तरुणांच्या प्रसंगावधानामुळे खवले मांजराला मिळाले नवजीवन...

अमित गवळे
Wednesday, 8 July 2020

माणगाव वनविभाग, शिक्षक व तरुणांच्या सहाय्याने सुखरूप सोडले जंगलात

पाली : माणगाव तालुक्यातील तरुणांना विळे गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला सापडलेल्या खवले मांजराला मंगळवारी (ता.7) सायंकाळी माणगाव वनविभाग, शिक्षक व तरुणांच्या सहाय्याने तपासणी करून जंगलात सुखरूप सोडून नवजीवन देण्यात आले. 

 विळे गावाजवळील पेट्रोल पंपाच्या रस्त्याशेजारी मंगळवारी (ता.7) सायंकाळी एक खवले मांजर काही तरुणांना दिसले. वाहनांच्या धडकेत त्याचा मृत्यु झाला असता, तर कोणी त्याला पकडून तस्करी करण्यास देखील नेले असते. किंवा मारून मांस खाल्ले असते. म्हणून प्रसंगावधानता दाखवत या तरुणांनी ताबडतोब वनविभागाला कळविले.
    
यलवडे येथील तरुण हर्षद शिंदे, कल्पेश सोंडकर यांनी खवले मांजराला पाहिले व सुखरूप ठेवून वनविभागाला कळविले. मग विळे येथील वनरक्षक अमोल निकम, पाटनूस येथील वनपाल शंकर तांडेल तासगावच्या वनरक्षक वर्षा व्यवहारे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर स्थानिक निसर्ग अभ्यासक शिक्षक राम मुंढे, संदीप उघडा व सुभाष ओव्हाळ देखील तेथे गेले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी खवले मांजराची तपासणी करून तो सुरक्षित आहे याची खात्री केली. त्यानंतर पंचनामा करून त्याला वनविभागातील आरक्षित जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले. येलवडे, सणसवाडी व विळे येथील तरुण, वनविभागातील कर्मचारी व शिक्षक या सर्वांमूळे या खवले मांजराला नवजीवन मिळाले. एका लाजाळू प्राण्याला निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास मिळाला.  इंडियन पेंगोलिन नावाने ओळखले जाणारे हे खवले मांजर निशाचर असून मुख्यतः मुंग्या व वाळवी खातो. हा निसर्गाचा एक महत्वाचा घटक असून पर्यावरणामध्ये समतोल राखण्याचे काम तो जबाबदारीने पार पाडतो. असे स्थानिक निसर्ग अभ्यासक शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News