मतदार संघातील कामे अशी करून घेतात रोहित पवार... 

सकाळ (यिनबझ)
Thursday, 23 January 2020

रोहित पवारांनी आज काका अजित पवार यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी सामाजिक संघटनांच्या तसेच कर्जत-जामखेड मतदार संघातील वेगवेगळ्या कामांचे प्रश्न अजित पवारांसमोर मांडले.

मुंबई : पवार घराण्यातील तरुण नेते म्हणून ओळख असेलल्या रोहित पवारांनी आज काका अजित पवार यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी सामाजिक संघटनांच्या तसेच कर्जत-जामखेड मतदार संघातील वेगवेगळ्या कामांचे प्रश्न अजित पवारांसमोर मांडले. अजित पवार हे सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा डोलारा सांभाळत आहेत. 

भेट घेतल्यानंतर अजित पवारांबरोबर काय कामाचा अनुभव आला हे रोहित पवारांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की अजित दादांची काम करण्याची पद्धत हि पूर्णतः निराळी आहे आणि ती मला आज प्रत्यक्ष पाहायला मिळाली. दादा कोणताही विषय लांबवत नेत नाहीत तर तो लगेच कसा सुटेल यावर भर देतात. 
 
रोहित पवारांची या भेटीवरची फेसबुक पोस्ट 

 

प्रशासनावर घट्ट पकड असलेला, प्रश्नांचा बारकाईने अभ्यास असलेला, कामाचा उरक आणि जबरदस्त निर्णयक्षमता असलेला नेता म्हणून संपूर्ण राज्यात अजितदादांना ओळखलं जातं. अनेकांनी त्यांच्या या गुणांचा अनुभव घेतलेला आहे. कालही माझ्या कर्जत-जामखेड या मतदारसंघातील वेगवेगळ्या कामांसाठी आणि इतर सामाजिक संघटनांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात दादांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत एका बैठकीला उपस्थित राहण्याचीही संधी मला मिळाली. यावेळीही दादांची काम करण्याची अनोखी शैली मला परत एकदा प्रत्यक्ष जवळून अनुभवायला मिळाली. एखादा विषय लांबवत नेण्यापेक्षा तो लगेच कसा सुटेल, यावर दादांचा नेहमी कटाक्ष असतो.

तसेच एखाद्या निर्णयामुळे लोकहित साधलं जात असेल तर अन्य कशाचीही पर्वा न करता अजितदादा निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यांच्यासाठी लोकांची सोय ही अधिक महत्त्वाची असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य लोक थेट दादांकडे इतक्या आत्मविश्वासाने का जातात, याचं उत्तर दादांच्या काम करण्याच्या या शैलीतून मिळतं. दादांचा हा गुण मला नेहमीच खूप भावतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News