हृदयाला जपा... हृदयविकारापासून...

विशाल पाटील
Thursday, 9 May 2019

रक्‍त पातळ करण्याची गोळी जशी आयुष्यभर घेणे बंधनकारक असते तसेच जीवनशैलीतील योग्य बदल आयुष्यभर टिकविणे देखील तितकेचे महत्त्वाचे असते.

आधुनिक वैद्यकशास्त्राच्या वैज्ञानिक चमत्काराने लोकांना पुन्हा जगण्याची संधी मिळते. पण, रोगमुक्‍ती मिळते का? 

औषध आणि सर्जरीने हृदयरोगाच्या मुळावर घाला घातला जात नाही. फक्‍त तत्कालीन वरवरचा उपाय होतो. रोगनिर्मितीची मूळ कारणे तशीच कायम राहिल्याने अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीनंतर बऱ्याचदा पुन्हा रक्‍तवाहिन्या बंद होऊ शकतात. आपापल्या उपचार पद्धतीची जाहिरात व मोठे दावे करणाऱ्यांची जगात कमी नाही. भारतात तर भलेभले रामबाण उपाय आत्मविश्‍वासाने सांगणारे हौशी तसेच व्यावसायिक सल्ले ऐकाव्यास मिळतात; परंतु त्यावर किती संशोधन झाले आहे व त्यावरील संशोधनानंतर काय निष्कर्ष निघाला, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. आजकाल जाहिरातीच्या युगात आपण या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. 

हार्टऍटॅक हा शब्द तर मराठी भाषेत इतका रुजला आहे की, हृदय, हृदयविकार व हृदयविकाराचा झटका हे शब्द हल्ली सर्वांच्या चांगल्या परिचयाचे झाले आहेत. प्रसारमाध्यमांतील बातम्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्‍यानं मरण पावलेल्या एखाद्या प्रसिद्ध व्यक्‍ती संबंधीची बातमी अधूनमधून असतेच. एकंदरीत हाटऍटॅकच्या रोगाला आपण टरकून असतो. 

हृदयाच्या रक्‍तवाहिनीमध्ये सर्वसाधारणपणे जे ब्लॉकेजेस येतात ते दोन पद्धतीचे असतात. एक म्हणजे स्टेबल ब्लॉकेजेस. हे वयानुसार हळूहळू वाढतात. या ब्लॉकेजेसमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्‍यता कमी असते. हे ब्लॉकमुळे स्टेबल एन्जीना (stable angina) चा आजार येतो. श्रम केल्यानंतर छातीत दुखते व आराम केल्यानंतर थांबते. दुसऱ्या पद्धतीचे ब्लॉक म्हणजे अनस्टेबल किंवा untenable blochage (अस्थिर अडथळा) अशा ब्लॉकेजसमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असते तर चरबीचे प्रमाण जास्त असते. ब्लॉकेजेस रक्‍तवाहिनीमध्ये आतल्या आत फाटून हार्टऍटॅक घडवतात. 

हृदयाला रक्‍तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीजमध्ये एखादा अडथळा (ब्लॉक) निर्माण झाला की, या अडथळ्याला अँजिओप्लॉस्टीद्वारे स्टेंट घालून दूर करावे लागते किंवा ऑपरेशन करून बायपास करावे लागते. या दोनही उत्कृष्ट उपचार पद्धती आहेत आणि योग्य निवड केल्यास एका नव्या आयुष्याची सुरवात करून देण्याची क्षमता त्यामध्ये आहे. 

हार्टऍटॅक आल्यानंतर अशा पेशंटला ऍन्जिओप्लास्टीद्वारे ब्लॉक लवकरात लवकर खुले केल्यास अशा पेशंटना वेगवेगळ्या संशोधनामधून भरपूर फायदा दिसून आलेला आहे. यामुळे जिवावरचा धोका टळतो व याची पंपिंग पॉवर देखील वाढते. याद्वारे बऱ्याचशा रुग्णांना पुनरुज्जीवन मिळाले आहे. यातून बाहेर पडल्यानंतर काही रुग्ण नव्या उमेदीने व पूर्वीपेक्षा जास्त चांगले आयुष्य जगत असतात. काही रुग्ण मॅरेथॉन देखील धावतात तर काहीजण विविध क्रीडा क्षेत्रात आपले नाव मिळवतात. परंतु, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर रुग्ण त्यातून मानसिकदृष्ट्या बरा नाही झाला तर, बऱ्याचदा तो रडत रडत आयुष्य काढतो. त्याला वारंवार छातीत दुखू लागते व नवीन ब्लॉकेजेस येतात व परत परत हार्टऍटॅक येतात. 

कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे ज्या आजारामुळे हृदयविकाराचा झटका येतो तो आजार. ऍन्जिओप्लास्टी अथवा बायपास हे ब्लॉकेजेसना पर्यायी उत्तर आहे. 

पुन्हा हार्टऍटॅक येऊ नये... 
हृदयविकाराच्या दृष्टीनं धोक्‍याचे घटक म्हणजे उदा. कोलेस्टेरॉल, उच्च रक्‍तदाब, मधुमेह, धूम्रपान, स्थूलता, बैठी जीवनशैली, लिंग आणि वय, अनुवंशिकता हे असतात. त्याचबरोबर मानसिक ताण, जीवनशैली बदलाचा परिणाम, व्यायामाचा अभाव, आहार या गोष्टीमधील अयोग्य बदलांमुळे देखील हृदयाच्या रक्‍तवाहिन्यामुळे ब्लॉकेजेस यायला लागतात. 

1) कोलेस्टेरॉल 
आपल्या रक्‍तात असलेल्या कोलेस्टेरॉलपैकी 75 टक्‍के कोलेस्टेरॉल यकृतामध्ये तयार केले जाते आणि फक्‍त 25 टक्‍के कोलेस्टेरॉल पातळीमध्ये आहारातून मिळणाऱ्या कोलोस्टेरॉलमुळे फरक पडू शकतो. 
औषधांनी कोलेस्टेरॉल कमी करता येते आणि आवश्‍यक तेव्हा डॉक्‍टर रुग्णांना ही औषधे देतात. परंतु, औषधांपेक्षाही महत्त्वाचा म्हणजे आहार संपृक्‍त स्निग्धांशाचे प्रमाण कमी ठेवणे व असंपृक्‍त स्निग्धांश ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त ठेवल्यास कोलेस्टेरॉलची पातळी 150 ते 200 च्या दरम्यान ठेवण्यास मदत होते. 

2) उच्च रक्‍तदाब 
हा देखील सायलेंट आजार आहे. उच्च रक्‍तदाबाचे उपचार हे रक्‍तदाबाच्या आतड्यांना असते. त्रास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट नको, अशी बऱ्याच जणांची मनोधारणा असते. जर तुमचा रक्‍तदाब तुमच्या वयानुसार अपेक्षित रक्‍तदाबापेक्षा जास्त राहत असेल तर नक्‍कीच तो कमी केला पाहिजे. रक्‍तदाब कमी करण्याचे औषधाशिवायचे मार्ग असे : मीठ दिवसाकाठी चार ग्रॅम, संतुलित आहार, दुग्धजन्य पदार्थ व मांसाहार टाळणे, फळे, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य भरपूर खाणे, वजन नियंत्रणात आणणे, दररोज 35 ते 40 मिनिटे सकाळी धावणे, व्यायाम करणे, तंबाखू, मद्यपान बंद करणे. या जीवनशैलीतील बदलामुळे आपण रक्‍तदाबामध्ये अपेक्षित बदल घडवून आणू शकतो. 

3) मधुमेह 
पथ्य, व्यायाम व औषधे या उपायांनी मधुमेह नियंत्रणात ठेवावा. अनियंत्रित मधुमेहामुळे हृदयविकार होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. 
तुमच्या HbA1c च्या आकड्यांमध्ये जर एक टक्‍का बदल झाला तर 17 ते 20 टक्‍के हृदयरोगाचे प्रमाण कमी होते. 

4) निकोटीन 
याच्या सेवनाने गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया वेगाने वाढते. नवीन ब्लॉक वाढतात. त्यामुळे हे पदार्थ पूर्णत: न खाणे हे हृदयविकार थांबवण्याचा किंवा परतवून लावण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असते. 

5) लठ्ठपणा 
लठ्ठपणा व फारसे शारीरिक श्रम करावे न लागणारी दैनंदिन राहणी असणारी जीवनशैली या हृदयविकारांसाठी कारणीभूत ठरत असते. 

6) मानसिक ताणतणाव टाळावेत 
1960 ते 2010 या मागील 50 वर्षांतील हृदयविकाराचे उद्‌भवण्याचे भारतातील प्रमाण जर आपण पाहिले तर एक ते दोन टक्‍के असणारे प्रमाण 12 ते 15 टक्‍क्‍यांवर गेले आहे. या काळामध्ये बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव यांचा हृदयावर होणारा दुष्परिणाम आपल्याला दिसतो. पूर्वी 50 ते 60 नंतर दिसणारा आजार आजकाल 25 ते 35 वयामध्ये दिसायला लागला आहे. ज्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम, एकटेपणा टाळून कुटुंबासमवेत व मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेला वेळ नक्‍कीच तुम्हाला फायदा करून देतो. 

याच मुद्यांना घेऊन डॉ. डीन आर्निश यांनी काही रिसर्च केले आहेत. त्यामध्ये त्यांनी मानसिक ताणाची हाताळणी, स्ट्रेचेस, रिलॅक्‍सेशन, प्राणायाम, ध्यानधारणा, कल्पनाचित्रण, मानसिक जवळीक, एअरोटिक योग्य असा व्यायाम यांच्या सहाय्याने हृदविकार कमी होऊ शकतो व ब्लॉकेजेसची पिछेहाट होवू शकते असे सिद्ध करून दाखवलेले आहे.

लॅन्सेट या प्रसिद्ध परिपत्रकामध्ये त्याचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे हृदयविकार पारंपरिक पद्धतीने बरे करताना या जीवनशैलीशी निगडित गोष्टींचा हा विकार कमी करण्यात फार मोठा वाटा आहे. बऱ्याच रुग्णांना ऍन्जिओप्लास्टी झाली म्हणजे आता मी बरा झालो, असे वाटते व पूर्वीच्याच जीवनशैलीत ते जगायला सुरवात देखील करतात, हे चुकीचे आहे. 

रक्‍त पातळ करण्याची गोळी जशी आयुष्यभर घेणे बंधनकारक असते तसेच जीवनशैलीतील योग्य बदल आयुष्यभर टिकविणे देखील तितकेचे महत्त्वाचे असते. हार्टऍटॅक येऊन गेल्यानंतर जर तुम्ही या गोष्टी मनापासून पाळल्यात तर कोरोनरी आर्टरीज डिसीज या आजारापासून तुम्ही खऱ्या अर्थाने बरे व्हाल. शास्त्रीयदृष्ट्या तुमच्या आजाराला समजून घेऊन व कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्याने केलेल्या जीवनशैलीतील बदलामुळे नक्‍कीच रुग्णांना आपली स्वप्न पहिल्यापेक्षा जोमाने पूर्ण करून जगता येतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News