इतिहासात दुसऱ्यांदा 'ही' स्पर्धा रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

15 ऑगस्ट 1989 पासून सुरू झालेली ही मॅरेथॉन न होण्याचे हे केवळ दुसरे वर्ष आहे. यापूर्वी 15 ऑगस्ट 1990 या दिवशी होणारी मॅरेथॉन ठाण्यात सर्वत्र पाणी साचल्यामुळे रद्द करणे भाग पडले होते.

मुंबई : तीन दशकांच्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन इतिहासात केवळ दुसऱ्यांदा ही स्पर्धा होणार नाही. राज्य स्तरावर होणाऱ्या पावसाळ्यातील स्पर्धेची ऍथलीटस्‌ आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात; मात्र या वेळी कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा होणार नाही.

कोरोनाची साथ रोखण्यासाठी सुरक्षित अंतर आवश्‍यक असल्याने अनेक गोष्टींना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे यंदा ठाणे महापौर मॅरेथॉन होणार नसल्याचे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. 15 ऑगस्ट 1989 पासून सुरू झालेली ही मॅरेथॉन न होण्याचे हे केवळ दुसरे वर्ष आहे. यापूर्वी 15 ऑगस्ट 1990 या दिवशी होणारी मॅरेथॉन ठाण्यात सर्वत्र पाणी साचल्यामुळे रद्द करणे भाग पडले होते, अशी आठवण ऍथलेटिक्‍सचे सांख्यिक तज्ज्ञ रमेश खारकर यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी 17 डिसेंबर 2006 या दिवशी ठाणे मॅरेथॉन संयोजकांनी 178 ठिकाणी महामॅरेथॉन घेतली होती, याचीही आठवण करून दिली. हा अपवाद सोडल्यास दरवर्षी पावसाळ्यातच ही मॅरेथॉन झाली आहे.

तीस हजार स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत सुरक्षित अंतर राखणे अवघड होईल. तसेच स्पर्धकांनाही ठाण्यात येणे सुलभ नाही. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठाणे आणि परिसरातील शाळातील विद्यार्थ्यांचा सहभाग हे असते. मात्र अद्याप शाळाच सुरू झालेल्या नाहीत. एकंदरीत सर्व विचार करून ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News