‘नीट-२०१९’ प्रवेशाबाबत जाणून घ्या

हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
Tuesday, 11 June 2019

देशभरातील शासकीय महाविद्यालयातील एमबीबीएस, बीडीएसचा ऑल इंडिया १५ टक्के कोटा देशभरातील सर्व अभिमत विद्यापीठे.

एमबीबीएस, बीडीएस शाखेतील प्रवेशासाठीच्या ‘नीट-२०१९’ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेतील गुणवत्तेनुसारच राज्यातील आरोग्य विज्ञान शाखेतील शासकीय व खासगी महाविद्यालयातील एमबीबीस, बीडीएससह सर्व उर्वरित शाखांमधील प्रवेश, तसेच देशभरातील शासकीय महाविद्यालयातील एमबीबीएस, बीडीएसचा ऑल इंडिया १५ टक्के कोटा देशभरातील सर्व अभिमत विद्यापीठे, एएफएमसी व एमजेआयएमएसमधील प्रवेश देण्यात येणार आहेत.

देशभरातून प्रथमच विक्रमी अशा १४ लाख ११ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. महाराष्ट्रातून २ लाख ६ हजार ७४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, केवळ ८१ हजार १७१ म्हणजेच ३९.२६ टक्के विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवली.

२०१९ पात्रता कट ऑफ :  एमबीबीएस, बीडीएससाठी खुल्या प्रवर्गाकरिता ५० पर्सेंटाईलनुसार १३४ गुण, इतर ओबीसी, एससी, एसटीसाठी ४० पर्सेंटाईलनुसार १०७ गुणांची पात्रता मिळवणे आवश्‍यक आहे, अर्थातच पात्रता मिळवली म्हणजे प्रवेश मिळतोच असे नव्हे.

प्रवेशासाठीचे अंदाजे आवश्‍यक गुण : प्रवेश हा प्रत्यक्षात गुणांवर नसून मेरिट क्रमांकावर अवलंबून असतो. १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातून प्रवेशासाठी खुल्या गटातून सुमारे ११ हजार ऑल इंडिया रॅंक आवश्‍यक आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी राज्याचा सुमारे २३०० एसएमएल, खासगी महाविद्यालयातील प्रवेशासाठी राज्याचा एसएमएल ६ हजार असल्यास आपण प्रवेशासाठीची अपेक्षा ठेवू शकतो. याबाबत एसएमएल प्राप्त करण्यासाठी यंदा किती गुण आवश्‍यक आहेत, यासाठी ‘नीट-२०१८’ व ‘नीट-२०१९’मधील गुण व रॅंक यांचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्‍यक आहे. २०१८ व २०१९ मध्ये ५८० गुण असणाऱ्यांचा एआयआर हा अनुक्रमे ३१०० व १३०००, तर ५५० गुण असलेल्यांचा एआयआर हा अनुक्रमे १९८०० व ४६ हजार, ४०५ गुणांवर अनुक्रमे ७५ हजार व १ लाख २४ हजार, ३५० गुण असलेल्यांचा एआयआर हा अनुक्रमे १ लाख २२ हजार व १ लाख ९० हजार तसेच २०० गुणांसाठी ३ लाख ६० हजार व ४ लाख ५९ हजार असा आहे. यावरून लक्षात येते की, यंदा प्रत्येक टप्प्यावर जास्त गुण मिळवूनही एआयआर मात्र खूपच घसरलेला आहे. प्रवेशासाठीचे कट ऑफ मेरिट क्रमांक बदलत नसतात. परंतु, पेपरच्या काठिण्य पातळीवर कट ऑफ गुण मात्र बदलतात.

देशपातळीवरील १५ टक्के कोट्यातून खुल्या गटासाठी सर्वसाधारणपणे ५७० ते ५८० गुण अपेक्षित असतील. अर्थातच, ज्या विद्यार्थ्यांना १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश मिळतो, त्यांना स्वतःच्या राज्यातील ८५ टक्के कोट्यातून प्रवेश नक्कीच मिळतो.

राज्यातील प्रवेश : राज्यातील पात्र ८१ हजार विद्यार्थ्यांना नेमके कसे यश मिळाले आहे, कसे गुण आहेत, यावरच राज्यातील प्रवेश अवलंबून आहेत. राज्यातील प्रवेशासाठी नावनोंदणी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच राज्याचा मेरिट क्रमांक प्राप्त होईल व त्यानंतरच मेरिट क्रमांक प्राप्त करण्यासाठी किती गुण आवश्‍यक आहेत, हे अंतिम होईल.

एकंदर परिस्थिती पाहता शासकीय एमबीबीएस प्रवेश खुला गटासाठी ५३५ ते ५४५, खासगी महाविद्यालयासाठी ४५० ते ४६० दरम्यान राहतील, असा प्राथमिक अंदाज आहे. ज्यांची अभिमत विद्यापीठामधून प्रवेश घेण्याची आर्थिक क्षमता आहे, त्यांना एआयआर ३ लाख ७५ हजारांपर्यंत असणाऱ्यांनाही प्रवेश मिळालेला आहे. २०१८ मध्ये ३.७५ लाखासाठी २०० गुण होते. यंदा मात्र २०० गुणांवर ४.६० लाख रॅंक आहे.

थोडक्‍यात राज्यातील एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस प्रवेशासाठीचे गुण वाढण्याची लक्षणे आहेत. सर्वांनी कट ऑफ गुण नव्हे, तर कट ऑफ मेरिट क्रमांक ही संकल्पना प्रेफरन्स फॉर्म भरण्यापूर्वी लक्षात घ्यावी. आपण उच्च कोर्सची मागणी करणारच आहोत, परंतु मला प्रवेश नाही मिळाला तर काय? असा विचार करून वरील माहितीचा अभ्यास करून कोर्स बदलण्याचा ‘प्लॅन बी’ तयार ठेवलाच पाहिजे.  आजही ५४० पेक्षा जास्त गुण मिळूनही एसईबीसी व ईडब्ल्यूएसमधून प्रवेश घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी दाखलेच काढले नसल्याचे लक्षात आलेले आहे. प्रवेशाच्या वेळी नव्हे, तर कागदपत्र तपासणी करताना दाखले आवश्‍यक आहेत. याची गांभीर्याने नोंद घेऊन दाखले काढावेत. कास्ट व्हॅलिडीटी जमा केल्याची रिसीट दाखवली तरीही प्रवेश मिळेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News