"डायलेसिस'' वरील मानसीच्या जिद्दीला सलाम 

मंगेश गोमासे, नागपूर
Monday, 10 June 2019

दररोज दोनदा "डायलेसिस' करून पेपर सोडविणारी मानसी शनिवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात 53 टक्‍क्‍यांसह उत्तीर्ण झाली.

नागपूर : आठव्या वर्गात असताना नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली. रक्त थांबत नसल्याने मेयोमध्ये उपचारासाठी नेले असता मानसीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे सोनोग्राफीमध्ये समोर आले. मात्र, हार न मानता मन घट्ट करीत, केलेल्या शर्थीच्या प्रयत्नातून मानसीने दहावीत प्रवेश घेतला. दररोज दोनदा "डायलेसिस' करून पेपर सोडविणारी मानसी शनिवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात 53 टक्‍क्‍यांसह उत्तीर्ण झाली. विपरीत परिस्थितीवर मात करून तिने जिद्दीच्या बळावर यश मिळविले. 

गांधीबाग येथील श्रीमती सी. बी. आदर्श विद्या मंदिर येथे शिकणारी मानसी दायमे अभ्यासात अत्यंत हुशार होती. आठवीपर्यंत वर्गात सर्वांच्या समोर असायची. त्यामुळे मानसी शाळेचे नाव नक्कीच उंचावणार, असे शिक्षकांनाही वाटायचे. मात्र, आठवीत असताना अचानक तिच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली.

रक्त थांबतच नसल्याने आईवडिलांनी तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात तपासणीसाठी नेले. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यावर, सोनाग्राफीचा सल्ला दिला. सोनाग्राफीमध्ये मानसीच्या दोन्ही किडनीमध्ये "बबल्स' असल्याचे आढळून आले. तसेच किडनी निकामी झाल्याचीही बाब लक्षात आली. त्यामुळे तिला उपचारासाठी "केअर' रुग्णालयात दाखल करीत "डायलेसिस'' करण्यास सुरुवात केली. पैसा हातात असेपर्यंत दररोज सकाळ, संध्याकाळ असे दोनदा "डायलेसिस' करण्याची दिनचर्या सुरू झाली. त्यामुळे अभ्यासात हुशार असलेली मानसी पिछाडली. मनात दहावीत प्रवेश होईल का? असा प्रश्‍न होता. मात्र, जिद्दीने दहावीत प्रवेश घेतला. मात्र, उपचारामुळे पंधरा ते वीस दिवसातून एकदा ती शाळेत जायची? शिवाय डायलेसिस सुरू झाल्यावर शाळेत जाणे अशक्‍यच झाले.

शाळेतील तिचे मित्र आणि शिक्षकांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. शिवाय जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मानसी अभ्यास करायची. त्यातूनच तिने दहावीच्या परीक्षेत यश मिळविले. 

डायलेसिस करून द्यायची पेपर
दहावीच्या पेपरदरम्यान मानसीला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला. सकाळी सात वाजता "डायलेसिस' करायला जायची. ते होताच, अर्धा तास अभ्यास करून मानसी दहा वाजता पेपर सोडविण्यासाठी जात होती. पेपर सोडवून आल्यावर सायंकाळी पुन्हा "डायलेसिस' असा पेपरदरम्यानचा तिचा प्रवास खरोखरच थक्क करणारा होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News