मुंबई :- स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आजी-माजी सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जात असतानाच एका माजी सैनिकाची मात्र वर्षभरापासून घरासाठी फरफट होत आहे. पुणे म्हाडा मंडळाच्या सोडतीमध्ये विजेते ठरलेले माजी सैनिक दिलीपराव चव्हाण यांच्याकडे विकासक घराचा ताबा देण्यासाठी अतिरिक्त रक्कम मागत आहेत. याबाबत म्हाडानेही त्यांना अद्याप कळवलेले नाही. म्हाडा आणि विकासक यांच्या टोलवाटोलवीने चव्हाण मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे अखेर चव्हाण यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाच पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाने ऑगस्ट २०१९ मध्ये विविध घरांची सोडत काढली. सोडतीमध्ये माजी सैनिक दिलीपराव चव्हाण यांना योजना क्रमांक २६५ मध्ये ए विंग ३०४ क्रमांकाची सदनिका मिळाली. कागदपत्र पडताळणीनंतर म्हाडाने चव्हाण यांना विकासकाकडे रक्कम भरण्यास सांगितले. मात्र, त्यांना जाहिरातीमधील मूळ किमतीशिवाय अधिकची ३ लाख ५० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. चव्हाण यांच्यासह अनेक लाभार्थ्यांनी यास विरोध केला. त्यानुसार याबाबत म्हाडा प्राधिकरणाचे मत विचारात घेऊन तक्रारदारांना कळविण्यात येईल, असे लेखी उत्तरही देण्यात आले. त्यानुसार मंडळाने मुख्य वास्तुशास्त्र आणि नियोजनकार यांना पत्र लिहिले. पत्रात मंडळाने जाहिरातीमध्ये नमूद किंमत सदनिकेची मूळ विक्री किंमत असून लाभार्थ्यांना सोसायटी, एमएसईबी शुल्क, टॅक्स आणि नियमानुसार इतर खर्च विकसकास अदा करावी लागेल. तसेच, सदनिकेची विक्री किंमत तयार करताना २० टक्के अतिरिक्त रक्कम आकारण्यात येत असल्याने विकसकाने शासकीय अत्यावश्यक शुल्काव्यतिरिक्त कोणतीही रक्कम आकारणे अभिप्रेत नाही, असे कार्यालयाचे मत असल्याचे या पत्रात म्हटले होते.
या पत्रावर आजही मंडळाने चव्हाण यांना विकासकास अतिरिक्त रक्कम भरायची की नाही, याबाबत लेखी कळविले नाही. यानंतरही एका अधिकाऱ्याने चव्हाण यांना आठ दिवसांत रक्कम न भरल्यास सोडतीमधील घर रद्द करण्यात येईल, असे पत्र पाठविले आहे. यामुळे माजी सैनिक हवालदिल झाले आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी चव्हाण यांनी गृहनिर्माण मंत्री यांना पत्र लिहिले आहे.
म्हाडाच्या योजनेवर नागरिकांचा विश्वास आहे. हा विश्वास टिकून राहण्यासाठी आता गृहनिर्माण मंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.
- दिलीपराव चव्हाण, माजी सैनिक.
लाभार्थी आणि विकासकाने सामोपचाराने निर्णय घेऊन याबाबत तोडगा काढणे आवश्यक आहे. आम्ही सोडत काढतो, त्याप्रमाणे लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळावा, यासाठी आम्हीही प्रयत्न करतो. म्हाडाने जाहिरातीमध्ये किमतीचा उल्लेखही केलेला आहे.
- अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे मंडळ.