फक्त त्याला भेटण्यासाठी तिने उचललं होतं 'हे' पाऊल; ही प्रेमकहाणी तुम्ही ऐकलीय का?

सोनल मंडलिक, सकाळ वृत्तसेवा-यिनबझ
Friday, 10 April 2020

जगात दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींचे मार्ग हे कधीच सोपे नसतात, हे आपल्याला अनेक कथांमधून समोर आले आहे. जवळपास प्रत्येक प्रेमी जोडप्याला आपलं प्रेम मिळविण्यासाठी "आग का दर्या" हा पार करावाच लागला. अनेकांना या प्रयत्नामध्ये आपला जीव देखील गमवावा लागला आहे. इतिहासातील पानांमध्ये अशा लाखो प्रेमळ जोडप्यांच्या कहाण्या आहेत, ज्यांना जिवंतपणी आपलं प्रेम मिळालं नाही, मात्र एकमेकांसाठी जीव देऊन त्यांनी आपलं प्रेम अमर केलं आहे. सोहनी- महिवाल यांची प्रेम कहाणी देखील तशीच आहे. या अद्भुत प्रेमकहाणीची मुळ पंजाबशी जोडली गेली आहेत. सोहनी- महिवाल यांच्या प्रेमकथेची ही मुळे अजूनही घट्ट असल्याची पाहायला मिळतात.

ही गोष्ट १८ व्या शतकातील आहे. पंजाबमधील चिनाब नदीच्या किनारी असेलल्या एका लहानश्या खेड्यातील कुंभार कुटुंबात एका गोड मुलीचा जन्म झाला. तीच नाव सोहनी ठेवण्यात आलं. पंजाबमध्ये सुंदर मुलींना सोहनी बोललं जातं. आपल्या नावाप्रमाणे सोहनी अत्यंत सुंदर होती. त्याचवेळी उज्बेकिस्तानमधील बुखारामध्ये एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या राजघराणे कुटुंबात एका मुलाने जन्म घेतला, या मुलाचं नाव राजकुमार इज्जत बेग ठेवण्यात आलं. लहानपानापासूनच हे दोघेही आपल्या कामांत कुशल होते. आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत. राजकुमार इज्जत बेगला फिरण्याची प्रचंड आवड होती. नेहमीच कोणत्या ना कोणत्या ठिकाणी त्याचे दौरे सुरु असायचे.  

सोहनीचे वडील तुल्हा कुंभार होते. ते मातीपासून भांडी तयार करत असतं. त्यांचा मडके बनविण्याचा आणि विकण्याचा धंदा होता. या कामात सोहनी वडिलांना पुरेपूर मदत करत असे. तयार मातीच्या भांड्यांवर ती आपल्या हातांनी सुंदर कलाकृती काढून भांडी आणखी आकर्षक बनवून विकण्यासाठी ठेवत असे.  सोहनीचा स्वभाव अत्यंत शांत आणि निर्मळ होता. ती सर्वगुणसंपन्न अशी मुलगी होती. त्यावेळी चिनाब नदी ही बखरा आणि दिल्लीच्या व्यापाऱ्यांच्या मार्गातून जात होती. त्यामुळे तिथे प्रवाशांची आणि व्यपाऱ्यांची चंगळ असे. एकदिवस राजकुमार इज्जत बेग भारत भ्रमंतीला निघाला. सुरुवातीला तो दिल्लीला पोहचला. दिल्लीनंतर त्याने लाहोरकडे आपला मोर्चा वळवला. मात्र तिथेही त्याला करमेना. शेवटी काही दिवस लाहोरमध्ये राहून तो पुन्हा बुखार्याला परतीच्या वाटेवर निघाला. बुखारा येथे जात असताना वाटेतच काही भांडी पाहण्यासाठी तो एका खेड्यात थांबला. त्यावेळी एका दुकानात सोहनीवर त्याची नजर पडली. त्यावेळी सोहनी आपल्या वडिलांनी तयार केलेल्या मडक्यांवर कलाकृती करण्यात मग्न होती. पहिल्या नजरेतच राजकुमार इज्जतच्या मनावर तिने वार केला होता. तो सर्वकाही विसरून फक्त तिला पाहण्यात हरवून गेला. तो दुकानाजवळ गेला. सोहनी आपल्या कामात अजूनही व्यस्तच होती. त्याने सोहनीला विचारले, "तुझा हातातील मडके कितीला मिळेल?" त्यावेळी तंद्री तुटून सोहनी म्हणाली, "हे मडकं अजून कच्च आहे, त्याला भाजावं लागेल, त्यावर अजून खूप काम बाकी आहे."  यावर इज्जत म्हणाला, "ठीक आहे, हे मडके घेण्यासाठी मी उद्या पुन्हा येईल." सोहनीने मान हलवूनच होकार कळवला. यानंतर, तो सोहनीची फक्त झलक पाहण्यासाठी दररोज सोहनीकडे नवनवीन भांडे खरेदी करण्यासाठी येऊ लागला.

सोहनीच्या देखील ही गोष्ट लक्षात आली होती. तिला देखील त्याचं असं रोज येऊन भेटणं, लपून गालात हसणं, आवडू लागलं होतं. ती देखील त्याच्याकडे आकर्षित झाली होती.  कुण्या दिवशी जर इज्जतला येण्यास उशीर झाला, तर सोहनी बैचेन होत असे. तिला त्याच्याबद्दल काळजी वाटत असे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात कधी पडले, त्यांनाही कळालं नाही. दोघांना एकमेकांची ओढ लागली होती. त्यामुळे बखारच्या दिशेने निघालेला इज्जत त्या गावातच थांबला. बोलतात ना, खऱ्या प्रेमात माणूस काहीही करू शकतो, आपल्या प्रेमाला पाहण्यासाठी आणि मिळविण्यासाठी जगातील सर्व सुख त्यागू शकतो. त्याचप्रमाणे उज़्बेकिस्तानच्या बखाराच्या राजकुमाराने सोहनीला मिळविण्यासाठी राजवाड्यातील सुख-समृद्धीचं आयुष्य सोडून छोट्या खेड्यात राहणं पसंत केलं. त्याने सर्वांपासून आपली ओळख लपवली, आणि सामन्यांप्रमाणे तो राहू लागला.

सोहनीच्या जवळ राहण्यासाठी त्याने तिच्या वडिलांकडे काम करण्याचा निर्णय घेतला. एकदिवस तो सोहनीच्या वडिलांकडे काम मागण्यासाठी आला, सोहनीच्या वडिलांनी देखील त्याला आपल्या पाळीव प्राण्यांना चरायला नेण्याचं काम दिलं. त्याठिकाणी गुरे चरायला नेणाऱ्याला "महिवाल" म्हणत, त्यानावावरूनच इज्जतचे नाव "महिवाल" पडले. सोहनी देखील त्याला महिवाल या नावाने ओळखू लागली होती. महिवाल आपल्याच घरी काम करणार असल्याचं ऐकून तिलाही खूप आनंद झाला. आता दोघेही लपून एकांतात भेटू लागले होते. त्या भेटीमध्ये दोघेही हरवून जायचे, पुन्हा घरी परतण्याची त्यांची इच्छा होत नसे. मात्र दुसऱ्या दिवशीच्या भेटीच्या ओढीचा देखील तेवढाच आनंद त्यांना वाटू लागला होता. ते दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. वास्तविक पाहता महिवालला खात्री होती की, एक दिवस तो सोहनीला मिळवेल, आणि मग ते दोघेही लग्न करून आनंदात एकत्र आयुष्य जगतील. मात्र थोड्याच दिवसांत त्यांच्या आयुष्यात एक वादळ आलं. त्यांच्या भेटी-गाठीच्या चर्चा होऊ लागल्या. ही गोष्ट सोहनीच्या आई-वडिलांच्या कानावर पडली. त्यांना महिवालचा प्रचंड राग आला. त्यांनी महिवालला घरातून आणि कामावरून हाकलून लावले आणि सोहनीचे लग्न कुंभार घराण्यातील एका मुलासोबत ठरवलं. सोहनीला हे लग्न मान्य नव्हतं, तिने लग्नासाठी नकार दिला. मात्र तिच्या आई-वडिलांनी जबरदस्ती तिचं लग्न लावून दिलं. दुसरीकडे महिवाल सोहनीच्या आठवणीत इथेतिथे भटकत राहिला.

ज्यादिवशी सोहनीचं लग्न झालं, त्या दिवशी तो तिच्याघराजवळ येऊन बसला. तिला पालखीतून जाताना त्याने पहिले. तिला असं पाहून रडून-रडून त्याची अवस्था वाईट झाली होती. तर इथे लग्न होऊनही महिवालशिवाय सोहनी बैचेन होती. तिने त्या लग्नाचा आणि नात्याचा कधीच स्वीकार केला नाही. महिवाल सोहनीशिवाय जगू शकत नव्हता, त्याने सोहनीला स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पाठवलं. त्या पत्राचं उत्तर सोहनीने लिहून पाठवलं, "मी तुझी होती, आणि तुझीच राहील." हे पत्र मिळताच दोघांनी घरच्यांनपासून लपून भेटण्याचा निर्णय घेतला. एवढ्या दिवसाच्या भेटीनंतर दोघांचंही आतुर झालेलं प्रेम भरून आलं होत.

सोहनीचा नवरा व्यापारी होता, तयार केलेले मडके आणि भांडी आजूबाजूच्या शहरांत जाऊन तो विकायचा. त्यामुळे सोहनीसाठी घरातून बाहेर पडणं सोयीस्कर होतं. रोज रात्री चिनाब नदीच्या किनारी एका झाडाखाली महिवाल सोहनीची वाट बघत असे. सोहनीला पोहता येत नव्हतं, तिने मडक्याच्या सहाय्याने नदी पार करण्याचं ठरवलं. जसं महिवालने सोहनीला किनाऱ्याजवळ पोहचताना पाहिलं, त्याला खूप आनंद झाला. त्याने सोहनीला हात देऊन बाहेर काढण्यासाठी तिची मदत केली. दोघेही खूप दिवसांनी एकांतामध्ये भेटले होते, दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. दोघेही रात्रभर आपल्या जुन्या प्रेमाच्या आठवणींमध्ये रमले. कधी-कधी त्यांना वेळेचं देखील भान राहत नसे. अशाच पद्धतीने रोज अंधाऱ्या रात्री सोहनी पाण्याच्या मडक्याच्या सहाय्याने चिनाब नदी पार करून महिवालला भेटायची. जगाला विसरून ते आपल्या प्रेमाचे क्षण जगत होते. मात्र त्यांना माहित नव्हतं, पुढे त्यांच्यासाठी नशिबाने काय लिहून ठेवलं आहे.

त्यांच्या या भेटीची चर्चा हळूहळू सर्वत्र पसरत होती. एकदिवस ही गोष्ट सोहनीच्या वाहिनीच्या लक्षात आली. तिला सोहनीवर संशय आला. सोहनीचा पाठलाग केला असता, तिला सर्व गोष्ट लक्षात आली. तिने याबाबत सर्व माहिती सोहनीच्या सासूला सांगितली. ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगण्यापेक्षा सोहनीच्या सासू आणि वाहिनीने तिलाच जीवे मारण्याचा निर्णय घेतला. सोहनीला पोहता येत नाही, ही गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती होती. दुसऱ्या दिवशी ज्या मडक्याच्या सहाय्याने सोहनी नदी पार करून महिवालला भेटायची ते मडके तिच्या सासू आणि वाहिनीने लपवले आणि त्या जागी कच्चे मडके ठेवले. घरातून बाहेर पडल्यावर ही गोष्ट सोहनीच्या लक्षात आली होती. मात्र तरीही महिवालच्या भेटीच्या ओढीने ती घराबाहेर पडली. नदीकिनारी पोहोचताच ती पाण्यात उतरली आणि रोजप्रमाणे मडक्याच्या सहाय्याने पुढे-पुढे जाऊ लागली. मडके कच्चे असल्याने पाण्याच्या संपर्कात येताच ते विरघळू लागले. महिवाल दूरवरून सोहनीकडे पाहत होता. अर्ध्यावर येताच मडके पूर्णपणे पाण्यात वाहून गेलं होतं. पोहता येत नसल्याने सोहनी नदीत बुडू लागली होती, हे पाहताच महिवालला काय करावे सुचेनासे झाले. सोहनी बुडत असल्याचं पाहताच त्याने देखील सोहनीला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र महिवालला देखील पोहता येत नव्हते. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. दुसऱ्यादिवशी दोघांचेही एकमेकांना मिठी मारलेले मृतदेह किनाऱ्यावर येऊन पोहचले होते. त्यानंतर त्यांच्या प्रेमाची जगभर चर्चा झाली. हे दोन प्रेमी जिवंतपणी नाही तर मृत्यूनंतर एक होऊन अमर झाले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News