महिला क्रिकेटची साध्वी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 13 October 2019
  • मितालीला महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर अशी उपाधी देण्यात आली. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत वन-डेमध्ये सर्वांधिक धावांचा विश्‍वविक्रम प्रस्थापित करून तिने ही तुलना सार्थ ठरविली.

कोणत्याही क्षेत्रातील सर्जनशील व्यक्ती त्या क्षेत्रात आनंद शोधत असते. खेळाडूसुद्धा त्याला अपवाद नसतो. आधी खेळाडू वैयक्तिक आनंदापोटी खेळतात, मग ते संघासाठी-देशासाठी आणि पर्यायाने एकूणच खेळासाठी वेगळे परिमाण देण्यासाठी सराव अन्‌ कामगिरीच्या माध्यमातून साधनेत सक्रिय राहतात. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज ही अशीच साध्वी आहे.

महिलांच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी पुरुषांशी तुलना हीच फूटपट्टी लावली जाते. त्यानुसार मितालीला महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर अशी उपाधी देण्यात आली. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत वन-डेमध्ये सर्वांधिक धावांचा विश्‍वविक्रम प्रस्थापित करून तिने ही तुलना सार्थ ठरविली. मग न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक सामन्यात तिने शतकी खेळी साकारली.

मिताली नवनवीन विक्रम स्वतःसाठी नव्हे, तर संघासाठी महत्त्वाचे असल्याचे आवर्जून नमूद करते. भारतात महिला क्रिकेटला प्रतिष्ठा आणि लोकमान्यता मिळावी म्हणून विश्वकरंडक जिंकणे किती महत्त्वाचे आहे, याची मितालीला कल्पना आहे. २०१३ मध्ये मायदेशातील स्पर्धेत सुवर्णसंधी हुकल्याची हुरहूर मितालीला आजही जाणवते. हीच कसर भरून काढण्यासाठी मितालीने साधना सुरू ठेवली आहे. या वाटचालीत तिला ‘महिला क्रिकेटची कपिल देव’ असे बिरूद मिळालेल्या झूलन गोस्वामीची साथ लाभत आहे.

मिताली खेळपट्टीवर कशी आली याचा थोडक्‍यात उल्लेख करणे समयोचित ठरेल. हैदराबादमध्ये भाऊ मिथुनबरोबर ती मैदानावर सकाळी जायची. आधी तिला झोप आवरायची नाही, पण नंतर नुसत्या निरीक्षणातून तिने तंत्र आत्मसात केले. वडील दोराई राज यांनी मग तिला प्रोत्साहन दिले. मिताली तेव्हा भरतनाट्यम्‌ सुद्धा करायची. एकवेळ भरतनाट्यम स्पर्धा आणि महिला क्रिकेट संघाचे शिबिर असे दोन पर्याय मितालीसमोर होते. यात तिने क्रिकेटला पसंती दिली. भरतनाट्यम्‌मुळे तिची साधना-आराधना सुरू होती. हेच तिने क्रिकेटच्या मैदानावर नित्यनेमाने केले आहे. २० वर्षांच्या वन-डे कारकिर्दीत मितालीने सचिनप्रमाणेच असंख्य विक्रम केले आहेत; पण तिला एका वर्तुळाच्या पलीकडे फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. अर्थात मितालीमधील साध्वी या सर्वांच्या पलीकडे गेली आहे. यामुळेच तिने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कोणत्या क्षणी थांबायचे, हे तिने स्वतः ठरविले. त्यामुळे हरमनप्रीत कौर हिच्याशी वाद होऊनही तिने संघभावनेवर, देशप्रेमावर परिणाम होऊ दिला नाही.

मितालीला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. ही कामगिरी करून भारतीय महिला क्रिकेटला ‘अच्छे दिन’ आणणे हेच तिचे उद्दिष्ट आहे. यात तिला यश मिळणार का, तिला सहकारी खेळाडू साथ देणार का, याची महिला क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे. मितालीसारख्या सकारात्मक साध्वीमुळे ते भविष्य होकारात्मक असावे, हीच सदिच्छा!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News