अभियांत्रिकी प्रवेश घेताना असे होते जागावाटप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या अगदी नगण्यच असते

आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या अगदी नगण्यच असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यातील विद्यार्थी हा प्रामुख्याने एमएचटी-सीईटीमधूनच प्रवेशासाठी इच्छुक असतो. जेईईच्या हट्टापायी एमएचटी-सीईटीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कमी गुण असूनही विद्यार्थी प्रवेशाची अपेक्षा करतो ती, एकदम टॉप संस्थांची किंवा ठरावीक शाखेचीच. एकूण उपलब्ध जागांची संख्या भरपूर असल्यापेक्षा स्वतःच्या वाट्याला किती जागा येतील हेच महत्त्वाचे असते.
 

उपलब्ध जागा - 
मागील वर्षाप्रमाणे राज्यात शासकीय, स्वायत्त व खासगी संस्थांमधून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगच्या सुमारे २७४ संस्थांमधून १ लाख ११ हजार व बीटेकच्या ७५ संस्थांमधून २८ हजार ५०० जागा अशा एकूण १ लाख ४० हजार जागा उपलब्ध होतात. राज्यात एकूण १२ विद्यापीठे असून पुणे विद्यापीठातून ४४ हजार ३०० जागा उपलब्ध होतात.

जागावाटप
एचयू (होम युनिव्हर्सिटी)

विद्यार्थी बारावी परीक्षा ज्या संस्थांमधून देतो, ते क्षेत्र ज्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येते, ती त्याची होम युनिव्हर्सिटी असून त्यामधील ७० टक्के जागा त्यास प्रवेशासाठी उपलब्ध होतात. स्वतःच्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३० टक्के कोट्यातून मात्र त्यास प्रवेश घेता येत नाही. 
    
ओएचयू (अदर दॅन होम युनिव्हर्सिटी) -
राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला स्वतःच्या विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील उर्वरित कोणत्याही विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संस्थेमधून कोणत्याही अभ्यासक्रमासाठी ३० टक्के जागांमधून प्रवेश घेता येतो.

ऑल इंडिया कोटा -
राज्यातील फक्त खासगी महाविद्यालयातील १५ टक्के जागा जेईई मेन-२०१९ मधून, ज्यांनी प्रवेशासाठी १५ टक्केतून मागणी केलेली आहे, त्यांना मेरीटनुसार देण्यात येतात. सर्व जागा या खुल्या प्रवर्गातून भरल्या जातात. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश मिळाला तरीही फी सवलत मिळू शकते. सर्व जागा या राज्यस्तरावर भरल्या जातात. ७०-३० असे वाटप नसते. 

राज्यस्तरीय कोटा -
राज्यातील शासकीय तसेच स्वायत्त संस्थांमधील जागावाटप १०० टक्के राज्यस्तरीय पातळीवर होते. उदा : सीओईपी येथील संस्थेत ७० टक्के ३० टक्के व जेईईचा १५ टक्के असे वाटप नसून १०० टक्के जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतात. 

खासगी संस्था जागावाटप -
खासगी संस्थांमध्ये मेकॅनिकलच्या ६० जागा गृहीत धरल्यास त्यामधून २० टक्के जागा हा संस्थेचा कोटा, १५ टक्के जागा ऑल इंडिया कोटा व उर्वरित ३९ जागा या कॅप राऊंडमधून उपलब्ध होतात. ३९ पैकी ३० टक्‍क्‍यांनुसार १२ जागा व ७० टक्‍क्‍यांनुसार २७ जागा असे वाटप होते. त्यानंतर एससी-एसटी, व्हिजे, एनटी-१, एनटी-२, एनटी-३, ओबीसी, एसईबीसी व इडब्ल्यूएस असे राखीव जागांचे वाटप होते. प्रत्येकामध्ये ३० टक्के समांतर आरक्षण मुलींसाठी आहे.

शासकीय व खासगी संस्थांमध्ये अपंग प्रवर्गासाठी आरक्षण आहे. प्रत्येक संस्थेमध्ये ट्यूशन फी व्हेव्हर्स स्कीमअंतर्गत ३ जागा अतिरिक्त उपलब्ध होतात. अनेक खासगी संस्थांनी आपला २० टक्के संस्था पातळीवरील कोटा शासनाकडे कॅप राऊंडसाठी वर्ग केलेला आहे. प्रवेश प्रत्येकालाच मिळणार आहे, यंदाही भरपूर जागा रिकाम्या राहणार आहेत. राज्यात एकूण १.४०. लाख जागा, १२ विद्यापीठे व त्यामध्ये जवळपास ७७ कोर्सेस उपलब्ध आहेत. कमी गुण मिळाले तरीही मला मॅकेनिकलच पाहिजे असा विद्यार्थ्यांचा अट्टाहास असतो. पुणे विद्यापीठात मॅकेनिकलच्या सुमारे १३ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत.

त्यामुळे मला सहज प्रवेश मिळेल असा विश्‍वास प्रत्येकाला वाटतो. प्रत्यक्षात या एकूण जागांमधून ६५ टक्के जागा कॅप राऊंडमधून उपलब्ध होतात. त्यामधून ७० टक्केच्या सुमारे ६ हजार जागा उपलब्ध होतात. यामध्ये पुन्हा १८०० मुली व ४२०० मुले असा वाटा असतो व नऊ राखीव आरक्षणाचे गट असतात. याचा विचार करता एकूण जागेच्या तुलनेत आपल्याला अल्प जागा उपलब्ध होतात. म्हणून इतरही शाखांचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. सद्यःस्थितीत संकेतस्थळावर म्हणजेच www.mahacet.org वर मागील वर्षीचे कट-ऑफ नुकतेच उपलब्ध झालेले आहेत, त्याचा अभ्यास करावा. प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी संकेतस्थळावर संस्थानिहाय सर्व जागांचे वाटप जाहीर केले जाते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News