'रोहित आणि माझ्यात मतभेद नाहीत', विराटचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019
  • टीम इंडियात हम सब साथ साथ
  • कर्णधार विराट कोहली आणि मार्गदर्शक रवी शास्त्री यांची अफवांच्या विरोधात टोलेबाजी

मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही सातव्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर धडक मारली. वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली. संघात दुफळी असती, तर एवढी मोठी प्रगती करता आली नसती, असे दाखले देत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने संघांमधील वातावरण मैत्रीपूर्ण असल्याचा निर्वाळा दिला. कोणी खेळापेक्षा मोठा नसतो खेळ सर्वश्रेष्ठ असतो, असे सांगत संघात सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले.

वेस्ट इंडीज दौऱ्यावर प्रयाण करणाच्या पूर्वसंधेला विराट कोहली आणि रवी शास्त्री प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. बीसीसीआयने अगोदर जाहीर केलेल्या कार्यक्रमात शास्त्री उपस्थित रहाणार याचा उल्लेख नव्हता. पण विराटबरोबर शास्त्री आले आणि या दोघांनी संघातील दुफळीबाबतच्या प्रश्नांनावर जोरदार बॅटिंग केली.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर वरिष्ठ खेळाडूंमध्ये प्रामुख्याने विराट आणि रोहित शर्मा यांच्यात दुफळी निर्माण झाल्याच्या चर्चांनी शिखर गाठले होते. या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद महत्त्वाची होती. 

ड्रेसिंग रुममध्ये या
ड्रेसिंग रुममधले वातारण किती मैत्रीपूर्ण असते हे पहायला तुम्ही या, असे विराट हसत हसत बोलला, प्रत्येक वेळी आम्ही व्हिडियो काढू शकत नाही, अन्यथा तुम्हाला ते जाणवले असते... आम्ही तिन्ही प्रकारच्या खेळात केलेली प्रगती पहा संघात एकोपा नसता, तर हे शक्‍य झाले नसते, असे विराट म्हणाला. जेव्हा मी चाहत्यांमध्ये जातो तेव्हा तुम्ही किती चांगले खेळत असतात, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते.

शास्त्रींना पाठिंबा
एकीकडे भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जात असताना मायदेशात प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शास्त्री यांनी पुन्हा प्रशिक्षक होण्यास पाठिंबा देणार का, या प्रश्नावर विराट म्हणाला, सल्लागार समितीने मला काहीही विचारेले नाही, पण शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू समाधानी आणि आनंदी आहेत, असे उत्तर दिले. यातून विराटने शास्त्रींनाच पाठिंबा असल्याचे अधोरेखित केले. 

अजिंक्‍यवर भरवसा
विंडीज दौऱ्यातील कसोटी सामन्यांबाबत विराटने सांगितले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून आम्ही रोहितला प्राधान्य दिलेले होते. परंतु अजिंक्‍य रहाणेही तेवढाच भरवशाचा आणि हुकमी फलंदाज आहे. तो संघात असताना मधली फळी भक्कम असते. तो संघात असल्याचा आधार असतो.

मूर्खपणा आणि खोटारडेपणा...
सुरवातीला विंडीज दौऱ्याबाबत प्रश्नांची औपचारिकता झाल्यानंतर पत्रकारांनी ‘दुफळी’बाबत प्रश्न सुरू झाले. यासंदर्भातील पहिल्याच प्रश्नावर विराट उत्तर देत असताना शास्त्री यांनी पुढाकार घेतला आणि खेळापेक्षा कोणी मोठा नाही, असे सांगितले. विराटला हा प्रश्न पुन्हा वेगळ्या शब्दात विचारला, पण त्याने संयम सोडला नाही. मात्र अशा प्रकारच्या अफवा या मूर्खपणाच्या, खोटारड्या आणि हास्यास्पद असल्याचे सांगितले. मी देखिल या अफवांकडे दुर्लक्ष केले आहे. संघातील वातावरण चांगलेच आहे.

चेहरा हाच माझा आरसा
माझा चेहरा बोलका आहे. माझा चेहरा कोणतीही गोष्ट लपवू शकत नाही. मला तांत्रिकपणे वागता येत नाही. जर मी कोणाचा तिरस्कार करत असेन ते माझ्या चेहऱ्यावरून दिसून येते, असे सांगत विराटने संघात कोणाबरोबरही मतभेद नसल्याचेच सूचित केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News