सेल्फ ड्राईव्ह आणि ‘शेअर्ड मोबिलिटी’ हा तंतोतंत जुळणारा पर्याय आहे...

ओंकार भिडे
Thursday, 6 June 2019

भारतीय वाहन बाजारपेठेच्या संक्रमणावस्थेला स्थानिक व जागतिक घटक परिणाम करणारे ठरले आहेत. वैयक्तिक वाहन वापराचे प्रमाण वाढल्याने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे.

भारतीय वाहन बाजारपेठेच्या संक्रमणावस्थेला स्थानिक व जागतिक घटक परिणाम करणारे ठरले आहेत. वैयक्तिक वाहन वापराचे प्रमाण वाढल्याने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीस खतपाणी मिळत आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवरील विकसित बाजारपेठांमध्ये वैयक्तिक वापरासाठी प्राधान्याने डिझेल वाहनांवर बंधने आणण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पेट्रोललाही पर्याय ठरू शकतील, असे पर्याय विकसित झाले आहेत. त्यातूनच इलेक्‍ट्रिक वा बॅटरीवरील वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय वाहन बाजारपेठेच्या संक्रणावस्थेबाबत महत्त्वाच्या घडलेल्या गोष्टी म्हणजे देशात महानगरे, मध्यम व लहान आकाराच्या शहरांमध्ये वैयक्तिक वाहनांचा वापर वाढल्याने वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब होत चालली आहे. त्यामुळेच वाहन विकत घेण्यापेक्षा जेवढा वापर तेवढेच पैसे मोजायचे (सेल्फ ड्राईव्ह) असा विचार वाढू लागला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध असणारा ‘शेअर मोबिलिटी’ किंवा ‘कॅब अग्रिगेटर’चा पर्याय भारतीय तरुणांना सोईचा वाटू लागला आहे, असे एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. तसेच इंधनदरात होणारी वाढ, वैद्यकीय-शिक्षण खर्चातील वाढ, केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक मोबिलीटीबाबतच्या धोरणांमुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला आहे.

‘शेअर्ड मोबिलिटी’ला प्राधान्य
आगामी काळात इलेक्‍ट्रिक वाहनांचा टक्का वाढणार असल्याने भारत २०३० मध्ये जगातील सर्वांत मोठी शेअर्ड मोबिलिटीची बाजारपेठ बनणार असल्याचा अंदाज आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येत ८५ कोटी जनता ही ३५ वर्षांच्या खालील असल्याचे जागतिक बॅंकेकडील आकडेवारीवरून समजते. तरुणांकडून प्रामुख्याने नवी विचारणारी आत्मसात करण्याला प्राधान्य असते. तसेच त्यांच्याकडून कार विकत घेण्याचे प्रमाण कमी असले आणि मोबिलिटीचे नवे पर्यायांचा स्वीकार तरुणांकडून होण्याची शक्‍यता अधिक आहे. वाढत्या क्रयशक्तीमुळे शेअर्ड मोबिलिटीवर खर्च करण्याची प्रवृत्ती वाढणार आहे. तसेच, भारातील आर्थिकस्तर वेगवेगळे असल्याने स्वयंरोजगाराचे साधन म्हणून ड्रायव्हरही उपलब्ध होणार आहेत. पुढील दहा वर्षांत भारतातील शेअर्ड मोबिलिटीची व्याख्याही टॅक्‍सीवरून ‘इंटरनेट बेस्ड मोबिलिटी’ म्हणजे ॲपवर आधारित सेवेकडे जाणार आहे, असे मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात नमूद केले आहे.  

वाहतूक कोंडी चिंताजनक
मॉर्नग स्टॅन्लेच्या अहवालानुसार,  भारतात २०१७ मध्ये वाहनांनी २५७ अब्ज मैल अंतर पार केले. त्यापैकी १० टक्के प्रमाण हे शेअर्ड मोबिलिटी म्हणजे टॅक्‍सी व ॲपवर आधारित सेवेचे होते. २०३० मध्ये देशातील शेअर्ड मोबिलिटीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचणार असून, २०४० मध्ये ते ५० टक्‍क्‍यांवर जाण्याचे भाकीत आहे. देशातील नोंदणीकृत वाहनांची संख्या गेल्या दोन दशकांत चारपटीने वाढली असून, कोटींच्या घरात एकआकडी संख्येवरून दुहेरी संख्येत पोहोचली आहे. यामुळेच वाढती वाहतूक कोंडी आणि बदलत्या मानसिकतेमुळे शेअर्ड मोबिलिटी वाढणार आहे. तसेच केंद्र सरकारकडूनही मध्यम आकाराच्या शहरांतून सार्वजनिक वाहतूक सेवेचे नवे पर्याय पुढे येणार आहेत.

सेल्फ ड्राईव्हचा पर्याय
दहा वर्षांपूर्वी भारतात ‘सेल्फ-ड्राईव्ह व्हेईकल’ हा पर्याय नव्हता. मात्र झूमकार, सेल्फ-ड्राईव्ह, ड्राईव्ह-ईझी अशा कंपन्यांकडून सेल्फ-ड्राईव्हचे पर्याय सुरू झाले आहेत. झूमकारचा वापर सुमारे १.५ कोटी लोकांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात स्वतःचे वाहन घेण्याऐवजी शेअर्ड मोबिलिटीकडे तरुणांचा कल अधिक असणार आहे, हेच स्पष्ट होते. वाहन कंपन्यांनाही बदल चाललेल्या मानसिकतेचा ठाव लागला आहे. त्यामुळेच पब्लिक शेअर्ड मोबिलिटी व शेअर्ड मोबिलिटीची सेवा देणाऱ्या कंपन्यांशी काही वाहन कंपन्यांनी चर्चा करून इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी बाजारपेठ शोधण्यास सुरुवातही केली आहे. त्यानुसार कार विकत घेण्यापेक्षा कॅब वापरणे जास्त फायद्याचे आहे, असे शेअर्ड मोबिलिटी सातत्याने वापरणाऱ्यांना वाटत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News