काय दिवस होते यार ते! आय मिस यू...

एकता जाधव
Monday, 19 October 2020

नवीन मित्र मैत्रीणींना भेटायचा तो पॉईंट होता.. आणि या काळात नवनवीन किस्से कळायचे. कोण कुणाची गर्लफ्रेंड, कोण कुणाचा बॉयफ्रेंड.. एकमेकांकडे बघून खाणाखुणा हे सगळं चालू असायचं...

काय दिवस होते यार ते! आय मिस यू...

नवरात्र आणि दांडिया नाईट्स याचं नातं कोणाला वेगळं सांगायला नको.. दरवर्षीची धम्माल यावर्षी आपण सगळेच मिस करतोय... ही धमाल मिस करणं म्हणजे नेमकं काय मिस करतोय याचे सोलापूरच्या एकता जाधवने सांगितलेले किस्से... आठवणी!

मी एकता जाधव... मूळची सोलापूरची... पण कॉलेजमुळे पुण्यात राहण्याचा योग आला. मागच्या वर्षी कॉलेज, अभ्यास, इव्हेंट करत करत खूप धमाल आणि मजा मस्ती केली... आणि आता शारदीय नवरात्र चालू आहे, या निमित्ताने सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे... पण ती मागच्या वर्षी नवरात्रात जी दांडिया आणि गरबाची मजा होती ती काही या वेळी अनुभवता येणार नाही... जिकडे बघावं तिकडे शांतता, सोशल डिस्टन्सिंग, लोकांना एकत्र यायला बंदी, मास्क... हे काय आहे सगळं?...... कंटाळा आलाय या सगळ्याचा....

मी तर खूप मिस करतीये दांडिया, गरबा, घागरा - चोळी, सिलव्हर ज्वेलरी, मेकअप हे सगळं. काय मजा यायची... सकाळी कॉलेज उरकून कॅन्टीन मध्ये जमायचं आणि संध्याकाळी दांडिया नाईटसाठी कुठले कपडे घालायचे, कसा गेटअप करायचा, सगळ्यांनी कुठं एकत्र जमायचं हे सगळं ठरवायचं आणि त्या वेळेस ठरलेल्या ठिकाणी भेटून फूल्ल राडा करायचा. काय दिवस होते यार ते!

नवरात्र सुरु होण्याच्या आधीच प्रत्येक कॉलेज, कॉलेज बाहेरील रस्ते आणि मोठे लाॅन्स या ठिकाणी दांडिया नाइट्सचे बॅनर लागलेले असायचे. घटस्थापनेच्या सुरुवातीच्या एक दोन दिवस काही एवढी गर्दी दांडियासाठी पाहायला मिळत नसे... फक्त चिल्लर पार्टीतील लहान मुलंच खेळताना दिसत. पण नंतरचे दिवस मात्र खच्चून गर्दी...

घरातील गृहिणी असू दे किंवा जाॅब करणाऱ्या मुली... जरा नटून, मन मोकळं करून दांडियाची मजा लुटत... घरा जवळील मंडळांमध्ये मस्त आवरून दांडिया खेळायला गेलं की तिथे लहान लहान मुलं राउंड मध्ये शिरून गर्दी करायची आणि मग नीट खेळतच यायच नाही, जाम डोकं फिरायचं यार. काही लहान मुलं तर अशी असायची कि त्यांना लहान मुलांचा वेगळा ग्रुप करून दिला तरी ती आमच्या मोठ्या मुलांमध्येच खेळायला घुसणार. त्यात गरबावाल्यांचा ग्रुप वेगळा. मग कॉम्पिटिशन....... बेस्ट कपल, बेस्ट गेटअप, बेस्ट डान्सर आणि मग प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय.

कधी कधी चुकून एकमेकांच्या हातावर दांडी लागायची आणि ज्याला दांडी लागायची त्याचा वेडावाकडा चेहरा बघून इतकं हसायला यायचं कि बस.... काही मुलं मुद्दाम जवळ येण्याचा प्रयत्न करायची. वेडंवाकडं नाचायची. त्यांचं ते नाचणं बघून खूप हसायला यायचं. खूप नाचून दमायला व्हायचं आणि जेवण करून घरचे जेव्हा दांडिया बघायला यायचे तेव्हा, "पाण्याची बाटली का नाही आणली? किती तहान लागली!" म्हणून परत घरच्यांवरच चिडायचं.

नवीन मित्र मैत्रीणींना भेटायचा तो पॉईंट होता.. आणि या काळात नवनवीन किस्से कळायचे. कोण कुणाची गर्लफ्रेंड, कोण कुणाचा बॉयफ्रेंड.. एकमेकांकडे बघून खाणाखुणा हे सगळं चालू असायचं... दहा वाजता दांडिया संपायच्या आणि मग दांडियाची गाणी बंद करून फिल्मची गाणी आणि त्यावर फुल 'गणपती डान्स'... काय मजा यायची... भारीच... घरचे वैतागायचे पण आम्ही वैतागत नव्हतो. नंतर सगळ्या ग्रुपबरोबर सेल्फी हे सगळं खूप आठवतं पण आता काही पर्याय नाही... हे वर्ष सोडून दिल्यातंच जमा आहे..

पुढच्या वर्षी परत धमाल करु सगळे. या वर्षी जीव वाचला आणि सुरक्षित आहोत हेच खूप झालं. म्हणतात ना, सिर सलामत तो पागडी पचास!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News