आरटीओने केली मोजक्याचं "स्कूल बस'ची तपासणी

आशा साळवी
Tuesday, 11 June 2019

जुन्या वाहनांची रंगरंगोटी करून त्यातून विद्यार्थ्यांची धोकादायकपणे वाहतूक केली जात आहे.  शालेय विद्यार्थी वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण राज्य शासनाने आखले. आरटीओ कडून नोंद असलेल्या वाहनांपैकी यंदा केवळ निम्म्याच वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. 

पिंपरी: विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने नसावे, असा नियम लागू केला आहे. मात्र, हाच नियम डावलून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीतून बाद झालेल्या जुन्या वाहनांची रंगरंगोटी करून त्यातून विद्यार्थ्यांची धोकादायकपणे वाहतूक केली जात आहे. शालेय वाहतुकीच्या दृष्टीने या वाहनांची नोंद कुठेही नाही. आरटीओ कडून नोंद असलेल्या वाहनांपैकी यंदा केवळ निम्म्याच वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. 

शालेय विद्यार्थी वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण राज्य शासनाने आखले. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग "स्कूल बस नियम 2010' तयार केले आहे. त्यातून स्कूल बससाठी स्वतंत्र नियमावली तयार केली असून विद्यार्थी वाहतूकीच्या दृष्टीने कडक नियम लागू केले. मात्र, विद्यार्थी शाळेच्या आवारात आल्यानंतरच शाळा त्याची जबाबदारी घेईल, अशी अनेक शाळांची भूमिका असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणारे वाहन कशा स्थितीत आहे, याची माहिती घेतली जात नाही. 

सहा महिन्यापासून व्हॅनची नोंदणी बंद 
शालेय बसच्या नियमावलीमध्ये बससह मारुतीची नवी ओमनी व इको या व्हॅनसह टाटा विगर, टाटा मॅजिक या प्रवासी वाहनांना विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाच फायदा अनेक मंडळींकडून घेतला जातो. त्यामुळे आरटीओने सहा महिन्यापासून "स्कूल व्हॅन' नोंदणी बंद केली आहे. कारण त्यांना शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेण्यासाठी संबंधित शाळेशी वाहतूकदाराला करार करावा लागतो. मात्र, अनेक शाळांना त्यात रस नसल्याने नियमबाह्य वाहतूक वाढली आहे. विशेषतः: उपनगरांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. आरटीओकडून वेळोवेळी रस्त्यावर शालेय विद्यार्थी वाहतुकीतील वाहनांची तपासणी केली जाते. काहींवर कारवाईही होत असली, तरी ही वाहतूक पूर्णपणे बंद झालेली नाही. जुन्या आणि काळा धूर ओकत चाललेल्या छोट्या वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविले जातात. 

विद्यार्थी वाहतूक नियमावली काय सांगते? 
या नियमावलीत शाळेचे प्रशासन, बसचा कंत्राटदार व प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्यात. या बसला पिवळा रंग व चालकाकडे पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव, बिल्ला आवश्‍यक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, विद्यार्थ्यांचे थांबे आदींची माहिती असणे, शालेय वाहनासोबत विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी "महिला सहायक'ची नेमणूक करणे बंधनकारक केले आहे. ही बस 15 वर्षांपेक्षा जुनी नसावी, असाही नियम आहे. परंतु ही नियमावली मोडीत काढून सर्रास वाहतूक केली जात आहे. 

जीवघेणे सीएनजी किट 
जुनी व प्रवासी वाहतुकीतून बाद झालेली वाहने रंगरंगोटी करून विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरली जात असतानाच या वाहनांना बसविण्यात येणारे सीएनजी किटही अनधिकृत असल्याने शालेय विद्यार्थी वाहतुकीचा धोका आणखी वाढला आहे. जुन्या वाहनांना नवे किंवा मान्यताप्राप्त कंपनीचे सीएनजी किट बसविण्यासाठी येणारा खर्च वाचविण्यासाठी हे प्रकार केले जात आहेत. वाहन दुरुस्ती क्षेत्रातील मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार भंगारात निघालेल्या वाहनांच्या सीएनजी किटचे विविध भाग जमा करून वाहनांना कमी किमतीत सीएनजी किट बसवून देणारी काही मंडळी शहरात आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी ते जीवघेणे ठरू शकते. 

इन्फोबॉक्‍स 
आकडे बोलतात 
-शाळा : 648 
-विद्यार्थी संख्या : 3 लाख 48 हजार 950 
-स्कूल बस : 2 हजार 79 
-समिती स्थापलेल्या शाळा : 250 

"उन्हाळी सुट्टीतच आरटीओकडून स्कूल बसची तपासणी करण्यात आलेली आहे. स्कूल बसमधून व्हॅन बाद करण्यात आल्याने, व्हॅनची नोंदणी सहा महिन्यापासून बंद केली आहे. ' 
-आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News