जवानांसाठीच्या औषधांची दिल्ली, महाराष्ट्राच्या खुल्या बाजारात विक्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • राज्यातील २७ वितरकांवर कारवाई
  • पंजाब, दिल्ली मध्य प्रदेशातील इंदूर याबरोबरच जम्मू-काश्‍मीरमधून ही औषधे महाराष्ट्रात खुल्या बाजारात विकण्यात आल्याची माहिती​

मुंबई - भारतीय लष्करातील जवानांसाठी असलेल्या औषधांच्या विक्री घोटाळ्याची पाळेमुळे थेट जम्मू-काश्‍मीरपर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. पंजाब, दिल्ली मध्य प्रदेशातील इंदूर याबरोबरच जम्मू-काश्‍मीरमधून ही औषधे महाराष्ट्रात खुल्या बाजारात विकण्यात आल्याची माहिती असून, या प्रकरणी संरक्षण दलांच्या एका पथकातर्फे दिल्लीत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

कोट्यवधींच्या या घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून आतापर्यंत राज्यातील २७ औषध वितरक व विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. भायखळा येथील निवान 

फार्मास्युटिकल्स या खासगी औषध विक्रेत्यावर गेल्या फेब्रुवारीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घातलेल्या छाप्यातून   हे प्रकरण उघडकीस आले. त्यासंबंधीचे वृत्त ‘सकाळ’ने ५ फेब्रुवारीला प्रसिद्ध केले होते.

एफडीएच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या कारवाईतून या विक्री घोटाळ्यात राज्यातील काही औषधविक्रेत्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार आतापर्यंत मुंबईतील अन्य १८, पुण्यातील पाच, तसेच नाशिक आणि रायगडमधील प्रत्येकी एका औषध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

याचबरोबर मेडलाइफ इंटरनॅशनल या ऑनलाईन औषधपुरवठादार कंपनीच्या तळोजा येथील वितरण केंद्राचाही परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती डॉ. दराडे यांनी दिली. या प्रकरणी आणखी काही औषध विक्रेत्यांची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

खास लष्करातील जवान तसेच नौसैनिकांसाठी असलेली ही विविध औषधे काश्मीरहून पंजाब, दिल्लीमार्गे मुंबईत चोरट्या मार्गाने आणण्यात आली असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघड झाले असल्याचे दराडे यांनी सांगितले. या काळ्याबाजाराचा संबंध जम्मू-काश्‍मीरशीही असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

या विक्री घोटाळ्यात संरक्षण दलातील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास दराडे यांनी नकार दिला. 

प्रकरण काय?
संरक्षण दलांसाठीची औषधे मुंबईत उपलब्ध होत असल्याची खबर जानेवारी-फेब्रुवारीत एफडीएला मिळाली. त्यावरून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भायखळ्यातील  निवान फार्मास्युटिकल्स या वितरकावर छापा. 

या छाप्यात ‘सीटाग्लिप्टिन फॉस्फेट’ आणि ‘विण्डाग्लिप्टीन’ या गोळ्या जप्त. ही औषधे संरक्षण व नौदलासाठी असून, विक्रीसाठी उपलब्ध नाहीत, हा गोळ्यांच्या पाकिटावरील शिक्का ‘व्हाइटनर’ने खोडण्यात आल्याचे उघडकीस. 

निवान फार्मास्युटीकल्सकडून ही औषधे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात तसेच मुंबईबाहेरील अनेक भागांत विकली गेल्याचे उघड. त्यानंतर मुलुंडमधील सेफलाईफ एंटरप्राइजेस, सानपाड्यातील श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर्स आणि तळोजा व ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या फार्मसी कंपनीच्या नवी मुंबईतील गोदामांवर छापे. विविध पोलिस ठाण्यांत या विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल.

वितरक-विक्रेत्यांचे मंत्र्यांना साकडे 
एफडीएने कारवाई केलेल्या काही औषध वितरक व विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांना पत्र लिहून परवाना परत मिळावा, अशी  मागणी केली आहे. त्यास ‘ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी विरोध दर्शवला आहे. हा राष्ट्रीय घोटाळा असून, सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News