मालेगावच्या लेकी 'सावित्रीबाईंच्या' भूमिकेत

घनश्‍याम अहिरे
Thursday, 9 January 2020

सावित्रीबाईंच्या प्रवासातील दोन्हीही मुख्य भूमिका येथील लेकींच्या, तर सहाय्यक दिग्दर्शनाची संधी लेकरांना गवसली आहे.

दाभाडी : मॉलिवूडनगरी म्हणून मनोरंजन विश्‍वात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मालेगावने मानाचे स्थान पटकावले आहे. सोनी मराठी टीव्हीवरील ‘सावित्रीज्योती’ मालिकेत मालेगाव तालुक्‍यातील तीन कलाकार आहेत. सावित्रीबाईंच्या प्रवासातील दोन्हीही मुख्य भूमिका येथील लेकींच्या, तर सहाय्यक दिग्दर्शनाची संधी लेकरांना गवसली आहे.

जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याची यशोगाथा दशमी प्रॉडक्‍शन सोनी मराठी टीव्हीवर ‘सावित्रीज्योती आभाळाएवढी माणसं होती’ ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. सावित्रीबाई फुलेंचे लहानपण आणि मोठेपणीची भूमिका साकारणाऱ्या ‘त्या’ दोन्ही कलाकार आणि मालिकेचा क्रिएटिव्ह दिग्दर्शक मूळ मालेगाव तालुक्‍यातील रहिवासी आहे. सोयगावच्या योगायोग मंगल कार्यालयाजवळ राहणारे निवृत्त पशुवैद्य वसंतराव शिंदे यांची नात आणि प्रा. हेमंत व भारती शिंदे या शिक्षक-शिक्षिका दांपत्याची नववीत शिकणारी कन्या तृशनिका ही लहानग्या ‘साऊ’ची भूमिका साकारत आहे. यापूर्वी ‘हृदयांतर’ चित्रपटातील मुख्य भूमिका प्रेक्षकांना भावली होती. सोयगावच्या मातीतील हे अस्सल नाणे आता सावित्रीबाईंच्या भूमिकेत झळकत आहे.

मोठेपणीच्या सावित्रीबाईंनी भूमिकेसाठी मालेगाव येथील म्युनिसिपल हायस्कूलचे निवृत्त शिक्षक, मालेगाव कॅम्पस्थित एम. एम. कासार यांची नात व मुंबईत वास्तव्य करणारे डॉ. उल्हास कासार यांची कन्या अभिनेत्री अश्‍विनी कासार हिची निवड झाली आहे. कमला, कट्टी-बट्टी मालिकेतून घराघरांत पोचलेली ही अभिनेत्री आता सावित्रीबाई यांची ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. या दुहेरी योगायोगासह तिसरा संगमयोग दाभाडीच्या हरहुन्नरी कलाकाराने साधला आहे. अहिराणी कवी डॉ. एस. के. पाटील यांचे चिरंजीव अक्षय पाटील या मालिकेचे क्रिएटिव्ह दिग्दर्शन करीत आहेत. मराठी चित्रपट व मालिकांचा दीर्घ अनुभव त्याच्या गाठीशी आहे. या तिन्हीही कलाकारांनी मालेगावचे नाते अधोरेखित केल्याबद्दल ‘सकाळ’शी बोलताना आनंद व्यक्त केला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News