या नियमामुळे संघाची धावसख्या वाढणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 June 2020
  • ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांचे मत 

सिडनी : कोविड-19 चा धोका टाळण्यासाठी क्रिकेटमध्ये चेंडूवर लाळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे; मात्र त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉल यांच्यातील संतुलन बिघडण्याची जोखीम असेल, असा इशारा रविवारी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोविड- 19 महामारीच्या अनुषंगाने अंतरिम आरोग्य सुरक्षा उपाययोजनेअंतर्गत चेंडूवर लाळ लावण्यास बंदी आणली आहे. त्यामुळे क्रिकेट फलंदाजांसाठी जास्त अनुकूल ठरण्याची चिंता व्यक्त होत आहे.

"मला थोडीफार चिंता वाटते, कारण विशेषतः कसोटी सामन्यांत चेंडू बॅटवर किंचित वर्चस्व राखत असताना खेळ चांगला वाटतो, कसोटी क्रिकेट अशाच प्रकारे खेळले जाते," असे टेलर यांनी सांगितले.

55 वर्षीय माजी सलामीवीरास लाळेचा वापर न झाल्यास चेंडूचा अंदाज बांधणे फलंदाजास सोपे ठरेल, ही चिंता सतावत आहे. "जर खेळाडू चेंडूला चकाकी देऊ शकला नाही आणि चेंडू सरळ रेषेत येऊन खूपच अंदाज बांधता येऊ लागला, तर अधिकाधिक धावा होताना पाहायला मिळतील. कसोटी क्रिकेट सामन्यात धावपर्वत उभे राहतील, ही माझी चिंता आहे," असे टेलर म्हणाले. "आणि हे सर्वोत्तम कसोटी क्रिकेट नसेल. जेव्हा धावसंख्या 300 च्या आसपास असते तेव्हा कसोटी क्रिकेट चांगले ठरते," असे त्यांनी नमूद केले.

लाळेच्या बंदीचे उल्लंघन करताना खेळाडू आढळल्यास प्रत्येक डावात दोन वेळा इशारा देण्याची प्रणाली आयसीसीने सुरू केली आहे. त्यानंतर आणखी उल्लंघन झाल्यास पाच धावांची पेनल्टी असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News