लाल परी आणि एक फुल एक हाफ...

विपुल साळुंखे 
Monday, 3 June 2019

तेव्हा आमची ही प्रेमळ तक्रार ऐकून मम्मी-पप्पा गोड हसत, आमची समजूत काढायचे, तुम्ही दोघं थोडे आणखी मोठ्ठे झालात की काढू तुमचं पण फुल तिकीट. मग ते सगळं विसरून मी आणि माझी बहीण खिडकीतून खंडाळ्याचा घाट बघण्यात गुंग व्हायचो. 

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की गावी जायचे वेध लागायचे तेव्हा पप्पा एक महिना आधीच कुर्ला नेहरूनगरला जाऊन एसटीचे रिझर्व्हेशन करायचे. त्यावेळी ऑनलाइन वगैरे अशी भानगड नसायची आणि समजा नाहीच मिळालं रिझर्व्हेशन तर मिळेल त्या एसटीने जायचो. सीट मिळाल्यावर कंडक्‍टर तिकीट द्यायला यायचा तेव्हा पप्पा "दोन फुल, दोन हाफ शिरवळ' असं तिकीट मागायचे. मला आठवतंय तेव्हा मी आणि माझी बहीण "आमचं हाफ तिकीट का काढलं? आमचं पण फुल तिकीट काढा, आम्ही मोठ्ठे झालोय आता' अशी हुज्जत घालायचो.

तेव्हा आमची ही प्रेमळ तक्रार ऐकून मम्मी-पप्पा गोड हसत, आमची समजूत काढायचे, तुम्ही दोघं थोडे आणखी मोठ्ठे झालात की काढू तुमचं पण फुल तिकीट. मग ते सगळं विसरून मी आणि माझी बहीण खिडकीतून खंडाळ्याचा घाट बघण्यात गुंग व्हायचो. 

तसं बघायला गेलं तर, कार घेतल्यापासून गावच्या यात्रेला आमचं एसटीने जाणं गेल्या कित्येक वर्षापासून जवळजवळ बंदच झालं होतं. पण, यंदा काही कारणास्तव मला आणि पप्पांना गावी वेगवेगळं जावं लागलं. त्यामुळे कार नेण्याचा प्रश्नच नव्हता. यात्रा संपवून काल पप्पा आणि मी एकत्रच मुंबईला यायला निघालो.

शिरवळला आल्यावर काही मिनिटात आम्हाला एशियाड मिळाली. मस्त जागा मिळाली, दोघं बापलेक सेटल झालो. पप्पांना सीट पुशबॅक करून दिली. तेही रिलॅक्‍स झाले, कंडक्‍टर तिकीट द्यायला आले, मीही मोठ्या स्टाइलमधे त्यांना तिकीट मागितलं "एक फुल, एक हाफ मुंबई'. मला त्यावेळी खूप हसायला येत होतं. कारण पप्पा आता सिनियर सिटीझनच्या कॅटॅगरीमध्ये बसत होते.

त्यांना आता सगळीकडे हाफ तिकिटाने प्रवास करण्याची सुविधा आहे. काय गंमत आहे ना, ज्या माणसाने लहानपणी आमचं हाफ तिकीट काढलं होतं, आज त्यांचं हाफ तिकीट काढायला एक वेगळीच मज्जा येत होती. पप्पासुध्दा गालातल्या गालात गोड हसत होते. मस्त गप्पा मारत मारत थोड्या वेळाने पप्पांना डुलकी लागली, त्यांच्याकडे कौतुकाने पाहत माझ्या मनात एक विचार आला, च्यायला बरं झालं आपण कार नाही आणली ते, नाही तर हा क्षण मी कधीच अनुभवला नसता आणि पप्पांची हाफ तिकीट काढायची संधी सुध्दा मी गमावली असती.

चला आयुष्याच्या या प्रवासात आणखी एका गोड आठवणीची भर पडली. साठी ओलांडलेल्या लहान बाळांची (आई-वडिलांची) हाफ तिकिटं काढण्यात एक वेगळीच गंमत असते. ती गंमत मी नुकतीच अनुभवली. तुम्हीसुध्दा कधीतरी नक्की अनुभवा. कंडक्‍टरकडे त्यांचं हाफ तिकीट मागितल्यावर त्यांच्या चेहेऱ्यावरचं "क्‍युट रिऍक्‍शन' अमूल्य असते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News