मुंबई विद्यापीठाची सुरक्षा चव्हाटयावर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

संकुलात सुरक्षा रक्षक असतानाही चोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याने विद्यार्थी आणि कर्मचारी हैराण झाले आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात चोरट्यांनी कहर केला आहे. विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या खिशावर चोर वारंवार डल्ला मारत असतानाही चोरीचे प्रकार रोखण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही. संकुलात सुरक्षा रक्षक असतानाही चोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याने विद्यार्थी आणि कर्मचारी हैराण झाले आहेत. या चोराच्या मुसक्‍या प्रशासनाने तातडीने आवळाव्यात, अशी आर्जवे विद्यार्थी, कर्मचारी करत आहेत. कलिना संकुलातील विभागांमध्ये सीसीटीव्ही नसल्याने येथे येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यापूर्वी विद्यापीठात एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला; मात्र सीसीटीव्हीअभावी या प्रकरणाचा छडा लागला नाही.

कर्मचाऱ्यांचे पॅकेट, घड्याळ, सोन्याचे दागिने अशा अनेक वस्तूंवर चोर डल्ला मारत आहेत. याबाबत लाईफ सायन्स विभागाने बीकेसी पोलिसात तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी एका बाहेरील व्यक्तीला अटक करण्यात आली; परंतु यानंतर पुन्हा या विभागात चोऱ्यांचे प्रकार होऊ लागले आहेत. यामुळे विद्यार्थी, कर्मचारी हतबल झाले आहेत. या प्रकारांची गंभीर दखल घेण्याची विनंती विद्यार्थी, कर्मचारी विभागप्रमुखांकडे करत आहेत; परंतु त्यांच्याकडून कोणतीच पावले उचलण्यात येत नसल्याचा आरोप होत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News