बेलवाडीचे बळीराम... 

संदीप काळे
Tuesday, 3 March 2020

महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी शेतीवर केलेले खूप प्रयोग पाहिले, अनुभवले, नांदेडचे डॉ. माऊली शिंदे यांच्याबरोबर मी अनेक ठिकाणी शेतीसंदर्भातल्या प्रयोगामुळे यशस्वी झालो. आम्ही नामदेव महाराजांना खूप मानतो. नामदेव महाराजांनी शेती, निसर्ग यांचे महत्त्व खूप प्रमाणबद्ध शब्दांमध्ये सांगितले आहे. तेच आम्ही करतोय. 

यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या वतीने अंबाजोगाईला यशवंतराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी गेलो होतो. अंबाजोगाईविषयी जेवढे ऐकले होते, त्यापेक्षा अधिक डोळे भरून तिथे पाहायला मिळाले. अंबाजोगाई हे मराठवाड्यातल्या सांस्कृतिक रेलचेलीचे केंद्रबिंदू आहे. दगडू लोमटे, अमर हबीब यांसारखे मुरब्बी चळवळ चालवणारे, अनेक कार्यक्रमांचे संयोजक याच अंबाजोगाईमध्ये आहेत. म्हणजे जो यशवंतराव चव्हाण स्मृती समारंभ आयोजित केला होता, त्या स्मृती समारंभाला असणारी संख्या, प्रत्येक कार्यक्रमाला होणारी वाहव्वा अगदी वाखाणण्याजोगी होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी आणि अंबाजोगाईकरांनी त्या सगळ्यामंडळींचे केलेले स्वागत हे नोंद घेण्यासारखे होते.

तीन दिवस चालणाऱ्या या समारंभामध्ये अनेक दिग्गज मंडळी लोकांसमोर येऊन बोलती झाली. गेल्या वर्षापासून दगडू लोमटे नावाचा एक धडपड्या कार्यकर्ता या उपक्रमाच्या निमित्ताने एक चळवळ उभी करू पाहत होता. माझ्यासोबत रामेश्‍वर मांडगे या हिंगोली जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याला"कृषिभूषण' म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होते. आमचा कार्यक्रम सुरू झाला आणि पुरस्कार वितरणानंतर रामेश्‍वर मांडगे हे भाषणासाठी उभे राहिले. डोक्‍यावर टोपी, अंगभर पांढरे कपडे, धोतर, असा छानसा त्यांचा शेतकरी पेहराव, मराठवाड्याच्या संस्कृतीचे दर्शन देणारा होता. रामेश्‍वर भाषणाला उभे राहिले आणि त्यांचे भाषण ऐकून आम्ही सारे थक्क झालो. पासष्टी ओलांडलेले रामेश्‍वर यांनी शून्यातून विश्‍व निर्माण करून नोकरी, उद्योजकापेक्षा शेतीच कशी श्रेष्ठ आहे, याचे उदाहरण अख्ख्या जगाला दाखवून दिले होते. कार्यक्रम संपताना मी रामेश्‍वर यांना कडाडून मिठी मारली. आम्ही सोबत जेवायलाही होतो, भाकरी आणि ठेचा हा ठरलेला मेन्यू गुलाबी थंडीमध्ये अधिक मजा आणत होता. शिवाजी आंबुलगेकर, प्रा. श्रीराम गव्हाणे, सत्यभामा सौंदरमल अशा अनेकसाहित्यिक, कार्यकर्त्यांसोबत रात्रीच्या वेळी गप्पांची मैफील जमली. रात्री परतीची वेळ आली. रामेश्‍वर यांच्यासोबत माझ्या गप्पा इतक्‍या रंगल्या होत्या, की त्यांना सोडायची इच्छा मला होत नव्हती. रामेश्‍वर म्हणाले, तुम्ही नांदेडला जाणार आहात, तर मग व्हाया हिंगोली चला. आज तिकडे मुक्काम करू आणि सकाळी परत तुम्ही नांदेडला जा. त्यांचे प्रपोजल तसे चांगलेच होते. मला रामेश्‍वर यांनी केलेल्या शेतीतले प्रयोग आणि त्यांनी केलेला इतिहास लोकांना दाखवून द्यायचा होता. मी व्हाया हिंगोली जाण्याचा निर्णय घेतला. हिंगोलीपासून पंधरा कि.मी. अंतरावर पक्‍क्‍या रस्त्यांनी आणि पाच किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्याने बेलवाडी नावाचे छोटसे गाव आहे. जेमतेम पाचशे लोकवस्तीचे हे गाव आहे. सततचा दुष्काळ आणि पारध्यांचे गाव अशी या गावाची ओळख, रामेश्‍वर मांडगे याच गावचे. कितीही जागतिकीकरण आले, तरी बेलवाडी मात्र अजून त्याच गावकूस पद्धतीच्या वलयात आहे. खापराची घरे, कौलारू घरे, पत्र्यांची घरे आणि टुमदार झोपड्या, आता आता कुठे सिमेंटचे एखादे घर गावात दिसत होते. पारध्यांच्या भीतीचा शिक्‍का पुसून गावपण जपलेली ही वाडी आता रामेश्‍वरच्या नावाने ओळखली जाते. मलारामेश्‍वर यांच्या गावापेक्षा त्यांची शेती पाहण्यात अधिक रस होता. अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर रामेश्‍वर यांची शेती. भरभरून शेतीचे सौंदर्य पाहून कोणाचेही डोळे दीपतील अशी अवस्था. गावच्या भाषेत सांगायचे झाले तर देखणा आखाडा. छोटेखानी विहिरीला जेमतेम पाणी आणि बाकी सगळी पाण्याची भिस्त बोअरवेलवर, शेततळ्यावर.पाण्याचे उत्तम व्यवस्थापन असलेली शेती मी पहिल्यांदा पाहत होतो. सकाळी तीन दगडांवर मांडलेल्या चुलीच्या आगीवर चहा उकळून, त्या चहाचा सुगंध सगळ्या वाऱ्यामध्ये पसरत होता. बाजूला एका तशाच चुलीवर मोठ्या पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवले होते. त्या दुधावरची साय तोडायला एखादी धारदार तलवार लागणार होती; एवढी ती जाड साय होती. मी चहा पीत नाही; पण त्या बनवलेल्या चहामध्ये कमालीचा स्वाद असेल, हे त्याच्यारंगावरून, वासावरून दिसत होते. शेतामध्ये केलेला चुलीवरचा चहा आणि तोही निखळ दुधाचा. जे आखाड्यावर राहतात, तेच या चहाची चव चांगल्या पद्धतीने सांगतील. घरून निघताना रामेश्‍वर यांचे खूप थकलेले आई आणि वडील माझ्याशी बहात्तरच्या दुष्काळाबद्दल भरभरून बोलत होते. दोन-दोन दिवस आम्ही उपाशी कसे राहिलो, हेही तेसांगत होते. आता ओलिताखालच्या जमिनीवर रामेश्‍वर यांची सारी प्रगती दडली आहे. रामेश्‍वर यांना वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. 1980 पासून रामेश्‍वर यांनी शेतीला पूरक असा दुधाचा जोडधंदा सुरू केला आणि त्यातून शेती आणि व्यवसाय दोन्ही फुलत गेले. आज रामेश्‍वर यांच्याकडे शंभर एकर शेती आहे. 1980 पासून ते दरवर्षीथोडी-थोडी शेती विकत घेतात. त्यांच्या दुधाच्या व्यवसायावर पूर्ण घर चालते, मुलांचे शिक्षणही होते. 40 लोकांचे कुटुंब जगते. शेतीच्या उत्पन्नातून दरवर्षी त्यांची नवीन जमीन खरेदी करायची हौसही पूर्ण होते. दीडशे जनावरे, त्यात काही दुभती; तर काही भविष्यात दूध देणारी अशी आहेत. मिळणाऱ्या दुधातून घर चालते, त्यांच्या मिळणाऱ्याशेणखतामधून सेंद्रिय शेतीचे वेगवेगळे प्रयोग होतात आणि एक नंबर शेती पिकते. म्हणजे माझ्या स्वतःच्या शेतात या वर्षी एकरी पाच क्विंटल एवढा सोयाबिनचा उतारा मिळाला; तर रामेश्‍वर यांनी केलेल्या शेतीमधून 17 क्विंटल एवढा उतारा मिळविला. यावरून रामेश्‍वर जे शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचे प्रयोग करतात ते सगळे प्रयोग शेतकऱ्यांनी शिकले पाहिजेत, शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. रामेश्‍वर यांनी मला त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग दाखवले. रामेश्‍वर यांनी त्यांच्या भूतकाळाविषयी अनेक गंभीर आणि वेदनादायी कहाण्या मला सांगितल्या. भूक, दारिद्य्र, दुष्काळ हे आमच्या पाचवीलाच पुजलेले. भूक आणि गरिबीतून नैराश्‍य आले आणि माझ्या आईच्या डोक्‍यावर परिणाम झाला. आईने दोन वर्षांची मुलगी विहिरीत टाकली. माझा लहान भाऊ माधव वर्षाचा होता, त्यावेळी त्यांनी आत्महत्या केली. दिवसभर काम करावे लागायचे आणि ते काम करण्यासाठी पोटभर अन्न लागायचे. त्यामुळे त्याच त्रासातून त्यांनी आत्महत्या केली. मी नांदेडला एसटी विभागात लेबर म्हणून काम करायचो. चार रुपये प्रति दिवस मला मोबदला मिळायचा. दोन-तीन वर्षे मी तिथे कामही केले, पण तिथे माझे मन लागेना. 1975 पासून मी माझ्या घरी आलो, वडिलोपार्जित असलेल्या दोन-तीन एकरमध्ये नवरा-बायकोने विहीर खोदली. पिण्यापुरते पाणी लागले आणि तेथून आमच्या समृद्धीचा आलेख उंचावत गेला. बेलवाडी म्हटले की, कोणीही गावात मुलगी देण्याचे धाडस करायचे नाही. मलाही चार-पाच वर्षे लग्नासाठी मुलगी शोधावी लागली. वरूडगवळी नावाच्या गावात शेवंताबाई नावाची माझी आत्या असायची. तिने आपल्या नातेवाईकांमधील एक मुलगी मला बायको म्हणून मिळवून दिली. पुढे त्याच माझ्या बायकोने म्हणजेच कलावतीने माझा संसार, सर्व कुटुंब फुलवले. सुरुवातीला एक लिटर दूध आम्ही लोकांना विकायचो, ते आता पाचशे लिटरपर्यंत येऊन पोहोचले आहे. सुरुवातीला एक म्हैस होती, त्यांची संख्या आता शंभरावर गेली. हे सगळे कष्ट आणि डोळसपणे केलेल्या प्रयोगामुळे शक्‍य झालेय. 

महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी शेतीवर केलेले खूप प्रयोग पाहिले, अनुभवले, नांदेडचे डॉ. माऊली शिंदे यांच्याबरोबर मी अनेक ठिकाणी शेतीसंदर्भातल्या प्रयोगामुळे यशस्वी झालो. आम्ही नामदेव महाराजांना खूप मानतो. नामदेव महाराजांनी शेती, निसर्ग यांचे महत्त्व खूप प्रमाणबद्ध शब्दांमध्ये सांगितले आहे. तेच आम्ही करतोय. 

नवनवीन शेतीमधले प्रयोग सक्‍सेस करणारे, व्यवसायामध्ये सिंहाची भूमिका बजावणारे रामेश्‍वरांचे लहान भाऊ बाजीराव यांच्या वेळेचे ते नियोजन पाहून मीही थक्क झालो. एखाद्या व्हीआयपी माणसासारखे शेतीमधले दरदिवसाला प्लॅनिंग बाजीराव यांनी केले होते. बाजीराव मला सांगत होते. शेतीतल्या प्रत्येक प्रयोगाला तुम्हाला लहान मुलासारखे जपावे लागते, त्यांना समजून घ्यावे लागते. नाहीतर बाजूच्यांनी काहीतरी पेरले म्हणून आपण पेरायचे, या प्रकारची शेती आपण न केलेली बरी. शेतीच्या उत्पन्नावर दरवर्षी आम्ही 2-4 एकर शेती विकत घेतो, यावर कोणाचा विश्‍वासही बसणार नाही, हे का शक्‍य होतंय, तर माणसांचा असलेला जाडजोड आणि सततचे वेगळे प्रयोग. दुष्काळाचा फटका आम्हाला का बसत नाही? पाण्याची चणचण आम्हाला का जाणवत नाही? हे सगळे घडतेच, पण आम्ही अडचणीत येत नाही, त्याचे कारण आम्ही शरीरातल्या रक्ताप्रमाणे पाण्याला जपतो. त्याचे नियोजन करतो, म्हणून ते शक्‍य होते. 

मांडगे कुटुंबीयांसमोर संकटे येत नाहीत, असे अजिबात नाही; पण त्या संकटांवर त्यांनी नेहमी मात केली. रामेश्‍वर मला सांगत होते की, एकदा आमच्या सगळ्या म्हशी चोरून नेल्या, पोलिस थकले, आम्ही शोधून थकलो; मग काही शक्कल लढवून धागेदोरे काढत काढत चोरापर्यंत पोहोचलो; तर त्या चोराकडे आसपासच्या जिल्ह्यातल्या चारशे-पाचशे चोरीच्या म्हशी आम्हाला सापडल्या. अनेकांचे घरे या चोरी प्रकरणामुळे उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली होती. ती वाचली गेली. एक किलो धान्य मिळावे, यासाठी मी दिवस-दिवसभर लाईनमध्ये उभा असायचो, त्याची जाण मला आजही आहे. त्या जाणिवेतून मी अनेक भुकेल्या असणाऱ्या घरी अन्नदान, दूधदान करण्याची भूमिका वर्षावर्षापासून करतो. 

शेतामधले वातावरण तिथून पाय काढूच नये, असे होते. चकाचक, गोटा, काळेभोर पाणी असणारी विहीर, हंबरणारी गाई-वासरे, अवतीभोवती फुलांचा अधूनमधून येणारा वास, आंब्याच्या झाडावर बसलेले मधमाश्‍यांचे पोळे, त्याचा सुटलेला सुगंध. असे वाटत होते, एक खाट टाकावी आणि निवांतपणे तिथे बसून राहावे. तसेही खूप दिवस निवांत बसल्याशिवाय रामेश्‍वर यांचा भूत, वर्तमान, भविष्य आणि भूगोल समजून घेणे अवघडच होते. 

जाता-जाता मी रामेश्‍वर यांना शेवटचा प्रश्‍न विचारला. म्हणालो, "तुमच्याकडे दोन एकर शेती होती, त्याची तुम्ही शंभर एकर शेती केली, आमच्याकडे अनेकांची शंभर एकर शेती होती, त्यांची आता दोन एकर व्हायला आली आहे, त्यांचे शेतीचे गणित पूर्णपणे फसते, हे सर्वांच्या बाबतीत होते, नेमकें तुमच्या बाबतीमध्ये उलटे कसे?' रामेश्वर हसले आणि आमच्या पत्रकारितेच्या भाषेत त्यांनी वनलाईन स्टोरीमध्ये उत्तर दिले, ते म्हणाले, मी निसर्गावर प्रेम करतो म्हणून निसर्गही माझ्यावर प्रेम करतो. मी म्हणालो, "ते कसं काय?' ते म्हणाले, "अनेक जण औषधांचा मारा करून विष पिकवतात आणि ते लोकांना खायला देतात, लोक मरतात. त्याचा त्यांना शाप लागतो. मी निसर्गाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे जनावरांच्या सान्निध्यात राहून माणूस जमात कशी जगेल, टिकेल, शाबूत राहील, यासाठी प्रयत्न करतो. ज्या जनावरांच्या साह्याने मी हे काम उभे केलेय, तीच तुमच्या घरची जनावरे तुम्ही सारे शेतकरी खाटकाला विकताय? ज्यांची शेती पिकत नाही, त्यांचे कारण त्यांच्या इमानदारीमध्ये खोट आहे, एवढेच सांगता येईल.' रामेश्‍वर जे जे सांगत होते, ते ऐकून असे वाटत होते, की महाभारत, रामायण ग्रंथ आहेत ना, तसा रामेश्‍वर यांच्या बोलण्यावर, वर्तनावर, विचारांवर ग्रंथ लिहावा. इतका अनुभव, सहजता, विश्‍वासार्हता त्यांच्या बोलण्यामध्ये होती. 

सूर्य डोक्‍यावर आला, निघायची वेळ झाली, रामेश्‍वर काका आणि काकूंचीही भेट घेतली आणि निघालो. एका छोट्याशा डब्यामध्ये काकूंनी तूप दिले. त्या म्हणाल्या, "हे तूप नाही; तर औषध आहे.' तो डब्बा मी घेतला आणि गाडीत ठेवला. गाडी रस्त्याच्या बाजूने हळूहळू निघाली. रामेश्‍वर, त्यांची पत्नी कलावती, त्यांचा भाऊ बाजीराव, शेतामध्ये काम करणारे अनेक जण हात वर करून मला निरोप देत होते. गोठ्यामधल्या गाई जोरजोराने हंबरत होत्या. जितके दु:ख रामेश्‍वर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मी जाताना होत होते; कदाचित त्यापेक्षाही जास्त दु:ख त्या गाईंना होत असावे. मागच्या दोन चार तासांमध्ये चोम्बाळून, चांबाळून अनेक गाईंना माझा स्पर्श झाला होता. माणसांपेक्षा पशूंना होणारा स्पर्श हा किती जवळचा असतो, तो स्पर्श त्यांना सोडताना वेदना देणारा असतो, अशी अनुभूती मला तेथून निघताना होत होती. मी निघालो तो अनेक प्रश्‍न मनात ठेवूनच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News