हळद रुसली... (संदीप काळे)

संदीप काळे Sandip98868@gmail.com
Sunday, 24 March 2019

दृष्टिदोषामुळं लग्न ठरत नाही, अशा समस्येमुळं अनेक मुलींचं आयुष्य होरपळलं आहे. एकीकडं दृष्टिदोषांबाबत असलेलं कमालीचं अज्ञात आणि त्यात भर गरिबीची. या मुलींकडे पाहण्याची तरुणाईची मानसिकता हाही मोठा दोष. जे. जे. रुग्णालयातल्या नेत्र विभागातल्या एका वातावरणातून हे वास्तव समोर आलं. या मुलींकडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कधी बदलेल?

दृष्टिदोषामुळं लग्न ठरत नाही, अशा समस्येमुळं अनेक मुलींचं आयुष्य होरपळलं आहे. एकीकडं दृष्टिदोषांबाबत असलेलं कमालीचं अज्ञात आणि त्यात भर गरिबीची. या मुलींकडे पाहण्याची तरुणाईची मानसिकता हाही मोठा दोष. जे. जे. रुग्णालयातल्या नेत्र विभागातल्या एका वातावरणातून हे वास्तव समोर आलं. या मुलींकडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कधी बदलेल?

स्थळ जे. जे. रुग्णालय. वेळ सकाळी सात वाजताची. नेत्र विभाग अक्षरश: पटके, धोतर आणि लुगडी परिधान केलेल्या ज्येष्ठ व्यक्तींनी गजबजून गेलेला. डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांची रुग्णांना तपासण्यासाठी गडबड चाललेली. माझ्या सासऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांचा त्रास होत होता. त्यांना तपासण्यासाठी डॉ. लहाने आणि डॉ. रागिणी यांच्याकडं मी घेऊन आलो होतो. वार्ड नंबर चारमध्ये सासरेबुवांची तपासणी सुरू झाली. मी त्यांची तपासणी सुरू असताना बाहेर थांबलो होतो. माझ्या पलीकडल्या बाजूला वॉर्ड नंबर पाचच्या समोर दोन्ही बाजूंनी मुलींची डोळे तपासणीसाठी रांग लागली होती. त्यांच्यासोबत असणाऱ्या माणसांचा पोशाख गावातल्या माणसांचा वाटत होता. त्या रांगेमधल्या सगळ्या मुली या ग्रामीण भागातून आल्याचं माझ्या लक्षात आलं; पण सगळ्या मुलीच कशा काय, असा प्रश्न मला पडला. मी त्या रांगेमध्ये थांबलेल्या एक-दोन मुलींच्या नातेवाईकांची आस्थेनं विचारपूस करायला सुरवात केली. अनेक जण माझ्या अचानक बोलण्यामुळं गोंधळून गेले होते. काही जण जेवढ्यास तेवढी उत्तरं देत होते; तर काही जणांना इथं आपल्याशी कुणीतरी प्रेमानं बोलतंय, याचं आश्‍चर्य वाटत होतं. ""काका, तुम्ही कुठून आलात?,'' असं मी एकांना विचारलं. ते म्हणाले ः ""बुलडाण्याहून आलोय.'' ""ही कोण तुमची मुलगी आहे का?'' माझा प्रतिप्रश्न. ते म्हणाले ः ""हो.'' मी म्हणालो ः ""किती दिवसांपासून तपासणीसाठी येत आहात?'' ते म्हणाले ः ""नाही. दुसऱ्यांदाच आलोय.''
""तुमच्या गावात डोळे-तपासणी करता आली नसती का? मुंबईला इतक्‍या दूर तपासणीसाठी का आलात?'' त्यावर काकांनी आपल्या मनात दाटून आलेलं उत्तर देण्यास सुरू केलं. काका म्हणाले ः ""आपली ऐपत पाहिजे ना हो? आपली ऐपत नाही म्हणून मुंबईला आलो, नाही तर कशाला आलो असतो मुंबईला? गेल्या तीन वर्षांपासून आज यावं, उद्या यावं, अस म्हणताम्हणता, ही वेळ आली. आता मुलीचं लग्न जमत नाही म्हटल्यानंतर उसनंपासनं करून मुंबई गाठावी लागली.'' मी म्हणालो ः ""लग्न जमत नाही, असं कसं?'' काका जरा जोर देऊन म्हणाले ः ""मुलीत दृष्टिदोष आहे, म्हणून तिला कोणीच करून घेत नाही, सगळे जण नावं ठेवतात.'' त्या काकांचं हे ठसकेबाज आणि मोठ्या आवाजातलं उत्तर ऐकून इतर मुलींसोबत आलेले सर्व नातेवाईक आमच्या तोंडाकडं पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आलं, की जी अडचण या काकांची आहे, तीच अडचण या सगळ्या नातेवाईकांचीसुद्धा आहे. काका आणि मी थोडं बाजूला आलो, तरीही लोकांची टवकारलेले कान आमचा कानोसा घेतच होते. अतिशय अडचणीमध्ये सापडलेल्या आणि उदास झालेल्या काकांनी आपली कैफियत मांडली. माधव गायकवाड असं त्या काकाचं नाव. रोज मजुरी करायची आणि आलेल्या पैशांत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, हे काकांच्या आयुष्याचं गणित. त्यांच्या पत्नी यशोदा एका डोळ्यानं अंध आहेत. परिणामी काकांच्या पाचही मुलींना आनुवांशिकतेनं दृष्टिदोष आला असावा, असं काकांचं मत. पाचही मुलींची लग्नं अजून करायची होती. सर्वांत मोठी मुलगी- कावेरी. तिला दृष्टिदोष होता, त्यातून तिला भिंगाचा चष्मा लागला होता.

""तिला मी मुंबईपर्यंत आणू शकलो नाही, माझी परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यातच आम्ही चार वर्षं अनेक स्थळं बघितली; पण तिच्यासोबत कुणीही लग्न करायला तयार नव्हतं. मुलगी देखणी होती; पण डोळ्यांत दोष. तिच्या मागच्या तीन बहिणींचीही लग्नं तिच्यामुळं लग्न थांबली होती. आम्हाला होणारा त्रास, सतत लोकांचे टोमणे ऐकून ऐकून तिला जगणं नकोसं झालं होतं. आम्ही ज्या राघोजी जाधव यांच्या शेतात काम करायचो, त्याच विहिरीमध्ये तिनं गळ्यात दगड बांधून उडी मारली. दोन दिवसांनी फुगलेला मृतदेह बाहेर आला. माझ्या मुलीच्या मृत्यूला मीच जबाबदार होतो. बाप म्हणून जर मी योग्य भूमिका घेतली असती, तर तिनं हे पाऊल उचललं नसतं. आता उर्वरित मुलींनाही डोळ्यांची सारखीच अडचण आहे. कोणाला थोडं दिसतं, तर कोणाला जाड चष्मा लावूनही दिसत नाही. एका खासगी डॉक्‍टरकडे आम्ही गेलो, त्यांनी सांगितलेली किंमत ऐकून आपल्याला ते या जन्मात शक्‍य नाही, हे लक्षात आलं. दुसऱ्या एका डॉक्‍टरनी तुम्ही मुंबईत जा, तुमचं मोफत ऑपरेशन होईल, असा सल्ला दिल्यामुळं आम्ही मुंबई गाठली होती.''...एका दमात माधव गायकवाड यांनी आपली कैफियत सांगितली.

आमच्या गप्पा सुरू असताना काकांची मुलगी अनसूया तिथं आली आणि म्हणाली ः ""तुम्हाला कोणीतरी माणूस पाहिजेच असतं, घरातली उणीदुणी सांगायला.'' मी त्या मुलीची समजूत काढत होतो; पण ती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. आमच्या गप्पा तिनंही ऐकल्या. ""माझ्या बहिणीचा मृत्यू झाला, त्याला कारणीभूत इथल्या तरुणांची मूर्ख मानसिकता आहे. त्यांनी माझी बहीण देखणी असूनही, तिला डोळ्याच्या छोट्याशा कारणासाठी सतत नाकारलं. त्यासोबत माझ्या अशिक्षित बापाची व्यसनाधीनता हेही कारण आहे,'' असं तिनं स्पष्ट शब्दांत सांगितलं. बाप जेवढं कमावतो, त्याच्या निम्मं तो दारूत घालवतो. गावातली घाणेरडी दारू प्यायल्यानं आठवड्यातले अर्धे दिवस आजारी असतो. अर्धे दिवस कामावर जातो. हे आणि असं बरंच काही अनसूया तिच्या वडिलांच्या समोर सांगत होती. वडील बिचारा मोठा अपराधी असल्यासारखा शांतपणे खाली मान घालून बसला होता. मी अनसूयाला विचारलं ः ""तुझं शिक्षण किती झालं आहे?'' ती म्हणाली ः ""मुक्त विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेते.'' मी म्हणालो ः ""पूर्ण वेळ शिक्षण का घेत नाहीस?'' ती माझ्याशी काही न बोलता आपल्या वडिलांकडं बघत होती आणि ""चला, आपला नंबर येईल,'' म्हणून तिनं आपल्या वडिलांना रांगेत उभं केलं.

रांगेमध्ये आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत बसणाऱ्या अनेक मुलींच्या नातेवाईकांशी मी चर्चा केली. त्यातले बहुतांश मुलीचं लग्न होत नाही म्हणून काळजी व्यक्त करणारे होते. कोणी चार वर्षांपासून, तर कुणी सहा वर्षांपासून लग्नासाठी तयार आहे; पण केवळ डोळ्याला भिंगाचा चष्मा लागला म्हणून अंगाला लागायची हळद रुसलेली दिसत होती. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमधला काही पट्टा इकडून अशा मुली वारंवार येण्याचं प्रमाण खूप मोठं आहे, असं एक डॉक्‍टर सांगत होते. उस्मानाबादवरून आलेले संजय थोरात सांगत होते ः ""अहो, दोन्ही डोळे असूनही माझ्या मुलीला सगळ्या लोकांनी अंध ठरवलं. एकुलती एक मुलगी; संपन्न परिवार; पण आज काय करावं हे सुचेना.'' त्यातून त्याचा रोष होता सरकारी यंत्रणेविषयी. कारण जे. जे. वगळता राज्यात फार कमी ठिकाणी दृष्टिदोषांबाबत ऑपरेशन होऊ शकणारी सुसज्ज यंत्रणा असेल. त्या बापाचा रोष होता आपल्या रूपवान मुलीला "अंध' म्हणून नावं ठेवणाऱ्या समाजाविषयी. जी अनेक मुलं तिला सतत नकारत होती त्यांच्याविषयी.

दवाखान्यात लोकांशी बोलल्यावर, एक गोष्ट मला लक्षात आली, दृष्टिदोषांबाबत या लोकांमध्ये कमालीचं अज्ञान आहे. दारिद्य्र तर पिढ्यान्‌पिढ्या त्यांच्यासोबत आहेच. गेल्या अनेक वर्षांपासून भिंगाचा चष्मा लागणाऱ्यांचं ऑपरेशन करणारे जे.जे.मधले डॉ. शशी कपूर यांना मी भेटलो. त्यांनी अशा येणाऱ्या रुग्णांचं एकूण प्रमाण सांगून मला धक्काच दिला होता. जे.जे.मधल्या आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये डॉ. शशी यांनी अशा मुलींची अठरा हजार ऑपरेशन केलेली आहेत. एक मशीन आणि एक माणूस. खूप मोठी रांगच्या रांग, हे चित्र रोज सकाळी जे.जे.च्या नेत्र विभागामध्ये वॉर्ड नंबर पाचच्या पुढं पाहायला मिळतं.

मी डॉ. शशी यांना भेटण्यासाठी आतमध्ये गेलो. माझी ओळख सांगितल्यावर त्यांनी माझं हसून स्वागत केलं. डॉ. शशी म्हणजे जॉली व्यक्तिमत्त्व. एकदम सदाबहार. बाहेर ताटकळत थांबलेले लोक पाहून मीही त्यांचा अधिक वेळ न घेता, थेट विषयाला हात घातला. माझ्या प्रश्नांवर डॉ. शशी सांगत होते, की "आपल्याकडे अनेक लोकांमध्ये दूरचं न दिसण्याचा दोष असतो. काही जण दवाखान्यापर्यंत येतात, तर काहींना दवाखान्यापर्यंत येणं शक्‍य नाही. गोरगरीब, सर्वसामान्य, शेतकऱ्याला पन्नास आणि साठ हजार रुपये खर्च करून हे ऑपरेशन करणं केवळ अशक्‍य!' डॉ. शशी यांनी या सगळ्या प्रकरणांत वयात आलेल्या मुली आणि त्यांच्या नातेवाईकांची कशी धांदल उडते याचे अनेक किस्से मला सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर डॉ. शशी काम करत आहेत. शासकीय उदासीनता, तुटपुंजं मानधन याची पर्वा न करता डॉ. शशी यांना आत्मिक समाधानासाठी इथं काम करायचं आहे. त्यांचे वडील डॉ. ओमप्रकाश कपूर हेसुद्धा जे.जे. रुग्णालयात डॉक्‍टर होते. आता डॉ. शशी आपल्या वडिलांचा वारसा पुढं चालवत आहेत. जसं हमखास निदान होण्याचं केंद्र म्हणून मुंबईच्या जे.जे.कडं अवघा महाराष्ट्र पाहतो, तसा वारसा असणारे अनेक डॉक्‍टर जे.जे.मध्ये आहेत. डॉ. लहाने, डॉ. रागिणी, डॉ. कपूर अशी कितीतरी उदाहरणं यानिमित्तानं सांगता येतील. अनेक आजारांचा कायमस्वरूपी नायनाट करण्यासाठी अवघं आयुष्य या लोकांनी पणाला लावलं आहे, तरीही तरुणाईची मानसिकता अजून जागेवर येत नाही, हे तेवढंच खरं आहे. "एखाद्या मुलीला जाड भिंगाचा चष्मा आहे. त्यामुळं ती मला बायको म्हणून शोभणार नाही,' ही मानसिकताच "कुरूप' असल्याचं लक्षण आहे. बाह्यसौंदर्याला भुलणाऱ्या पुरुषी मानसिकतेची कणवही येऊन जाते.

डॉ. शशी यांच्याशी बोलून मी बाहेर आलो आणि विचारात पडलो. बाहेर पडल्यावर अनेकांचे चेहरे प्रचंड काळजीनं ग्रस्त दिसले. तरुणाईच्या मानसिकतेवर काय बोलावं हे मला सुचेना. ही मानसिकता रोज वाढत चालली आहे, त्यामुळं आजघडीला कित्येक मुली आपल्याला हळद कधी लागेल याची वाट पाहत आहेत. ती लागण्याआधी रुसलेल्या या हळदीला तरुणाईची मानसिकताच हसवू शकेल. त्यात किती काळ जाईल, माहीत नाही. बाह्यरूप, डोळे, दिसणं या गोष्टी अजूनही आपल्या समाजात खूप महत्त्वाच्या ठरतात. मला दोस्तोव्हस्कीची "कारमाझव्ह ब्रदर्स' ही कांदबरी आठवली. त्यात तो म्हणतो ः "ती स्त्री असते यातच तिनं अर्धी लढाई जिंकलेली असते... माझ्या मते कुरूप अशी स्त्रीच नाही... तिच्याकडे पाहण्याचा अँगल सापडावा लागतो.' सापडेल तरुणाईला असा "अँगल'? रशियन दस्तोव्हस्की भारतात जन्मला असता, तर त्यानं कदाचित याच्या बरोबर उलटं म्हणजे "ती स्त्री असते यातच तिनं अर्धी लढाई हरलेली असते?' असं लिहिलं असतं का? आंतरिक सौंदर्यही मोलाचं; पण ते दिसण्यासाठी नजर पाहिजे... आणि ही नजर नसणं हा सगळ्यात मोठा दृष्टिदोष. तो कधी सुधारेल?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News