गोरखगडाचे रहस्य...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 April 2020

गॅझेटर आणि इतर कागदपत्रात याचा किल्ला म्हणून कुठेही उल्लेख सापडत नसला तरी त्यावर असलेल्या खोदिव गुहा, पाण्याची टाक इत्यादी अवशेष पाहाता हा एकेकाळी टेहळणीचा किल्ला असावा.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळ अंकाई टंकाई हे दोन प्रसिध्द जोड किल्ले आहेत. त्या किल्ल्यांपासून ३ किमी अंतरावर आंबेवाडी गावात गोरखनाथाचा डोंगर नावाच एक तिर्थक्षेत्र आहे. गॅझेटर आणि इतर कागदपत्रात याचा किल्ला म्हणून कुठेही उल्लेख सापडत नसला तरी त्यावर असलेल्या खोदिव गुहा, पाण्याची टाक इत्यादी अवशेष पाहाता हा एकेकाळी टेहळणीचा किल्ला असावा. अंकाई आणि टंकाई वरील ब्राम्हणी लेण्यांचा आणि किल्ल्याचा निर्मितीचा काळही एकच असण्याची शक्यता आहे. 

पुढील काळात अंकाई टंकाई किल्ल्याचे महत्त्व वाढल्यावर या किल्ल्याचा वापर कमी झाला असावा आणि त्याचा ताबा नाथसंप्रदायाकडे गेला असण्याची शक्यतांच्या जंगलात न शिरताही या प्राचीन डोंगर चढाईचा त्यावरील अवशेषांचा आनंद घेऊ शकतो. 

अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहून निघून पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासून ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसऱ्या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहून होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. 

पाहण्याची ठिकाणे :- 

किल्ल्याच्या पायथ्याशी एक मोठा वट वृक्ष आहे. त्याखाली नाथपंथीयांच्या काही समाध्या आहेत. इथूनच गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढताना उजव्या बाजूला दोन नक्षीदार समाध्या आहेत. किल्ल्याच्या पाव उंचीवर गेल्यावर पायऱ्या संपतात. त्यानंतर ओबडधोबड पायवाटेने अर्धातास चढल्यावर आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. इथे उजव्या बाजूला जाणारी पायवाट गोरखनाथांच्या गुहेपाशी जाते. ही गुहा खोलवर कोरलेली असून त्यात नाथपंथीय साधुंच्या मुर्ती आहेत. 

ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून पाच मिनिटे चढून गेल्यावर आपण डोंगराच्या कातळकड्या खाली असलेल्या गुहांपाशी पोहोचतो. इथे एक मोठी गुहा कोरलेली आहे. गुहेच्या उजव्या बाजूला कानिफनाथांची गुहा आहे. ती पाहून पायऱ्यांपाशी येऊन डाव्या बाजूला चालायला सुरूवात केल्यावर पाण्याच टाक पाहायला मिळत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे एक मोठी गुहा आहे. त्याच्या पुढे डोंगराच्या पाश्चिम टोकावर असणाऱ्या नेढ्या पर्यंत जाण्यासाठी कातळकडा उजव्या बाजुला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत १० मिनिटे चालल्यावर आपण कातळकड्याच्या टोकाला येतो. 

इथून १०-१२ फुटाचा कातळटप्पा चढल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते. इथे कुठलेही अवशेष नाहीत, इथे एक भगवा झेंडा लावलेला आहे. तो दर गुरूपौर्णिमेला बदलला जातो. किल्ल्याच्या माथ्यावरून अंकाई-टंकाई, कात्रा आणि मेसणा हे किल्ले दिसतात. कातळ टप्प्यावरून उतरल्यावर समोरच्या पठारावर दिसणाऱ्या नेढ्या पर्यंत चालत जाण्यास १५ मिनिटे लागतात. नेढ जवळून पाहून आल्या मार्गाने परत येऊन किल्ला उतरावा. 

किल्ल्याच्या गुहे पुढचा मार्ग मळलेला नाही आहे. त्यामुळे तो चिंचोळा टप्पा फार जपून पार करावा लागतो. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी असलेला कातळटप्पा चढण्यासाठी रोप आणि गिर्यारोहणासाठी वापरले जाणारे साहित्य असणे सुरक्षेच्या दुष्टीने आवश्यक आहे. किल्ला चढायला पाऊण तास आणि पूर्ण किल्ला बघायला एक तासांचा कालावधी लागतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News