'सैनिक' : अस्मिताची अल्पाक्षरी कविता.

डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
Thursday, 28 May 2020

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग-हरोली येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलात नववीत शिकणारी ही गुणी विद्यार्थिनी आहे. तिचा 'सैनिक' हा कवितासंग्रह दि. ४.२.२०२० रोजी प्रकाशित झाला आहे. ४० पृष्ठांच्या ह्या संग्रहात अस्मिताच्या छान छान अशा ३३ कविता आहेत.

'प्रश्न' हा शब्द उच्चारला, तरी शालेय विद्यार्थ्यांच्या कपाळाला आठ्या पडतात. प्रश्नाच्या धास्तीने काहींच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. कारण त्यांना त्या प्रश्नाचे लेखी किंवा तोंडी उत्तर द्यावे लागते. असे असले तरी प्रश्न हाच उत्तराचा जन्मदाता असतो. उत्तराचा जन्मच मुळी प्रश्नाच्या पोटी होत असतो. म्हणून माणसाला प्रश्न पडणे, ही चांगली गोष्ट आहे. प्रश्न हेच ज्ञानाचे भांडार वाढवत असतात. म्हणूनच कु. अस्मिता चव्हाण प्रत्येक प्रश्नाचे स्वागत करते.
'प्रश्न का पडतात?' ह्या कवितेत कु. अस्मिता म्हणते:
'प्रश्न हेच आयुष्याची
वाट दाखवतात
तर त्याच वाटेत ते
कधीकधी काटे बनतात'.

प्रश्नांचं इतकं कौतुक करणारी ही अस्मिता चव्हाण आहे तरी कोण?
सांगतो... सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग-हरोली येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलात नववीत शिकणारी ही गुणी विद्यार्थिनी आहे. तिचा 'सैनिक' हा कवितासंग्रह दि. ४.२.२०२० रोजी प्रकाशित झाला आहे. ४० पृष्ठांच्या ह्या संग्रहात अस्मिताच्या छान छान अशा ३३ कविता आहेत.

आपल्याकडे मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो. पण हल्ली काही मुले व्यसनी बनून जीवनातून उठत आहेत. हे चित्र पाहून 'वंशाचा दिवा' ह्या कवितेत कु. अस्मिता उपहासाने म्हणते :
'वंशाचा दिवा
खातो तंबाखू, मावा'
कवितेच्या शेवटी ती लिहिते :
'तरीही लोक म्हणती, देवा
वंशाला माझ्या हवा दिवा'.
ह्या ओळींतून अस्मिताच्या लेखनातील भेदक व्याजोक्ती किंवा वक्रोक्ती दिसून येते. ह्या कवितेत टोकदार असा उपहास आहे, उपरोध आहे. समाजाच्या सनातनी मानसिकतेवर अस्मिता अचूकपणे बोट ठेवते. अशा व्यसनी, दुर्गुणी मुलापेक्षा मुलगी काय वाईट? असा प्रश्न अस्मिता उपस्थित करते. मुलगा -मुलगी असा भेद करू नका, अशी विनंती ती करते. शेवटी ती लिहिते :
'मुलग्यापेक्षा मुलगी
खरोखरीच बरी
आई-वडिलांचे
नाव कमावते खरी!'

हल्ली 'पब्जी' नावाच्या खेळाने मुलांना अक्षरशः वेड लावले आहे. काही मुले रात्रंदिवस मोबाईलवर 'पब्जी' नावाचा घातक खेळ खेळत असतात. प्रसंगी आपला जीवही गमावतात. ह्या व्यसनाबद्दल अस्मिता लिहिते:
'पब्जी आहे लय भारी
मुले झाली वेडी सारी'.
ह्या वेडाला आवर घालण्याचे आवाहन ती करते. 'पब्जी' ह्या विषयावर मी वाचलेली विद्यार्थिनीची ही पहिलीच कविता आहे. हल्ली मुलांचे कवितेचे विषय किती बदलले आहेत, हे यावरून लक्षात येते.

संवेदनशील अस्मिताला गरिबांविषयी कणव आहे, कळवळा आहे. गरिबांवर अन्याय होतो, ही बाब अस्मिताला अस्वस्थ करते. म्हणून 'गरीब-श्रीमंत' ह्या कवितेत ती आवाहन करते:
'गरीब-श्रीमंत भेद करू नका
गरिबांचा स्वाभिमान दुखवू नका'.
गरिबांनाही स्वाभिमान असतो, याची जाणीव अस्मिता करून देते. 

अस्मिताला देशाचे संरक्षण करणा-या सैनिकांविषयी नितांत आदर आहे. ह्या संग्रहात 'इंडियन नेव्ही', 'फौजी' आणि 'एअरफोर्स' ह्या शीर्षकाच्या वीरश्रीयुक्त ३ कविता आहेत. ह्या तिन्ही सैन्यदलांबद्दल तिला आकर्षण आहे. 'इंडियन नेव्ही' ह्या कवितेत नौदलाच्या कार्याचा गौरव करताना ती लिहिते :
'समुद्राची शान नेव्ही
समुद्राचा मान नेव्ही'.
'फौजी' ह्या कवितेत फौजी ह्या शब्दाची व्याख्या करताना ती लिहिते :
'देशासाठी मरायला असतो जो राजी
त्यालाच म्हणतात खरा फौजी!'
कवितेच्या शेवटी तिने 'आर्मी'  ह्या इंग्रजी शब्दांतील चार अक्षरांचा विस्तार करून आर्मीविषयीचा आपला आदर व्यक्त केला आहे.

'खरा विद्यार्थी' कोणाला म्हणावे, याबद्दल अस्मिताने तिचे मत 'विद्यार्थी' ह्या कवितेत नोंदवले आहे:
'विद्यार्थी हा विद्यार्थीच असतो
सगळीकडून ज्ञान मिळवत असतो'.
विद्यार्थी हा ख-या अर्थाने ज्ञानार्थी असला पाहिजे, असेच जणू अस्मिताला सुचवायचे आहे.

'व्याकरण' हा शालेय विद्यार्थ्यांचा अतिशय नावडता विषय असतो, कारण आपल्याकडे व्याकरण रंजकतेने शिकविण्याऐवजी अतिशय रूक्षपणे शिकविले जाते. व्याकरणातील संकल्पनांच्या व्याख्या आणि उदाहरणे लिहून दिली जातात. घोकंपट्टी करून छापील उत्तरे द्यायला शिकविले जाते. त्याचे उपयोजन समजावून सांगितले जात नाही. व्याकरणातील गमतीजमती आणि सौंदर्य उलगडून दाखविले जात नाही. त्यामुळे भाषेच्या व्याकरणाविषयी गोडी वाटत नाही. परिणामी भाषेविषयीची अभिरुची विकसित होत नाही.
'मराठी व्याकरण' ह्या कवितेत अस्मिताने व्याकरणातील शब्दालंकार, अर्थालंकार, समास, गण, लघू - गुरु इ. संकल्पनांना कवितेचा साज चढविला आहे. यावरून तिची व्याकरणाविषयीची समज आणि आवड दिसते.

'बोअर होणे' हा नव्या पिढीतील मुलामुलींचा अतिशय परवलीचा शब्द बनला आहे. त्यांना कोणतीही गोष्ट 'बोअर' होते. कधीकधी उगीचच त्यांना जीवनाचाही कंटाळा येतो.
'जगणं खूप सुंदर आहे' ह्या कवितेच्या माध्यमातून अस्मिता ह्या तरुण पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालते.
'सगळं मनासारखं होतंच असं नाही
पण मनासारखं झालेलं विसरू नका'
ह्या कवितेतून अस्मिताची जीवनाविषयीची स्वागतशीलता आणि समंजस जाण दिसून येते.

'झाडे' ह्या कवितेत ती मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व विशद करते.
'फॅमिली' ही अस्मिताची एक मजेशीर कविता आहे. या कवितेची एक ओळ मराठीत आणि दुसरी ओळ इंग्रजीतून लिहिली आहे. तथापि दोन्ही ओळींच्या शेवटी छान यमक साधले आहे. या कवितेत तिने नात्यांची हळुवार गुंफण केली आहे.
'शिवरायांचे किल्ले' ह्या कवितेत अस्मिताने शिवनेरी, सिंहगड, राजगड आणि प्रतापगड ह्या गडकिल्ल्यांची काव्यमय ओळख करून दिली आहे.

'जगायचं कोणासाठी' ह्या कवितेत तिने जन्मदात्या आईसाठी, प्रेमळ पित्यासाठी, गोष्टीवेल्हाळ आजीसाठी, पाठीराख्या दादासाठी, दीदीसाठी, मन जपणाऱ्या मित्र- मैत्रिणींसाठी जगायचे, असे उत्तर दिले आहे.
अस्मिताच्या 'दुष्काळ' ह्या कवितेत दुष्काळाची दाहकता जाणवते. 'मोबाईल' मुळे लोक वेडे झाले आहेत, अशी प्रतिक्रियाही ती नोंदविते. 'रक्षाबंधन' ह्या कवितेत ती बहीण-भावाच्या प्रेमाचे गीत गाते.

ग्रामीण भागात मुलीचा मित्र आणि त्यांचे प्रेम सहजपणे स्वीकारले जात नाही. 'माझा मित्र' आणि 'मी इथे तू तिथे' ह्या कवितांमध्ये वाढाळू वयाचे किंवा पौगंडावस्थेतील भावनिक आंदोलनांचे पडसाद उमटले आहेत. हे अतिशय स्वाभाविक आहे.
'पुस्तके' ह्या कवितेत ती पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करते. 'पुस्तके' आणि 'शिक्षक' ह्या कवितांमधून अस्मिताची ज्ञानलालसा जाणवते.

आई, बाबा, दादा, मैत्रीण, शिक्षक, शेतकरी ह्या कवितांमधून नात्यांचे गहिरे भावबंध तिने फार छान उलगडून दाखविले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जलपरी, पक्षी, तारे हे विषयही अस्मिताच्या कवितेला आवाहन करतात.

अभिजीत पाटील यांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. अस्मिताच्या शिक्षिका सौ. सुरेखा कांबळे आणि सौ. मनीषा पाटील यांनी ह्या संग्रहाला शुभेच्छारूपी आशीर्वाद दिले आहेत. देवेंद्र शिंदे यांनी ह्या पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ सजविले आहे.

अस्मिताच्या कवितांमध्ये आशयाची आणि विषयांची विविधता आहे. अल्पाक्षररमणीयता हे अस्मिताच्या कवितेचे ठळक वैशिष्ट्य आहे. कमीत कमी शब्दांत अधिकतम आशय व्यक्त करण्यात अस्मिताची कविता कमालीची यशस्वी झाली आहे. भावी वाटचालीसाठी अस्मिताला खूप खूप शुभेच्छा! 

'सैनिक' ( कवितासंग्रह)
कु. अस्मिता विश्वास चव्हाण
प्रकाशक : विश्वास चव्हाण, देशिंग.
पृष्ठे : ४०

पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड
sureshsawant2011@yahoo.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News