तीने वजन कमी केले आणि ‘प्रेझेंटेबल’ झाली!

शिल्पा तुळसकर, अभिनेत्री
Tuesday, 2 July 2019

शायवाच्या वेळीसुद्धा मला ‘लेडीज स्पेशल’ नावाच्या मालिकेची ऑफर आली होती. त्या वेळी मला त्यांना नकार द्यावा लागला, कारण शायवा सहा महिन्यांची होईपर्यंत मी काम करू शकत नव्हते. या वेळीही माझ्यासाठी मालिका थांबली.

मुबंई : शायवाच्या वेळीसुद्धा मला ‘लेडीज स्पेशल’ नावाच्या मालिकेची ऑफर आली होती. त्या वेळी मला त्यांना नकार द्यावा लागला, कारण शायवा सहा महिन्यांची होईपर्यंत मी काम करू शकत नव्हते. या वेळीही माझ्यासाठी मालिका थांबली. तीन महिन्यांनंतर त्यांनी मला पुन्हा फोन केला, तेव्हा मी त्यांना चित्रीकरण करण्यास तयार असल्याचे सांगितले. पुन्हा माझ्या त्याच अटी होत्या.

शायवा झाल्यानंतर मी ‘लेडीज स्पेशल’ ही मालिका केली. माझ्या टीमने आणि सहकलाकारांनी मला फारच मदत केली. प्रोफेशनली आम्ही कोणत्याही मर्यादा ओलांडल्या नाहीत. माझे हे काम माझ्या आवडीचे असल्याने माझे पती आणि माझी आई माझ्या पाठी भक्कम उभे होते. त्यांची मला फार मदत झाली. त्यानंतर माझ्या डॉक्‍टरांनीसुद्धा मला परत कामावर रुजू होण्यासाठी समर्थन दिले. फक्त बाळ तीन महिन्यांचे झाल्यानंतरच मी काम सुरू करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे माझ्या कुटुंबाबरोबर माझ्या डॉक्‍टरांनीदेखील मला इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करण्यासाठी मदत केली.

‘लेडीज स्पेशल’च्या वेळी नाशिक, मंगळूरसारख्या अनेक ठिकाणी मी प्रमोशनसाठी बाळाला घेऊन जायचे. तो अनुभव माझ्यासाठी फारच छान होता. स्त्री म्हणून काही गोष्टी खूपच त्रासदायक असतात, पण ते त्रास एखादी आई आपल्या बाळासाठी नक्कीच सहन करू शकते. शायवा झाली तेव्हा विवानसुद्धा होता. त्यामुळे मानसिकरीत्या मला त्रास होत होता. ‘मला हे सगळं जमेल ना? मी करेन ना?’ असे सगळे विचार मनात येत होते. त्या वेळी माझ्या पतीने मला एक चांगली गोष्ट सांगितली होती की, ‘तू बऱ्याचदा म्हणतेस की तुला मनासारख्या भूमिका मिळत नाहीत. आता ती संधी आली आहे, तर थोडा विचार करून काम करायला पाहिजेस.’ त्याच्या या म्हणण्याने माझ्या आयुष्यात फार मोठा फरक पडला. प्रेग्नंसीनंतर माझ्याकडे ज्या भूमिका होत्या त्या अप्रतिम होत्या; पण मला खंत होती की प्रेग्नंसीनंतर मला छान बारीक होऊन कमबॅक करायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे त्या दोन्ही मालिकेत मी चांगलीच गोलगप्पी दिसते आहे. प्रेग्नंसीनंतर मी स्वतःला थोडेफार मेंटेन ठेवायला सुरू केले होते. त्यासाठी नियमितपणे जिम आणि डाएट पाळायचे.

सध्या माझी ‘तुला पाहते रे’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेची ऑफर येण्याआधीसुद्धा माझे वजन थोडे वाढले होते. त्यामुळे मालिकेची ऑफर मी स्वीकारली, त्या वेळी स्वतः प्रेझेंटेबल दाखवणे ही माझी जबाबदारी असल्याने मी डाएट आणि व्यायाम सुरू केला. 
मी मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच सेटवर घेऊन गेले आहे, पण ते मोठे झाल्यावर मी कधीच त्यांना सेटवर घेऊन गेले नाही. फार क्वचितच म्हणजे वर्षातून एकदाच मी त्यांना सेटवर नेते. कारण, आता त्यांना कळले आहे, की आई किती काम करते आणि किती कष्ट करते आहे. पण मी त्यांना ‘स्टारडम’पासून लांबच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते सेटवर यायचे तेव्हा त्यांना माझे फार कौतुक वाटायचे. विवान याबाबत जास्त बोलत नाही, त्याला आता थोडे कळू लागले आहे, की आईची वेगळी ओळख आहे. शायवाला याची फारच गंमत वाटते. एकदा माझे नॉमिनेशन कुठल्यातरी ॲवॉर्डसाठी झाले होते आणि मला शायवाने विचारले, ‘‘आई तुझे ॲवॉर्ड घेण्यासाठी मी तुझ्यासोबत स्टेजवर येऊ का?’’ त्या वेळी मी तिला ‘नाही’ असे उत्तर देऊन तिला सांगितले, ‘तुझे ॲवॉर्ड घेण्यासाठी तू जायचे आणि माझे ॲवॉर्ड मी घ्यायला जाणार.’ त्या वेळी तिला याची फारच गंमत वाटली होती.

मी माझी मुले आणि काम यांचा चांगला समतोल राखते. कारण एकातून वेळ काढून दुसरी गोष्ट मला करता येत नाही. काही वेळेला कामाला प्राधान्य द्यावे लागते, तर काही वेळेला मुलांना प्राधान्य द्यावे लागते. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मला वेळ असेल, तेव्हा मी त्यांचा अभ्यास घेते, त्यांना शाळेत सोडायला-आणायला जाते, त्यांच्याबरोबर बसून ऑनलाइन चित्रपट पाहते. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करतो. त्यामुळे फक्त मुलांसोबत एकत्र वेळ घालवणे म्हणजे मुलांना बरे वाटते, असे नाही. आई घरात आहे, ही गोष्टदेखील त्यांच्यासाठी तेवढीच महत्त्वाची असते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News