मुलांमधील आक्रमकता अश्या प्रकारे कमी करावी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

सर्वप्रथम पालकांनी स्वतःच्या वर्तणुकीबद्दल दक्ष असायला हवं, कारण मुल त्यांचं अनुकरण करत असतात.

मुलं ही अनेक बाबतीत पालकांच्या वर्तणुकीचा आरसा असतात... त्यांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे सर्वप्रथम पालकांनी स्वतःच्या वर्तणुकीबद्दल दक्ष असायला हवं. विशेषतः राग व्यक्त करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करायला हवा. अति कडक शिक्षा कटाक्षानं टाळायला हव्यात. मात्र कुठल्या गोष्टी केलेल्या चालणार नाहीत याची मुलांना स्पष्ट जाणीव द्यायला हवी. महत्त्वाचं म्हणजे मुलांना त्यांच्या भावना योग्य शब्दांत कशा मांडायच्या हे वेळोवेळी शिकवायला, समजवायला हवं.

मुलांच्या आक्रमकतेवरचा एक अत्यंत सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय असतो... खेळाचा. मुलांना भरपूर खेळू द्यावं. मैदानी खेळ, पोहणं वगैरे. यातून मुलांच्या अंगभूत आक्रमकतेचं विरेचन होत असतं. प्रश्‍न फक्त आक्रमकतेचा नाही. मुलांच्या अंगात सळसळणाऱ्या रक्ताचा आहे. सतत उसळी मारणाऱ्या ऊर्जेचा आहे. त्यासाठी खेळ हा अतिशय नैसर्गिक आणि एकमेव आउटलेट असतो. मुलांच्या या खेळण्या बागडण्याला ‘मोटर ॲक्‍टिव्हिटी’ म्हटलं जातं...तिला पुरेसा वाव द्यायला हवा. थोडाफार दंगा, मस्ती करण्याची त्यांना मुभा हवी. ती करू दिली नाही तरी ताण निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचा मुद्दा असा की,  दे शुड बी अलाउड टू बी किड्‌स.

खेळाबरोबरच मुलांना कला शिकवल्या गेल्या, विशेषतः नृत्य, तबलावादन यांसारख्या तर त्यामुळेही आक्रमकता कमी होऊ शकते. कारण मुलांची शक्ती सकारात्मक व योग्य गोष्टींकडे वळते. अर्थात सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे तो पालक आणि मूल यांच्यातील संवादाचा. बालभाषा आत्मसात करून पालकांना मुलांशी संवाद साधता आला, सुसंवाद निर्माण करता आला तर अक्षरशः जादू व्हावी तशी मुलांची आक्रमकता नाहीशी होऊ शकते. एक कळीचा मुद्दा आहे, तो आई-वडिलांच्या भांडणाचा. ते जर मुलांसमोर स्वतःच आक्रमक भाषेत भांडत असतील तर त्याचा मुलांच्या मानसिकतेवर नक्कीच प्रतिकूल परिणाम होतो.

त्यामुळे एक तर शक्‍यतो मुलांसमोर भांडणं टाळावीत. तसं काही कारणांमुळे झालंच तर निदान भाषेबाबत संयम ठेवावा. अर्थात मुलांसमोरच भांडण झालं तरी काही बिघडत नाही, जर ते मुलांच्या समोरच मिटवण्याची खबरदारीही पालकांनी घेतली तर! भांडा ‘सख्य’भरे हा त्या दृष्टीनं महत्त्वाचा!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News