सलमानच्या फॅन्सनी 'भारत'साठी केले संपूर्ण थिएटर बुक

आशिष सिंघल
Wednesday, 5 June 2019

सलमानच्या प्रत्येक सिनेमा प्रदर्शित होत असतांना त्याच्या चाहत्यांकडून फस्ट डे फस्ट शो बुक केला जातो. "भारत' चित्रपटाविषयी उत्सुकता होती. आज चित्रपटाचा मनमुराद आनंद घेतला. सर्व फॅन्समध्ये उत्साहाचे वातावरण होते. 

नाशिक : रमजान ईदचा मुहुर्त साधत सलमान खानचा बहुप्रतिक्षित "भारत' सिनेमा प्रदर्शित झाला. नाशिकमधील आशिष सिंघल यासह सलमान खानच्या फॅन्सनी कॉलेजरोडवरील सिनेमॅक्‍स (पीव्हीआर मल्टीप्लेक्‍स) येथे फस्ट डे फस्ट शोची संपूर्ण तिकीटे बुक केली होती. सकाळी साडे आठच्या शोपूर्वी कॉलेजरोडवरुन कार रॅली काढली. तर शोदरम्यान गाण्यांवर मनसोक्‍त थिरकत सलमानच्या फॅन्सनी जल्लोष केला. 

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमधील सलमानच्या फॅन्सकडून हा अनोखा प्रयोग राबविला जातो आहे. याअंतर्गत सलमान खानचा चित्र प्रदर्शित होतांना "फस्ट डे, फस्ट शो' बुक केला जात असतो. ईदनिमित्त "भारत' प्रदर्शित होत असतांना त्याच्या फॅन्सने आधीच सकाळी साडे आठचा शो बुक करून ठेवला होता.

ठरल्याप्रमाणे सर्व फॅन्स आठच्या सुमारास कॉलेजरोड परीसरातील विठ्ठल मंदिर चौकात जमले होते. तिरंगा फडकवतांना, "भारत' चित्रपटाच्या पोस्टर असलेल्या खुल्या जिपपाठोपाठ आलीशान कारची रॅली कॉलेजरोड परीसरात काढण्यात आली. रॅलीत "सलमान भाई की जय हो, भारतमाता की जय'च्या घोषणा दिल्या. सलमानसारखीच बॉडी बनवलेल्या एका फॅनने उपस्थितांचे लक्ष वेधले होते. सिनेमॅक्‍सपर्यंत पोहचताच ढोल-ताशांच्या गजर करण्यात आला. सिनेमागृहातील पोस्टरला माळा घालत विविध पद्धतीने चित्रपट प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्‍त केला. 

शिट्या अन्‌ घोषणांनी दुमदुमले सिनेमागृह 
सलमानचा जबरा फॅन असलेल्या आशीष सिंघल आणि त्याच्या मित्र मैत्रीणींनी सिनेमागृहात जल्लोष केला. यावेळी शिट्या, टाळ्यांपासून तर घोषणांनी सभागृह दुमदुमले होते. चित्रपटाच्या गाण्यांवर ठेका धरत फॅन्सनी धम्माल केली. अख्खा शो सलमानच्या फॅन्ससाठी बुक असल्याने सिनेमागृहा परीसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News