'महाराष्ट्र केसरीसाठी' झुंजणार 'शेळके विरुध्द सदगीर'

संदीप खांडेकर
Tuesday, 7 January 2020

पहिल्या फेरीत हर्षवर्धनने एक गुण मिळवला. दुसऱ्या फेरीतही दुहेरी पट काढत त्याने सचिनवर ताबा मिळवला. सचिनला एकही गुण वसूल करता आला नाही. हर्षवर्धनने ६-० ने लढत जिंकली.  

पुणे : महाराष्ट्र केसरी गदेसाठी नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सदगीर विरुद्ध लातूरचा शैलेश शेळके यांच्यात आज सायंकाळी पाच वाजता अंतिम लढत होईल. मॅट विभागातून हर्षवर्धन, तर माती विभागातून शैलेशने ११-१० अशा थरारक विजयासह अंतिम फेरी गाठली. पुणे शहराचा अभिजित कटके व बुलडाण्याचा बाला ‌रफीक शेख यांचे डबल ‌महाराष्ट्र केसरीचे स्वप्न भंगले. 

अखेरच्या क्षणांत हर्षवर्धन भारी

मॅट विभागात पुणे शहरचा अभिजित कटके विरुद्ध नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत झाली. अभिजितने पहिल्या फेरीत एकेरी पट काढत एक गुण मिळवला. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने चार गुणांची कमाई केली. अखेरच्या क्षणांत हर्षवर्धनने आक्रमक चाल करत अभिजितवर ताबा मिळवून गुण वसूल केले. तो विजयी होताच प्रेक्षकांनी त्याला टाळ्यांची दाद दिली.  

पंधरा सेकंदांत शैलेशची कमाल

माती विभागात सोलापूरच्या माऊली जमदाडेला  शेळकेने धक्का दिला. पहिल्या फेरीत माऊलीची आक्रमक चाल परतवताना शैलेशने बॅक थ्रो केला. मग माऊलीने चार गुणांची कमाई केली. मग त्याने तब्बल आठ गुण कमावले, मात्र शैलेशने प्रतिडाव टाकत १०-१० बरोबरी साधली. मग अवघे १५ सेकंद बाकी असताना त्याने एक गुण मिळविला जो निर्णायक ठरला.  विजयानंतर त्याने वस्ताद काका पवार यांना खांद्यावर घेऊन मैदानात फेरी मारली.

सचिनचा गुणतक्ता कोरा

तत्पूर्वी, मॅट विभागात हर्षवर्धन विरुद्ध मुंबई उपनगरचा सचिन येलभर यांच्यात लढत झाली. पहिल्या फेरीत हर्षवर्धनने एक गुण मिळवला. दुसऱ्या फेरीतही दुहेरी पट काढत त्याने सचिनवर ताबा मिळवला. सचिनला एकही गुण वसूल करता आला नाही. हर्षवर्धनने ६-० ने लढत जिंकली.  

अभिजितची सागरवर मात

पुणे शहरचा अभिजित कटके विरुद्ध लातूरचा सागर बिराजदार यांच्यातील लढत तूफान होईल, अशी प्रेक्षकांना अटकळ होती. पहिल्या फेरीत अभिजितने एक गुण वसूल केला. दुसऱ्या फेरीत त्याने फारसे आक्रमक डाव न करता सागरवर विजय मिळवला.

शैलेशची गणेशविरुद्ध झुंज

माती विभागात लातूरचा शैलेश शेळके विरुद्ध हिंगोलीचा गणेश जगताप यांच्यातील लढतीने डोळ्यांचे पारणे फेडले. शैलेशने ही लढत ६-४ ने जिंकली. 

हप्ते डावावर माऊलीकडून बाल रफीक शेख चितपट

बुलढाण्याच्या बाला रफिक शेख विरुद्ध सोलापूरच्या माऊली जमदाडे यांच्या लढतीकडे प्रेक्षकांचे डोळे लागले होते. माऊलीने बालाचा हुकमी हप्ते डाव त्याच्यावरच उलटवून त्याला चितपट केले. या पराभवाने बाला शेखचे डबल महाराष्ट्र केसरीचे स्वप्न भंगले.
७४ किलो गटात कोल्हापूर जिल्ह्याच्या अनिकेत चव्हाणने सोलापूरच्या आबासाहेब मदनेवर मात केली. तो मोतीबाग तालमीचा मल्ल आहे. या गटात सांगलीचा श्रीकांत निकम कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

चौथ्या फेरीत संग्राम पाटील पराभूत झाल्याने कोल्हापूरचे आव्हान संपले. नाशिक जिल्ह्याचा हर्षद सदगीर याने त्याचा १०-० ने पराभव केला. गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असतानाही तो मैदानात लढला.
दरम्यान, ७४ किलो गटात माती विभागात कोल्हापूरच्या अनिकेत चव्हाणने सुवर्णपदक पटकावले.  क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी स्पर्धेस हजेरी लावली. त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक घेऊ. तसेच महाराष्ट्र केसरीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यासाठीही पावले उचलू.’

महिला स्पर्धेला मान्यता

त्यांनी महिलांच्या राज्य कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान रायगडला द्यावा, अशी मागणी केली. त्याला तात्काळ परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी मान्यता दिली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माती विभागातील अंतिम लढतीस सुरुवात झाली. माती व मॅट विभागातील विजेत्यांना त्यांच्या हस्ते पदके देण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News