सारथी’च्या विद्यार्थ्यांचे पैसे 15 दिवसात देणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020
  • विजय वडेट्टीवार यांची विधान परिषदेत घोषणा
  • आमदार सतीश चव्हाण यांची लक्षवेध

औरंगाबाद - ‘सारथी’ अंतर्गत विद्यार्थ्यांचे रखडलेले पैसे येत्या 15 दिवसांत विद्यार्थ्यांच्या खात्यावर टाकल्या जातील अशी घोषणा बहुजन कल्याण विभागाचे मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.3) विधान परिषदेत केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधीव्दारे ‘सारथी’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांला वाचा फोडून सभागृहाचे लक्ष वेधले.
    
मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची स्थापना करण्यात आली. मात्र सारथीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता झाली असल्याने संस्थेचे कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून शेकडो विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे मानधन मिळाले नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यातील सर्वाधिक विद्यार्थी हे मराठवाड्यातील असून या विद्यार्थ्यांना तात्काळ मानधन द्यावे अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली. तसेच तारादूतांचे देखील मागील दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वेळेववर मानधन मिळावे यासाठी भरीव अशी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना बहुजन कल्याण विभागाचे मंत्री ना.विजय वडेट्टीवार म्हणाले की, सारथीच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात शासनाने चौकशी समिती नेमली असून येत्या 10 दिवसात यासंदर्भात चौकशी पूर्ण करून दोषी अधिकार्‍यांवर कडक कार्यवाही केली जाईल. सारथीसाठी निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नसून यासाठी भरीव अशी तरतूद केली जाईल. सारथीची स्वायत्ता अबाधित ठेवली जाईल. तसेच एकाही मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही ना.विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News