मुंबई महानगर प्राधिकरणात नोकर भरती; कुशल- अकुशल कामगारांना संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 June 2020

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांची कामे 20 एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली, तेव्हा कामगारांची संख्या 16 हजारांपर्यंत गेली होती.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रकल्पांची कामे रखडू नयेत म्हणून कामगारांची भरती सुरू केली आहे. कंत्राटदारांनी सुरू केलेल्या या भरतीला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी कुशल कामगारांची कमतरता असल्याचे सांगण्यात आले.

एमएमआरडीएने मुंबई महानगर परिसरातील सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांतील एकूण 11 हजार कामगारांची व्यवस्था शिबिरांमध्ये केली होती. काम बंदच्या काळातील भोजन, निवास, वैद्यकीय तपासणी आदी खर्च प्राधिकरणानेच केला होता. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांची कामे 20 एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली, तेव्हा कामगारांची संख्या 16 हजारांपर्यंत गेली होती. त्याच काळात शहरातील अनेक स्थलातंरित कामगार मूळ गावी परत जाऊ लागले. एमएमआरडीए प्रकल्पांतील तीन-चतुर्थांश कामगारांनीही परतीची वाट धरली. कामगारांच्या कमतरतेवर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कुशल-अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते.

मेट्रोच्या सर्व प्रकल्पांत सुमारे 16 हजार 726 कामगारांची (7500 अकुशल आणि 8500 कुशल) गरज असल्याची जाहिरात एमएमआरडीएने नुकतीच प्रकाशित केली. त्यानुसार कामगारांनी थेट 16 कंत्राटदारांशीच संपर्क साधायचा आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी कंत्राटदार व एमएमआरडीएच्या मदत कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला; परंतु कुशल कामगारांची कमतरता असल्याचे काही कंत्राटदारांनी सांगितले.

परप्रांतीय कामगार परतले?

काही कंत्राटदारांनी मूळ राज्यांत गेलेल्या कामगारांशी संपर्क साधून त्यांना मुंबईत परत येण्यास सांगितले आहे. त्याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक कामगार परत आल्याचे कंत्राटदारांनी सांगितले. काही राज्यांत प्रवासाच्या अडचणी असल्याने कामगारांचे येणे रखडत असल्याचेही कंत्राटदारांकडून सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News