‘नीट’ परीक्षा पुन्हा द्यावी का?

हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
Wednesday, 5 June 2019

‘नीट-२०१९’ परीक्षा संपली, त्यानंतर दोन-तीन दिवसांतच गुणांचा अंदाज आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपण परीक्षा रिपीट करावी, असे वाटू लागले.

‘नीट-२०१९’ परीक्षा संपली, त्यानंतर दोन-तीन दिवसांतच गुणांचा अंदाज आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपण परीक्षा रिपीट करावी, असे वाटू लागले. खरेच कोणी रिपीट करावे? त्यांना यामध्ये यश मिळेल का? अगदी कोटा-लातूर गाठले तरी नक्की कोणाला यश मिळेल या बाबतची माहिती असायला हवी.

प्रवेशासाठीची पात्रता : एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी खुला गट ५० टक्के पर्सेंटाईल व राखीव गट ४५ टक्के पर्सेंटाईल गुणाची आवश्‍यकता असते. गेल्यावर्षी ७२० पैकी ११९ व ९८ गुण अशी पात्रता होती. यंदा प्रवेशासाठी यंदाचा पेपर सोपा गेल्यामुळे सर्वसाधारणपणे खुला गट शासकीय एमबीबीएससाठी ५२० पैकी जास्त, खासगीसाठी ४५०च्या पुढे गुण लागतील असा अंदाज आहे.

‘नीट’ रिपीट करण्याची कारणे : एमबीबीएस प्रवेशासाठीच विद्यार्थ्यांचा ‘नीट’ रिपीट करण्याकडे कल असतो. याच्या राज्यात शासकीय ३११०, तर खासगी २२०० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. दहावीमध्ये ९० टक्‍क्‍यांवर गुण मिळविणारे ९० हजार विद्यार्थी, ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे २ लाख विद्यार्थी या प्रत्येकाचे स्वप्न एमबीबीएस होण्याचे असते. दहावीचे गुण फसवे असतात. जागांचा विचार करता प्रत्येकाला प्रवेश मिळणारच नाही. बहुतेक विद्यार्थी भरमसाट फी देऊन क्‍लास लावतात. कमी गुण मिळाल्यास एमबीबीएससाठी रिपीट करतात.  

रिपीट करण्यापूर्वी : आपल्याला एमबीबीएस प्रवेश मिळवायचा आहे, तर शासकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी खुल्या गटासाठी ५२०च्या पुढे, ओबीसीसाठीही ५००च्या पुढे, अगदी एससीसाठी देखील ३७५पर्यंत गुण लागतात. यानंतरचा पर्याय हा खासगी महाविद्यालयाचा, तेथे शुल्क ६ ते ९ लाख रुपये असते. मात्र येथेही आवश्‍यक गुण ४५०च्या पुढेच लागतात. तर तिसरा पर्याय हा अभिमत विद्यापीठातील आहे, मात्र येथे प्रतिवर्षी फी ११ ते २२ लाख रुपये असते. येथे आरक्षण नाही, मात्र २५० गुण मिळाले तरी एमबीबीएस प्रवेशाची खात्री असते. आपल्या बारावी गुणांचे प्रथम पृथ्थःकरण करावे. बारावीमध्ये गुण मिळाले, तरच ‘नीट’मध्ये यश येते. बारावीच्या टक्केवारीमध्ये संस्थांकडून मिळालेल्या गुणांचा मोठा वाटा असतो. प्रवेश एका ठिकाणी, क्‍लास दुसरीकडे, इंटिग्रेटेड वगैरे या सगळीकडेच वीसपैकी मार्कांची खैरात केली जाते. बारावीमध्ये फक्त पात्रता ५० टक्के गुण असतील, त्यांना ‘नीट’मध्ये १०० ते २०० गुणच असतात. ‘नीट’ रिपीट करूनही ४०० गुणांचा पल्ला ते गाठू शकत नाहीत. आपले सध्याचे ‘नीट’चे मार्क तपासा. त्यामध्ये अगदी दुप्पट झाले तरीही ४००पर्यंत मजल जात नसल्यास रिपीट करून उपयोग होत नाही.

कोणी रिपीट करावे? : ज्यांना पात्रताच नाही, १००-१५० गुण आहेत त्यांनी शासकीय व खासगी एमबीबीएस प्रवेशासाठी रिपीट करून उपयोग होत नाही. परंतु ज्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे, त्यांनी अभिमतमधून प्रवेश घेण्यासाठी ‘नीट’ रिपीट करण्यास हरकत नाही.

सध्या ‘नीट’मध्ये ४००-४५०च्या पुढे गुण आहेत, त्यांना बारावीमध्ये देखील ८० टक्‍क्‍यांपुढे गुण असतात. तसेच प्राप्त गुण अगदी प्रवेशाजवळचे होते, परंतु थोड्या गुणांनी प्रवेश हुकतोय, अशा विद्यार्थ्यांनी रिपीटची एक संधी एमबीबीएससाठी अवश्‍य घ्यावी. बारावीमध्ये ६० ते ७० टक्के गुण असणाऱ्यांसाठी रिपीट पर्याय धोक्‍याचा आहे. सध्या ४००च्या पुढे गुण असलेल्यांनी मेहनत घेतल्यास वीस ते तीस टक्के गुणांची वाढ होऊ शकते. लक्षात घ्या, रिपीटरपैकी ८० टक्के विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. गुण वाढतात, परंतु प्रवेशाचा प्रकार बदलत नाही. मागील वर्षी जे मिळत होते, तेच पुन्हा मिळते. ३० टक्के विद्यार्थ्यांना तर पूर्वीपेक्षाही कमी गुण मिळतात, हेही लक्षात ठेवावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News