ग्रामीण भागात जीव झोळीत घेऊन असे धावतात गावकरी; व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020
  • ग्रामीण भागातील रूग्णांचे हल्ला होत आहे.
  • वयोवृद्ध रुग्णाला झोळीत घेऊन हॉस्पिटलकडे धावणाऱ्या गावकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • गावाला रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढत जीव वाचवण्यासाठीची गावकऱ्यांची धडपड या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

बीड :- ग्रामीण भागातील रूग्णांचे हल्ला होत आहे. वयोवृद्ध रुग्णाला झोळीत घेऊन हॉस्पिटलकडे धावणाऱ्या गावकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गावाला रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढत जीव वाचवण्यासाठीची गावकऱ्यांची धडपड या व्हिडिओमध्ये दिसत आहे. बीड जिल्ह्यातील हनुमानवाडीमधील भीषण वास्तव दाखवणारा हा व्हिडीओ आहे. ६  किलोमीटरच्या पक्क्या रस्त्यासाठी स्वातंत्र्याच्या ७० वर्षांपासून गावकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. दळणवळणाचा पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

वारंवार निवेदने, पत्र आणि अर्ज देऊन ही गावचा रस्ता न झाल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतः च्या वाहनांने गावात येऊन दाखवावे, लाख रुपये देऊन सत्कार करू, असे आव्हान गावकऱ्यांनी दिले आहे. आम्ही देखील माणसेच आहोत. रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावा, अशा संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील हजार लोकवस्ती असलेल्या हनुमानवाडी, म्हाळसवाडी या गावात स्वातंत्र्याच्या ७० वर्षांपासून पक्का रस्ता झाला नाही. गावात कुणी वयोवृद्ध आजारी असेल तर झोळीत घालून घेऊन जावे लागते. तसेच साप, विंचू चावला तर हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत रुग्णाचा जीव जातो की, काय, अशी भीती कायम राहाते. यातच या दोन्ही गावाला जोडणाऱ्या रस्त्यात नदी ओढे आहेत. गावकऱ्यांनी तयार केलेला कच्चा रस्ता दरवर्षी पावसामुळे वाहून जातो. त्यामुळे हॉस्पिटलला जायचे कसे? असा प्रश्न नेहमीच आ वासून उभा राहतो. जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी गावात येऊन आमची परिस्थिती पाहावी. या मरणाच्या रस्त्यापासून सुटका करावी, अशी आर्त मागणी हनुमानवाडी आणि म्हाळसवाडी येथील नागरिकांनी दिली आहे.

चिकूच्या बी नं चिमुरड्याचा श्वास रोखला...

हनुमानवाडी गावात राहणाऱ्या विमलबाई सानप यांचा तीन वर्षांचा नातून पुण्याहून लॉकडाऊनच्या कालावधीत गावी आला होता. राजवीर संजय सानप असे त्याचे नाव. चिक्कू खात असताना राजवीरच्या घशात चिकूची बी अडकली. त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचे होते. परंतु, मोटरसायकल, ॲम्बुलन्स रस्त्याने जात नसल्यानं १ तास उशीर झाला, रस्त्यातच राजवीर याने प्राण सोडला होता. गावाला चांगला रस्ता मिळाला असता तर आज आमचा राजवीर आमच्याशी बोलला असता, खेळला असता, असे सांगताना विमलबाई यांच्या डोळ्यात पाणी तराळले होते. दर आठवड्यात कोणी ना कोणी आजारी पडल्यानंतर नेहमी अशीच जीवघेणी कसरत जीव वाचवण्यासाठी करावी लागते. असे या गावातील तरुण पांडुरंग सानप यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात हनुमानवाडी, म्हाळसवाडी रस्ता पंतप्रधान सडक योजनेंतर्गत मंजूर झाला आहे. परंतु, कंत्राटदार आणि प्रशासनातील गलथान कारभारामुळे हा रस्ता होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांना जीव गमवावा लागत आहे. लवकरात लवकर आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News