कोल्हापूरपासून सोलापूरपर्यंत नऊवारीचा वाढतोय नखरा 

सुस्मिता वडतिले 
Thursday, 27 June 2019

पाचवारी साडी अल्पावधीतच महाराष्ट्रात हिट झाली आणि काळाच्या ओघात तिची जागा नऊवारीने घेतली.

सोलापूर - भारतीय पेहरावात नऊवारी साडीला खूप महत्त्व असून ही नऊवारी सर्वदूर पसरली आहे. आता त्याची क्रेझ नववधू तसेच महाविद्यालयीन युवतींत पसरल्याचे चित्र सांस्कृतिक व कौटुंबिक, सार्वजनिक कार्यक्रमात पाहण्यात येते. 

पाचवारी साडी अल्पावधीतच महाराष्ट्रात हिट झाली आणि काळाच्या ओघात तिची जागा नऊवारीने घेतली. सण-उत्सव, सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमापुरतीच मर्यादित राहिलेली नऊवारी आता आधुनिकतेचा मुलामा घेऊन पुन्हा तरुणाईत फेमस झाली आहे. कोल्हापुरी नऊवारी, ब्राह्मणी नऊवारी, पेशवाई नऊवारी आणि लावणी नऊवारी असे तब्बल नऊवारीचे नऊ प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. रेडिमेड नऊवारीच्या शिलाईसाठी 850 ते एक हजार रुपयांचा दर आहे.

शहरात जागोजागी रेडिमेड नऊवारी शिलाईची दुकानेही वाढून त्यातून रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. अनेक गाण्यांत अभिनेत्री नऊवारी साडी घालून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. आता स्टिच नऊवारीही बाजारात उपलब्ध असून त्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. लग्नसराईत नववधू नऊवारी साडीचीच मागणी करते. त्यांच्याबरोबरच मैत्रिणी व वधूच्या कुटुंबातील महिलाही नऊवारीच नेसण्याचा हट्ट धरू लागले आहेत. परंपंरा आणि सोय यातून तरुणाईने मध्यम मार्ग शोधत नवी फॅशन तयार केल्याचे चित्र पाहण्यात येते. 

भारतीय परंपरा अन्‌ संस्कृतीचे जतन नऊवारीच्या माध्यमातून केले जाते. आमच्यावर भगवंताची निष्ठा असून मागील काही वर्षांपासून भारतीय संस्कृतीचे जतन आणि तरुणाई, महिला, नववधूंची फॅशन पुरवण्यासाठी नऊवारी विक्रीचा व्यवसाय करतो. 
आशा कवठे, नऊवारी विक्रेता, सोलापूर 

महाराष्ट्राची संस्कृती खूप समृद्ध असून पारंपरिक जेवण, उत्सव आणि पेहरावातून त्याची प्रचिती येते. नऊवारी साडीचा ट्रेंड आता अवरतोय. माझ्याकडे मस्तानी नऊवारी असून ती मला खूपच आवडते.
मेघना गायकवाड, गृहिणी 

परंपरा व संस्कृतीचे दर्शन विविध माध्यमातून घडत असते. पारंपरिक नऊवारीत वावरणे मला खूप आवडते. सण, उत्सव, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात नऊवारी आवर्जून घालावी वाटते. मराठी संस्कृती जिवंत राहील व पुढच्या पिढीला त्याची माहिती होईल.
वर्षा अंबुरे, गृहिणी 

नऊवारी साडी म्हटलं की मन प्रसन्न होते. अतिशय सुंदर, देखणा आणि रुबाबदार असा पोशाख नऊवारीचा आहे. नऊवारी घातलेल्या स्त्रीचे सौंदर्य खुलून दिसते. पारंपरिक वारसा जतन करण्याच्या निमित्ताने आणि आवड म्हणून नऊवारी साडी घालायला आवडते.
नीता रघूजी, गृहिणी

नऊवारी साडीतून भारतीय संस्कृतीची ओळख होते. पेशवाई नऊवारी साडी मी खरेदी केली असून मला विविध कार्यक्रमानिमित्त ती घालायला खूप आवडते. बदलत्या जमान्यात जुनी संस्कृती जोपासण्याची गरज आहे. 
शुभांगी ढेपे, गृहिणी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News