लॉकडाऊनला संधी म्हणून पाहत मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतला 'हा' निर्णय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • मुंबई शहर उपनगरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. मात्र, सरकारी आणि खासगी कार्यालये काही प्रमाणात सुरू आहेत.

मुंबई : मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी आता लॉकडाऊनला संधी म्हणून पाहत खाणावळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दक्षिण मुंबईतील चाकरमान्यांसाठी मुंबई डबेवाला असोसिएशनने खाणावळ सुरू केली आहे. लॉकडाऊननंतर उर्वरित भागांतही ही सेवा दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एरव्ही फक्त घरचा जेवणाचा डबा पोहचविणारे डबेवाले आता स्वत:चे गरमागरम जेवणही उपलब्ध करून देणार आहेत.

मुंबई शहर उपनगरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. मात्र, सरकारी आणि खासगी कार्यालये काही प्रमाणात सुरू आहेत. हॉटेल आणि उपाहारगृहदेखील मर्यादित स्वरूपात सुरू आहेत. त्यामुळे चाकरमान्यांसाठी मुंबई डबेवाला असोसिएशनने खाणावळीची विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेच्या वतीने दुपारच्या जेवणाचा डबा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात दुचाकीवरून पोहचविण्यात येणार आहे. सध्या ही सेवा दक्षिण मुंबईमध्ये सुरू करण्यात आली आहे. चपाती, भात, वरण, भाजी, लोणचे आदीचा यामध्ये समावेश आहे आणि सर्व स्वच्छता पाळून पदार्थ बनविले जातात, असे असोसिएशनचे दत्तात्रय ढेरंगे यांनी सांगितले. लॉकडाऊन संपल्यानंतर उर्वरित भागांमध्ये ही सेवा पुरविण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे डबे बंद
लॉकडाऊनमुळे डबे बंद झाले. त्यामुळे अनेक जण पर्यायी कामे करीत आहेत. सध्या लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये चाकरमान्यांची खाण्याची आबाळ होऊ नये म्हणून आम्हीदेखील खाणावळी सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे दत्तात्रय ढेरंगे यांनी सांगितले. तसेच, सेवेचा लाभ घेण्यासाठी अजय वाळुंज (9702765636), दत्ता ढेरंगे (7303911900) येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

...........................

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News