शिवनेरी किल्ल्याचे 'हे' आहे रहस्य 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020
  • शिवनेरी हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे 105 किलोमीटर अंतरावर आहे.
  • शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असल्याने त्याला मराठ्यांकडून कोणालाच जिंकता आला नाही. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर आणि जिजाबाई तसेच बाल-शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आहेत.

या किल्ल्यांचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर यांने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

'जीर्णनगर', 'जुन्नेर' म्हणजे जुन्नर हे गाव इसवीसनपूर्व काळापासून प्रसिध्द आहे. ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.

सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य आणि राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स.1443 मध्ये मलिका-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला.

इ.स. 1470 मध्ये मलिका-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महमंद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. 1446 मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे 1493 मध्ये इथली राजधानी गडावरून अहमनगरला हलवण्यात आली. इ.स.1565 मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.

यानंतर इ.स.1595 मध्ये किल्ला आणि जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजींनी त्यांना 500 स्वार सोबत देऊन रातोरात शिवनेरी नेले. 'शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाईस जिजाऊंनी नवस केला "जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन." शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी, इसवी सन 1630.

इ.स.1632 मध्ये जिजाबाईंनी बालशिवाजीसह गड सोडला आणि 1637 मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. 1650 मध्ये मोगलांविरूध्द येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. 1673 मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. इ.स. 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे 38 वर्षानंतर 1716 मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला आणि नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

शिवाई देवी मंदिर :- 

सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येताना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर शिवाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात 6 ते 7 गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे.

अंबरखाना :-

शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आज मितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा अपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकडावर जाते. या टेकडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.

पाण्याची टाकी :- 

वाटेत गंगा, जमुना आणि याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. 

शिवकुंज :-  

हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. याची स्थापना आणि उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांनी केले. जिजाबाईंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी, हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आविर्भावातील मायलेकरांचा पुतळा शिवकुंजामध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याची एक टाकी आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.

शिवजन्मस्थान इमारत :-  

शिवकुंजापासूनच पुढे शिवजन्म स्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेथे त्यांचा एक पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच बदामी नामक पाण्याची टाकी आहे.

कडेलोट :- 

येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीचा हा सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.

गडावर जाण्याच्या वाटा :- 

गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

साखळीची वाट :-

या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पाऱ्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

सात दरवाज्यांची वाट :- 

शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News