘हो’ आहे, हे नाहीतर कसं कळलं असतं आपल्याला?
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News