शाब्बास शमी भाई

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 October 2019
  • शमीने वर्ल्ड कपपासून केलेली कामगिरी विलक्षण मानली पाहिजे. गहुंजे येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका कर्णधार फाफ डू प्लेसी याने मानपत्र, तर यजमान कर्णधार विराट कोहली याने प्रमाणपत्र दिले.

प्रत्येक क्रीडापटूच्या कारकिर्दीत दोन प्रकारचे प्रमुख अडथळे येतात. पहिल्या प्रकारचा धक्का बसतो तो बॅड पॅचमुळे. त्यावर मात करता येते. दुसऱ्या प्रकारचा व्यत्यय येतो तो दुखापतीमुळे, ज्यासाठी केवळ प्रतीक्षा करणे अटळ असते. याशिवाय आणखी एक अडथळा येऊ शकतो. त्यामुळे खेळाडूच्या सहभागावर परिणाम होत नाही; पण कामगिरीवर मात्र नक्की होऊ शकतो. हा अडथळा असतो खासगी जीवन.

अमेरिकेचा टेनिसपटू आंद्रे अगासी याचे ब्रुक शील्ड्‌सबरोबर बिनसले, तर अमेरिकेचाच गोल्फपटू टायगर वूड्‌स विवाहबाह्य संबंधांमुळे वादात सापडला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज महंमद शमी याच्याकडे वळूयात. आपल्याला त्याच्या खासगी जीवनात जास्त डोकावायचे नाही. फक्त त्याची पत्नी हसी जहाँ हिने शमीवर असंख्य आरोप केले आहेत. यातील लेटेस्ट आरोपानुसार शमीचे हात फार वरपर्यंत पोहोचले आहेत, असा दावा तिने केला होता. शमीला आयरा नावाची गोड मुलगी आहे आणि तिच्यापासून दूर राहावे लागणे शमीसाठी सर्वाधिक वेदनादायक आहे.

या पार्श्वभूमीवर शमीने वर्ल्ड कपपासून केलेली कामगिरी विलक्षण मानली पाहिजे. गहुंजे येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका कर्णधार फाफ डू प्लेसी याने मानपत्र, तर यजमान कर्णधार विराट कोहली याने प्रमाणपत्र दिले. फाफची प्रतिक्रिया जास्त महत्त्वाची आहे. याचे कारण कोणताही व्यावसायिक क्रीडापटू प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करताना ते तोंडदेखले कदापि नसते.

क्रिकेटच्या खेळात संघाच्या दुसऱ्या आणि सामन्याच्या चौथ्या डावातील कामगिरी महत्त्वाची असते. त्यातही गोलंदाज काय करतात, यावर निकाल अवलंबून असतो. अशावेळी शमीने दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला. पहिल्या डावात आफ्रिकेने १३१.२ षटके किल्ला लढविला होता. खेळपट्टी फिरकीला कितीही मदत करणारी असली आणि अश्विन-जडेजा दुकलीला कितीही टप्पा सापडला असला, तरी वेगवान गोलंदाजाने चालना देणे आवश्‍यक होते. यासाठी शमीने पुढाकार घेतला. त्याने मध्य फळीत फाफसह तीन मोहरे टिपले, तर दोन विकेट घेत शेपूट ठेचले.

शमीच्या या जिगरबाज कामगिरीला फाफने दिलेली दाद उत्स्फूर्त होती. शमी टिच्चून मारा करीत होता, असा त्याच्या शब्दाचा आशय होता. दुसरीकडे विराट म्हणाला की, शमी आता परिपक्व झाला आहे. जसप्रीत बुमरा दीर्घकाळ जायबंदी झाल्यामुळे भारताला ब्रेक थ्रू देणारा गोलंदाज कोण असा प्रश्न निर्माण झाला होता; पण शमीने या प्रश्नावर उत्तर म्हणून आपला पर्याय असेल हे दाखवून दिले. मायदेशात शमीइतका परिणामकारक सीम करणारा दुसरा गोलंदाज आपल्या पाहण्यात नाही, हे विराटचे विधानही महत्त्वाचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News