साध्वी प्रज्ञासिंह म्हणतात त्या स्फोटाबाबत माहितीच नाही!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • सुनावणीवेळी प्रज्ञासिंह यांचे धक्कादायक उत्तर!
  • खटल्याला आरोपींनी किमान एकदा हजेरी लावावी, हा आदेशही न्यायालयाने  दिला

मुंबई - लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर शुक्रवारी (ता. ७) प्रथमच मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी विशेष न्यायालयात सुनावणीला हजेरी लावली. ‘मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचे माहीत आहे का?’, न्यायालयाच्या या प्रश्‍नावर साध्वी यांनी ‘मला माहीत नाही’, असे धक्कादायक उत्तर दिले. 

विशेष न्या. विनोद पाडळकर यांनी दोनवेळा ताकीद दिल्यानंतर अखेर शुक्रवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास साध्वी प्रज्ञा यांनी सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावली. सरकारी वकील अन्य न्यायालयात व्यस्त असल्याने दुपारच्या सत्रात खटल्याची सुनावणी सुरू झाली. खटल्यात सध्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहेत.

आतापर्यंत झालेल्या ११६ साक्षीदारांच्या जबाबातून २८ सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, असे आढळले आहे. ‘बॉम्बस्फोट कोणी केला हे मी विचारत नाहीये; पण तुम्हाला हा बॉम्बस्फोट झाल्याचे माहीत आहे का’, असा सवाल न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना विचारला. यावर ‘मला याची माहिती नाही’, असे उत्तर त्यांनी दिले.

‘खटल्याच्या कामकाजाबाबत माहिती आहे का’, या न्यायाधीशांच्या पुढच्या प्रश्‍नावरही त्यांनी, ‘किती साक्षीदारांची जबानी झाली याची माहिती नाही’, असेच उत्तर दिले. अन्य एक आरोपी सुधाकर द्विवेदीनेही न्यायालयाने विचारलेल्या या प्रश्‍नांवर ‘माहीत नाही’, असेच उत्तर दिले. 

किमान एकदा हजेरी लावावी!
खटल्याला आरोपींनी किमान एकदा हजेरी लावावी, हा आदेशही न्यायालयाने पुन्हा दिला. मालेगावचे तत्कालीन तहसीलदार किसनराव म्हसणे यांची साक्ष शुक्रवारी नोंदवण्यात आली. एकूण सात आरोपींवर सध्या खटला सुरू आहे.

असुविधेबाबत नाराजी
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर स्वतःहून अडीच तास न्यायालयात उभ्या होत्या. मात्र, न्यायालयाचे कामकाज संपल्यावर, त्यांनी न्यायालयातील असुविधांबाबत तक्रारी करीत आपला राग व्यक्त केला. दुपारी खटल्याचे काम सुरू झाल्यावर त्यांना बसण्यासाठी खुर्ची हवी आहे का असे न्यायधीशांनी विचारले.

मला खिडकीजवळ उभे राहायचे आहे, असे सांगत त्यांनी बसण्यास नकार दिला. मात्र, सुनावणी संपल्यावर त्यांनी न्यायालयातील असुविधांबाबत आपला राग व्यक्त केला. सुनावणीला बोलावल्यानंतर इथे बसायला आणि उभे राहायलाही जागा नाही. मी आजारी आहे, अशा खुर्चीवर बसले तर संसर्ग होऊन मी अधिकच आजारी पडेन, जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत नीट बसायला जागा तरी द्या, नंतर हवे तर शिक्षा करा, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या विधानांबाबत अन्य वकीलही अवाक्‌ झाले. त्यांना दिलेली खुर्ची ठीकठाक होती, असे समजते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News