कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझर टनेल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 April 2020

कमी खर्चात उभारणीआयसीटीचा पुढाकार

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील रेल्वे व बस स्थानके, भाजीपाला बाजार, सरकारी कार्यालये, विद्यापीठे, रुग्णालयांचे प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेल उभारले जात आहेत. माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी (आयसीटी) या संस्थेने कमी खर्चात अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल विकसित केला आहे. त्याचा वापर सुमारे दोन आठवड्यांत सुरू होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

देशातील दिल्ली, हरियाना, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांत निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर टनेलचा वापर करण्यात येत आहे. या टनेलला फुमिगेशन टनेल असे म्हटले जाते. कर्नाटकातील हुबळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येसुद्धा याचा उपयोग केला जात आहे. रेल्वेनेही हरयानात अशा फ्युमिगेशन टनेलची निर्मिती केली आहे. सॅनिटायझर टनेलच्या निर्मितीसाठी आयसीटीचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्राध्यापक राजेंद्र सोनकवडे, प्रा. सचिन मठपती व त्यांचे विद्यार्थी विक्रम कोरपाले यांनी संशोधन केले. या अभिनव उपक्रमाबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

फवाऱ्याद्वारे निर्माण होणाऱ्या धुक्‍यांचे अधिक चांगले वितरण सुनिश्‍चित करण्यासाठी फ्लूड फ्लो सिस्टम ऍनसिस (ANSYS) या कार्यक्षम सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन आणि सिम्युलेट केले गेले आहे. द्रवपदार्थाप्रमाणे दोन फ्लूड प्रणालींच्या पद्धतीचा वापर येथे केला आहे. डिस्क्रिट पार्टिक्‍युलेट मॉडेलचा (डीपीएम) उपयोग सीएफडी मॉडेलमधे वापरून द्रवपदार्थ सर्व ठिकाणी कसा पोचला जाईल हे पाहिले जात आहे. तसेच मानवी शरीरावर याचा प्रत्यक्षात काही विपरित परिणाम होतो आहे का नाही, याचा शोध घेण्यासाठी ही पद्धत वापरली जात आहे.

जंतुनाशक फवारा
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयसीटीने सॅनिटायझर टनेल तयार केले आहे. त्यासाठी पाण्यात एक टक्के सोडियम हायपोक्‍लोराईड मिसळले जाते. या कमानीखालून अथवा बोगद्यातून जाण्यासाठी एका व्यक्तीला ते सेकंद लागतात. त्या वेळी या मिश्रणाच्या फवाऱ्यांनी निर्जंतुकीकरण केले जाते. या टनेलच्या निर्मितीसाठी 12 फूट लांबीच्या पोर्टा केबिनचा वापर करण्यात आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News