...यासाठी केला होता का अट्टाहास?

कु. अरुण चिंचणगी              
Tuesday, 26 February 2019

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात स्वतंत्र भारतासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व क्रांतीकारकांना नम्र अभिवादन. आज 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला थोडं व्यक्त व्हावंसं वाटलं म्हणुन केलेला हा एक छोटासा प्रयत्त्न...                  

भारताचा इतिहास व भारतीय स्वातंत्र्यसंग्राम आपण सर्वजण शालेय जीवनात अभ्यासलो आहोतच. त्यामुळे इतिहासावर बोलण्याच्या फंदात मी काही पडणार नाही, पण भारत प्रजासत्ताक होऊन इतकी वर्षे उलटली तरीही माझ्या स्वप्नातला भारत कधी पहायला मिळणार? असा राहुन-राहुन मला प्रश्न पडतो. मोठ्या कष्टाने भारतीय क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवुन दिले,पण सध्या भारतात माजलेला सामाजिक व राजकीय असंतोष, जनतेच्या मागण्या पूर्ण करताना हतबल झालेले सरकार, सोशल मिडियामुळे भारतीय संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास, वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्ती,गलिच्छ   राजकारण इत्यादींमुळे याचसाठी केला होता का अट्टाहास? असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. दिवसेंदिवस श्रीमंत व गरीब यांमधील दरी वाढत चालली आहे. उपासमारी व कुपोषणामुळे   दररोज शेकडो प्राण जात आहेत. निर्भया सारखी प्रकरणे गल्लोगल्ली घडत आहेत. कर्जबाजारीपणामुळे वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि त्यामुळे उध्वस्त झालेले अनेक संसार व आपल्या धन्यावाचून पोरकी झालेली जनावरे या सर्व गोष्टींमुळे मन अगदी सुन्न होऊन जाते, मनाला खुप वेदना होतात. 'बळी तो कान पिळी' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराचा भस्मासुर दिवसागणिक वाढत चाललाय. सामान्य व गरीब जनतेचा आधारस्तंभ असलेल्या शासनदरबारी देखील होणाऱ्या भ्रष्टाचारामध्ये तर सामान्य माणूस पुरता पिसून चाललाय. दहशतवाद व नक्षलवाद इतका फोफावलाय की माणूसच माणसाचा भक्षक बनलाय. हे सर्व पाहून माणसातील माणुसकीच हरवत चालली आहे असे वाटते.                                              
सध्या तर आरक्षणाला पेवच फुटलेत. 'आरक्षण' हा विषय इतका गंभीर झालेला आहे की या आरक्षणामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे आरक्षणाची खरी गरज कोणाला आहे हेच समजत नाही. एकीकडे शाहू, फुले, आंबेडकर यांसारख्या महापुरुषांचे विचार बोलुन दाखवायचे आणि दुसरीकडे अराजकता माजवायची यांमुळे इतिहासातील महापुरुषांचे विचार केवळ पुस्तकांपुरतेच मर्यादित आहेत का? असे वाटते. अंदमानच्या तुरुंगात बंदिवासात असताना वि. दा. सावरकर यांनी  'ने मजशी ने, परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..!' हे काव्य लिहले होते, पण आज सावरकर हयात असते तर खरंच त्यांचा आपल्या मातृभूमीला परत येण्यासाठी प्राण तळमळला असता का हो? हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे. असो... अपेक्षा एवढीच आहे की, क्रांतिकारकांनी स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिले ते स्वैराचारासाठी नव्हे, तर सुराज्य करण्यासाठी याचे भान ठेवून वाटचाल केली तर खरोखरच स्वप्नातला भारत पहायला वेळ लागणार नाही...!          
आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News