शाळा महाविद्यालये मातृभाषा संस्काराची केंद्रे असावीत : सुधीर गरड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

‘जैसी पुष्पामाजि पुष्प मोगरी, की परिमळामाजी कस्तुरी तैसी भाषा माजी साजरी.....मराठी "

औसा : ‘‘जैसी पुष्पामाजि पुष्प मोगरी, की परिमळामाजी कस्तुरी तैसी भाषा माजी साजरी.....मराठी ", असे मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोचविण्यासाठी आतला आवाज महत्वाचा असून पुरातन काळाचा वारसा असलेली ती आजही विविध अंगाने फुलत आहे. वाङमयीन प्रवाह आणि प्रकार तिच्या अंगाखांद्यावर फुलत आहेत. जीवनाची विविध अंगे ती आपल्या शब्द सामर्थ्याने आविष्कृत करीत आहे. परकिय भाषेच्या आक्रमणात तिची गळचेपी होणार नाही याची काळजी वर्तमानात घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये मातृभाषा संस्काराची केंद्रे होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा समीक्षक प्रा.सुधीर गरड यांनी व्यक्त केली.
श्रीकुमारस्वामी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कविता वाचन आणि गायन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.एम.बेटकर होते. यावेळी  ग्रंथपाल प्रा.अंबादास खिल्लारे, डॉ. संजय काळे, प्रा.रविंद्र कारंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.बेटकर म्हणाले, की शाळा, महाविद्यालयातील अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमापुरते यंत्रवत न बनता भाषेच्या बाबतीत पूरक उपक्रम राबविणे आवश्यक बनले आहे. अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन मातृभाषेला पोषक ठरतील असे जयंती , पुण्यतिथी यामध्ये निबंधलेखन, वक्तृत्व, काव्यलेखन, कथालेखन, काव्यवाचन, कथावचन, पत्रलेखन, कविकट्टा आदी स्पर्धांचे आयोजन सहजपणे करता येईल आणि यातून मातृभाषेच्या संस्कारातून उमलत्या वयाची पिढी पोसली गेली तर मायमराठीचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल.

कार्यक्रमात कवी कुसुमाग्रजांच्या विविध रसपूर्ण कवितांचे वाचन आणि गायन विद्यार्थ्यांनी केले. त्यात प्रामुख्याने अंकिता लोंढाळ, मशरत शेख, वर्षा भंगे, अवंती सोनटक्के, प्रदीप धुमाळ यांनी काव्यवाचन आणि गायन केले. प्रा. प्रसाद कदम यांनी प्रास्ताविक केले. रिंकु पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.रविंद्र कारंजे यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News